नुकत्याच केलेल्या मराठवाडा दौऱ्यात परळी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले 'श्री वैजनाथ' मंदिर, अंबाजोगाई येथील आमची कुलदेवी 'श्री योगेश्वरी' मंदिर, आद्यकवी श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना) अशा ठिकाणी भेट दिली त्याचा हा थोडक्यात वृत्तांत.
14 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता घरी नाश्ता केल्यावर डोंबिवली ते परळी असा सुमारे 435 किमीचा प्रवास सुरु झाला. दुपारी दोन-सव्वादोनच्या सुमारास अहमदनगर मधल्या रेस्टोरंटमध्ये जेवण करून पुन्हा प्रवासाला सुरुवात करून संध्याकाळी 7 च्या सुमारास आम्ही परळीला पोचलो.
मंदिर बंद होण्याची नक्की वेळ माहिती नसल्याने मुक्कामासाठी बुक केलेल्या हॉटेल वर जाण्याआधी दर्शन घ्यावे अशा विचाराने पाहिले देवळात गेलो.
वैजनाथाचे दर्शन घेऊन हॉटेलवर पोचल्यावर फ्रेश होऊन जवळच्या रेस्टोरंटमध्ये रात्रीचे जेवण केले.
सकाळी योगेश्वरी मंदिरात अभिषेकाची वेळ 10 वाजताची मिळाली होती. परळी ते अंबाजोगाई असा सुमारे 25 किमी प्रवास करून तिथे साडे नऊ पर्यंत पोचणे आवश्यक असल्याने (आणि दिवसभरात केलेल्या जवळपास 450 किमीच्या प्रवासाने थोडा थकवाही आला होता) सगळेजण साडे दहा - पावणे अकराच्या सुमारास झोपी गेलो.
परळी ते अंबाजोगाई रस्ता चांगला होता त्यामुळे सर्व तयारी झाल्यावर सकाळी साडे आठ वाजता निघूनही सव्वानऊच्या आधीच आम्ही योगेश्वरी मंदिरात पोचलो.
गाभारा.
योगेश्वरी देवीचा अभिषेक आणि दर्शन झाल्यावर आम्ही मंदिराजवळची अन्य काही प्रेक्षणीय स्थळे पाहायला निघालो.
हत्तीखाना, श्री रेणुकाई मंदिर, श्री मूळ जोगाई मंदिर, श्री आरोग्य मंदिर, बाराखांबी, श्री खोलेश्वर मंदिर, श्री काशी विश्वनाथ, श्री अमृतेश्वर, श्री नृसिंह व दासोपंत समाधी, श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ आणि नागनाथलिंग अशी अनेक प्राचीन मंदिरे ह्या ठिकाणी पाहता येण्यासारखी आहेत.
ही सर्व ठिकाणे ह्या आधीच्या अंबाजोगाई भेटिंमध्ये पाहून झाली असल्याने हाताशी उपलब्ध असलेल्या कमी वेळात मंदिरा पासून अगदी जवळ (500 मिटर) असलेला 'हत्तीखाना' आणि 'श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळ' 1.5 किमी) ह्या दोन ठिकाणी पुन्हा भेट दिली.
पाचेक मिनिटात श्री मुकुंदराज स्वामी समाधीस्थळी पोचलो.
इथे बऱ्याच पायऱ्या उतरल्यावर (मोजल्या नाहीत पण दीड -दोनशे तरी असाव्यात) खाली दारीतल्या समाधीस्थळी आपण पोचतो.
मुकुंदराज स्वामींची समाधी.
सदर स्थळाबद्दलची माहिती टंकायचा कंटाळा आल्याने त्याबद्दलची माहिती देणाऱ्या बोर्डाचे 2 फोटो खाली देत आहे ते झूम करून माहिती वाचता येईल.
इथून निघाल्यावर परतीच्या वाटेवर असलेल्या 'जोगाई सभामंडप लेणी (हत्तीखाना)' पाशी पोचलो.
ह्या लेण्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तिथे लावलेल्या बोर्डावर जी माहिती लिहिली आहे ती जशीच्या तशी खाली देत आहे, जाणकारांनी माहितीत भर घालावी ही विनंती.
जोगाई सभामंडप लेणी, आंबाजोगाई, जि. बीड.
"जोगाई सभामंडप लेणी (हत्ती खाना) ही योगेश्वरी मंदिराच्या उत्तर पश्चिमेस अर्धा कि.मी. अंतरावर जयंती नदीच्या तीरावर स्थित आहे. ही लेणी चौकोनी आकाराची असुन खडकात खोलवर कोरलेली आहे. पहाडाच्या दक्षिणेस लेणीचे प्रवेशद्वार आहे. लेणीचा मंडप ८.३६ मीटर असुन समोर खुले प्रांगण आहे. लेणीच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यामुळेच या लेणीस हत्तीखाना लेणी असे नाव पडले.
प्रांगणाच्या मधोमध सुंदर नंदीमंडप कोरलेला असुन त्याचा आकार ९.१४ X ९.१४ मीटर आहे. या मंडपाच्या मध्यभागी नंदीची मुर्ती आहे. येथे मिळालेल्या शिलालेखात शके १०६६ असा उल्लेख असुन या मध्ये राष्ट्रकुट राजा महामंडलेश्वर उदयादित्ययाने सेलु, राडी, जवळगाव आणि कुंभेफळ ही ग्रामे हत्तीखाना लेणीच्या परीक्षणासाठी दान दिल्याचा उल्लेख आहे. सदरहुं शिलालेख हा तत्कालीन तहसिलदार यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव तहसिल कार्यालयात ठेवण्यात आलेला आहे.
जोगाई सभामंडप लेणी हे स्मारक महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम, १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे."
खाली सभामंडपात जाण्यासाठी खडकात पायऱ्या खोदून तयार केलेला भुयारी मार्ग.
पायरी मार्गाच्या डाव्या बाजूचे सोंड आणि शेपटी तुटलेल्या चार पैकी पहिल्या हत्तीचे शिल्प.
नंदीमंडपातील तुटफूट झालेला दगडी नंदी.
नंदी मंडपात स्थानिक कॉलेज कुमार घोळक्याने धूम्रपान करत बसले होते, फोटो काढण्यासाठी नाईलाजाने त्यांना तिथून उठण्याची विनंती करावी लागली.
लेणी.
लेण्यांच्या बाहेरील दुसरे हत्तीचे शिल्प. हे जरा सुस्थितीत आहे.
दगडात कोरलेला हौद.
देखभालीचा अभाव आणि अक्षम्य शासकीय हेळसांड झालेल्या ह्या लेणी परिसराच्या चहूबाजूनी कचरा आणि रिकाम्या बिअरच्या बटल्यांचा खच पडलेला बघायला मिळतो. आतल्या दगडी हौदातल्या पाण्यातही भरपूर कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या टाकलेल्या असून अंधाऱ्या लेण्यांमध्ये वापरलेले कॉन्डोम्स आणि दारूच्या बाटल्या बघायला मिळाल्या.
दुर्दैवाने ही लेणी "राज्य संरक्षित स्मारक" म्हणुन घोषित करण्यात आली असूनही अतिशय दुर्लक्षित राहिली आहेत. त्यांच्या जतन / संवर्धनाकडे जर वेळीच लक्ष दिले नाही तर आधीच मोडतोड झालेला हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा कायमचा नष्ट होण्यास फारसा अवधी लागणार नाही.