शशक'२०२२ - विमनस्क

अंधाराचा काहूर होता मेघा मनूचा हात घट्ट धरून झपझप चालत होती.

आपला कोणीतरी पाठलाग करतय अशी शंका तिला आली.नजरेचा कटाक्ष तिने मागे टाकला वीजेच्या कडकडाटात तिला एक चेहरा दिसला..... 'रव्या'
इंदूबाईंचा वेडसर मुलगा गचाळ हसत येत होता. वेडा रव्या गावात दगड मारत फिरायचा,शिव्या द्यायचा.मेघाला आता दरदरून घाम फुटला."मनू चल लवकर"मेघा कळवळली .

छोटीसी मनू दमली होती.एका खड्ड्यात मनू पडली.ती मोठमोठ्याने रडू लागली.समोरून येणारी दोन तीन टारगट पोरं तिला हसायला लागली, तेव्हा मनूचा सूर आणखिनच वाढला.
भांबावल्या मेघाने रव्याकडे पाहिलं... त्याच्या हातातला दगड त्याने जोरात त्यांच्या दिशेला भिरकावला... तिने मनूला पोटाशी घेतलं.दगड जोरात लागल्याने धावत येणारी मोकाट कुत्री विव्हळत गेली.. विमनस्क रव्या की ती पोरं?