शशक'२०२२ - योगायोग

"फूट्बोर्डवर पाय ठेवा तुम्ही", अभिरुपने चालत्या ट्रेन पकडणार्या मुलीच्या बखोटीला धरुन आत घेतले.
"काय वेंधळेपणा, कशाला धावती ट्रेन पकडता?"
"सॉरी चुकले. घरुन फोन आलेला की त्वरित घरी ये…"
"इथं लगोपाठ ट्रेन असतात. दुसरी मिळाली नसती का?"
ती ओशाळली, आतमध्ये सरकली.
तो सांताक्रुझला उतरला आणि खिसे चाचपडु लागला. मागोमाग ती.
"काय झालं?"
"शट! मगाचच्या गडबडीत आईने मुलीकडच्यांचा एक पत्ता दिलेला तो कागदच उडुन गेला.
मी सांताक्रुझचीच, पत्ता सांगाल?.
"साफल्यनगर"
"समोरचीच कॉलनी, मी तिथेच राहते. कोणाकडे आलात?."
"काहीतरी वासंती काटदरे नाव होते, फ्लॅट ११०५ की १११५ आठवत नाहीये.
"हम्म"
"काय झालं?"
"मी दमयंती काटदरे, तुमचं माहित नाही पण मला तुम्ही पसंद आहात."