शशक'२०२२ - तुटलेले दोर

पहाटेच्या वेळी शहरातुन गावाकडे आलेल्या गाड्या गावच्या वेशीपाशी करकचुन ब्रेक लावुन थांबल्या.
गाडीतली पेंगत असलेली लहानथोर मंडळी दचकुन जागी झाली .

समोर नजरेतली ओळख हरवलेले शेकडो गावकरी उग्र मुद्रेने काठ्या घेउन उभे होते . त्यांनी गावात जाणारी वाट अडवली होती .

"पावणं , तुम्ही शहरातली रोगराई घेउन गावात येतायसा . तुम्हाला इथं प्रवेश नाही ."

" व्हय .आलात तसं गपगुमान माघारी जावा , न्हाईतर हि काठी पघितलीत. "

आलेले पाव्हणे निरुपायाने शहराकडे परतले .

यथावकाश रोगराई ओसरली . गाववाल्यांना रोजंदारीसाठी शहराकडे जाण्याची निकड भासु लागली .
गावाकडुन शहरातील पाव्हण्यांना रोज गोडीगुलाबीचे फोन , खुशाली विचारणारी पत्रे जाउ लागली.

पण त्यांच्या पत्रांना उत्तर मिळत नव्हते . फोन कट केले जात होते .

दोर कायमचे तुटले होते .