भगीरथ कोसळणार्या भुयारातून बाहेर आला. समोरचे दृष्य पाहून त्याचे अवसान गळाले. पाणीच पाणी. तो दिशाहीनपणे धावू लागला. इतरांचीही तशीच धडपड चाललेली. पळतापळता तो धडकला.
“भगीरथ?” बाळकृष्ण होता.
“बाळकृष्ण, तिथे... तिथून प्रकाश येतो आहे..”
“तीचं काय ? ती बाहेर पडली ?”
अंधारात भगीरथला त्याचा चेहरा दिसत नव्हता.
“न..नाही. इतक्या खोलातून यायला काही रस्ता नाही.”
बाळकृष्णाची आकृती धडाडत भुयाराच्या तोंडात शिरताना त्याला दिसली.
भगीरथ काही वेळ थिजल्यासारखा थांबला आणि पाण्यातून धावू लागला. प्राणपणाने चढत तो प्रकाशाकडे धडपडणार्या गर्दीत मिसळला.
पण...
जेव्हा त्यातूनही फेसाळतं तपकीरी पाणी येऊ लागलं, त्याने संपणार्या प्रकाशाकडे पाहून नियंत्याला दूषण दिले.
-------------
“आई, प्राजक्ताच्या मुळावर पाणी घातलं, तर भसाभस मुंगळे आले बाहेर !”