शशक २०२२ - धडपड

"घरुन काम करण्याची मुभा असतानाही या अवस्थेत रोज इतक्या दूर ऑफिसला जायचा हट्ट का लावलायंस?”
"आई, मला ऑफिसला जायचे डोहाळे लागलेत असं समज. फोन ठेवते आता"
- - - -
"ताई पुढच्या हफ्त्यापासून मला येता येणार नाही" गाडीची चावी देत तो म्हणाला
" तुमच्या बायकोची डिलीवरी होणार म्हणूनच ना ?" प्राजक्ताने हसत विचारलं
"ते आहेच. पण आता सगळे कामावर रुजू व्हायचं म्हणतात…ताई, आम्ही लाल डब्यावाले… हळुवार ड्रायव्हिंगची सवय नाही. पण तुम्ही सांभाळून घेतलंत… " तो हात जोडत म्हणाला
- - - -
तिच्या फोनवर संदेश आला.
"प्राजू , मी काळजीपोटी बोलले खरी... . पण चिघळलेल्या संपामुळे गरोदर असतानाच मला वैधव्य आलं तशी वेळ एका तिर्‍हाईत स्त्रीवर येवू नये म्हणून तुझी धडपड विलक्षणच.. "