पानकम आणि कोसांबरी

नमस्कार मिपाकर्स.

आज रामनवमी व त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा.

रामनवमी निमीत्त आज मी दोन पाककृती मिपावर सादर करत आहे.
पानकम व कोसांबरी.

दक्षिण भारतामध्ये( प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र व तमिळनाडू) मध्ये भगवान राम यांना या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

भारतीय(हिंदू) पंचांगा प्रमाणे वर्षाचे ६ ऋतू मध्ये विभाजन होते व त्या त्या ऋतू मध्ये वातावरणातल्या बदलानुसार आहार विहार सुद्धा ठरलेला असतो व त्याप्रमाणे देवांचा नैवेद्य ही बनवला जातो.

होळी गेल्यानंतर वातावरणात उकाडा सुरू होतो व त्याचबरोबर मानवी शरीरामध्ये सुद्धा उष्णता निर्माण व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्याला दाह शमवणारे काहीतरी थंड असे खावेसे वाटते.
नेमके तेच लॉजिक या दोन पदार्थामध्ये वापरले आहे.
पानकम आणि कोसांबरी दोघे पदार्थ शरीरात शीतलता प्रदान करतात आणि त्याचाच नैवेद्य प्रभू राम यांना दाखवला जातो.

चला बघुया आता या दोन्ही पदार्थ कसे बनवतात

१. पानकम

पानकम/पानका किंवा पानगं म्हणजेच संस्कृत मध्ये मधुर पेय.

साहित्य :
गूळ १ वाटी
थंड पाणी २ वाटी.
सुंठ पाव चमचा
काळी मिरी पावडर पाव चमचा.
वेलची पूड अर्धा चमचा
१ लिंबाचा रस
चिमुटभर मीठ.
तुळशीची पाने

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात थंड पाणी घेवून त्यात गूळ पूर्ण विरघळू द्यायचा. नंतर गुळाचे पाणी दुसऱ्या भांड्यात गाळून घ्यायचे जेणेकरून काही कचरा असेल तर निघून जाईल.
आता गुळाच्या पाण्यात पाव चमचा सुंठ पावडर , अर्धा चमचा वेलची पूड व पाव चमचा काळी मिरी पावडर टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं.
नंतर त्यात लिंबाचा रस आणि चिमुटभर मीठ टाकून परत एकदा ढवळून घ्यायचं.
मस्त गारेगार पानकम तयार आहे. ते एका ग्लास मध्ये काढून त्यावर तुळशीची पाने सोडावी व सर्व्ह करावा.

Panakam

२. कोसांबरी

कोसांबरी किंवा कोसमल्ली म्हणजेच मुगाची भिजलेल्या डाळीची कोशिंबीर.

साहित्य :
२/३ तास भिजवलेली मुगाची डाळ
१ काकडी चिरलेली.
१ कैरी किसलेली
१ वाटी खोवलेला नारळ.
कोथिंबीर १/२ वाटी
१ लिंबाचा रस.
कढीपत्ता
२ मिरची चिरलेली
मोहरी
मीठ चवीप्रमाणे.

कृती
सर्वप्रथम भिजवलेली मुंगाची डाळ एका चाळणीत काढून पूर्ण पाणी निथळू द्यावे.
डाळ आता एका भांड्यात काढून घ्यावी. त्यात बारीक चिरलेली काकडी, किसलेली कैरी व खोवलेला नारळ टाकून व्यवस्थित हलवून घ्यावे. नंतर त्यात लिंबाचा रस,चवीप्रमाणे मीठ, चिरलेली मिरची व कोथिंबीर टाकून परत हलवून घ्यावे.
आता मोहरी आणि कडीपत्ता याचा गरमागरम तडका तयार करावा व या मिश्रणात सोडावा.
आपली कोसांबरी तयार आहे. ती एका बाउल मध्ये सर्व करावी.

kosambari

panakam and kosambari

या दोन्ही रेसिपी मी आमच्या यूट्यूब चॅनल वर टाकल्या आहेत.