मी इन्स्पेक्टर अजय. अनेक चोरांना पकडणारा. माझ्या कपाळावर एक व्रण आहे. लहानपणी काकांनी मला मी त्यांचे पैसे चोरले म्हणून मारलं होतं. तेव्हापासून माझ्या कपाळावर आहे. आईलाही काकू खूप छळायची. त्याच रात्री माझ्या विधवा आईनं माझ्यासकट घर सोडलं.
पुढं आम्ही एका महिलाश्रमात राहिलो. मला आईनं शाळेत घातलं. तीही प्राथमिक शाळेत शिक्षिका झाली. मी शिकलो. पोलीसदलात गेलो.
आज आम्ही सन्मानानं जगतोय. माझ्या कपाळावरचा व्रण चाचपला की मी न केलेल्या चोरीबद्दलचा मार आठवतो.
त्या दिवशीची चोरी कुणी केली ते मला माहीत आहे. माझ्या आईनं! होय आईनं. पण मी समजून घेतलंय तिला. मी मार खात असतानाची तिची असहाय्य, केविलवाणी नजर मात्र मला आजही रडवते.