भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२ चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने

भीमाशंकर ट्रेक ०२.०१.२०२२
चढाई बैल घाटाने-उतराई गणपती घाटाने

२०२२ वर्षाची सुरुवात दोन नितांत सुंदर घाटवाटांच्या ट्रेकने झाली. जंगल भटक्यांना अजुन काय पाहिजे. एक कोकणातून, कर्जत तालुक्यातील नांदगावपासून वर जवळजवळ १००० मीटर्सवर भीमाशंकरला घेऊन जाणारी तर दुसरी भीमाशंकरहून पुन्हा कोकणात म्हणजे खांडसला (तालुका कर्जत) तेव्हढेच अंतर उतरणारी. एक थोडीशी आडवळणाची, त्यामानाने कमी वापराची, कमी रूळलेली पण अतिशय सुंदर, दाट झाडोऱ्याची रानशिळ घाटवाट. ह्याच वाटेला बैलघाट सुद्धा म्हणतात. तर दुसरी जास्त मळलेली नियमित वापराची गणेश/गणपती घाटवाट. दोन्हीही वाटा तुमच्या शारीरिक क्षमतेचा कस पाहणाऱ्या आहेत. एक तीव्र चढाची तर दुसरी तीव्र उताराची. मागे मी पावसाळ्यात भीमाशंकर ट्रेक भोरगिरीहून केला होता आणि नंतर पावसाळा संपल्यावर लगेचच लोणावळा - भीमाशंकर असा रेंज ट्रेक केला होता. आता भीमाशंकर कडे जाणाऱ्या अजुन दोन वाटा जोखायची संधी STF मुळे आली होती.

आमचा STF चा (Sahyadri Trekkers Foundation), २ जानेवारीचा भीमाशंकर ट्रेक बैलघाटाने चढून, गणेश/गणपती घाटाने उतरणारा होता. वाकड ब्रीजखाली सकाळी ५ वाजता पीकअप घेऊन आणि आणखी पुढे एकदोन पीकअप घेऊन आमची बस आधी एक्स्प्रेसवेने आणि नंतर कर्जत कशेळे पार करत नांदगाव ह्या बैलघाटाच्या पायथ्याच्या गावी पोचली तेव्हा ८.३० वाजले होते. समोर अशक्य उंचीच्या भीमाशंकर डोंगररांगेच्या पायथ्याशीच एका housing project च्या प्रवेशद्वारावर, ट्रेक बद्दलची सविस्तर माहिती देऊन ट्रेकला लगेचच सुरुवात झाली. इतका निसर्ग संपन्न परिसर, अगदी समोरच अंगावर अतिशय दाट अभयारण्य मिरवणारी उंचच उंच भीमाशंकर डोंगररांग, डावीकडे रांगेपासून जरासा सुटा असलेला सिद्धगड, उजवीकडे दिसणारा पदरगड आणि ह्या हिरव्याकंच निसर्गाच्या अगदी पायथ्याशीच होऊ घातलेले, त्याला हानी पोहोचवणारे सिमेंट काँक्रिट चे जंगल.. किती विरोधाभास.

.

.

.

.

.

ह्या होऊ घातलेल्या "काँक्रीटीकरणातून" बाहेर पडल्यावर अगदी लगेचच बैलघाटाची वाट जंगलात शिरते. ही संपूर्ण घाटवाट अतिशय सुंदर अश्या घनदाट जंगलाने व्यापलेली आहे. त्यामुळे भीमाशंकर गाठेपर्यंत, जवळपास 1000 मीटर्स चढेपर्यंत, उन्हाचा त्रास कुठेही जाणवत नाही. मात्र ही वाट सुरू झाल्यापासून सतत वरच चढत जाते. मधेमधे ती आता कोरड्या पडलेल्या धबधब्याच्या मार्गातून जाते त्यामुळे भले मोठमोठे दगडधोंडे पार करत वर चढावे लागते. तुमच्या शारीरिक क्षमतेचा चांगलाच कस लागतो. हा संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर जंगलानुभव देणारा आहे. अतिशय उंचच उंच, 30/40 मीटर्सपर्यंत अनिर्बंध वाढलेले विविध प्रकारचे, हिरवेगार पण हिरव्या रंगांच्या विविध छटा परिधान केलेले वृक्ष, प्रदूषण रहित अतिशय स्वच्छ हवा, हवाहवासा वाटणारा सुखद गारवा.

.

.

.

.

.

जवळपास ६०% चढून झाल्यावर वाट पठारावर येते. इथे थोडा ब्रेकफास्ट ब्रेक घेतला. सगळे ग्रुप मेंबर्स येईपर्यंत थोडा टाईमपास केला. दाट जंगलामुळे पुढचे काही दिसत नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांचा चढ संपल्याचा समज झाला. पण पठारावरच्या नागमोडी वाटेने जेव्हा पुन्हा उंची गाठायला सुरुवात केली आणि थोडे मोकळंवनात आल्यावर बाजूचा उंच डोंगर पहिला, तेव्हा कळले अजुन बराच पल्ला गाठायचाय. वाटेच्या नागमोडी चालीमुळे आता भीमाशंकर जवळ आले असे वाटत असतानाच वाट अजुन अजुन एक वळण घेते आणि पुन्हा पुन्हा वर चढते. सकाळी ९ वाजता सुरू केलेली चढाई, भीमाशंकर मंदिराच्या कमानीजवळ आलो तेव्हा १२.१५ ला संपली.

.

.

.

.

.

.

.

ही आमची देवदर्शन करण्यासाठीची ट्रीप नसल्यामुळे कमानी जवळूनच भोलेशंकरांना मनोभावे नमस्कार केला. रविवार असल्यामुळे खूप गर्दी होती. आजूबाजूच्या दुकानांमध्ये, हॉटेल्स मधे खूप गजबजाट होता. त्यामुळे न थांबता कमानीच्या उजवीकडून पार्किंग पार करत पुढे निघालो. २००/२५० मीटर्स पुढे गेल्यावर लगेचच खांडसला उतरणारी गणपती घाटवाट सुरू होते. इथे वाटेवर थोडेसे पुढे जाऊन जंगलात पोटपूजा केली. पाणी बाटल्या भरून घेतल्या आणि पुढे निघालो. पुढे दोन वाटा फुटत होत्या तिथे थोडीशी गल्लत झाली. ज्या वाटेवर लगेचच उतार आहे, ती वाट बरोबर आहे असे कळल्याने आधी सरळ जाणारी वाट सोडून, दुसरी वाट जी उजवीकडे जात होती तिथे लगेचच उतार होता त्यामुळे ती वाट बरोबर आहे असे समजून तिथे खडूच्या खुणा केल्या आणि दोन्ही बाजूच्या झाडांना खुणेसाठी रिबिनी पण बांधल्या. पण पुढे ती वाट गच्च झाडोऱ्यात बुजलेली होती. मग परत मागे आलो. एक गावकरी भेटला त्याने सरळ वाट आहे तीच बरोबर आहे असे सांगितले. मग परत आधी केलेल्या खडूच्या खुणा बुजवल्या, झाडाच्या रिबिनी काढल्या आणि योग्य वाटेवर पुन्हा खडूखुणा केल्या आणि रिबिनी बांधल्या. कारण आपण चुकीच्या खुणा केल्या किंवा चुकीच्या खुणा नीट मिटवल्या नाहीत तर नंतर वाट शोधणाऱ्या ट्रेकर्ससाठी ती दिशाभूल होईल.

.

.

Padargad

Padargad closeup

आता संपूर्ण उतार किंवा अधेमधे डोंगराच्या कडेकडेने जाणारी सुंदर पायवाट होती. ही वाट उतरताना सुरवातीला काही वेळ झाडांचा आडोसा होता पण नंतर एकदा पठारावर आल्यावर झाडे विरळ झाली आणि मग उन्हाचा तडाखा जाणवायला लागला. बैलघाट चढताना जो पदरगड लांब दिसत होता तो आता जवळजवळ येत होता. पदरगडाला जाण्यासाठी खांडसहून गणपती घाटाचीच वाट पकडावी लागते. पदरगडाकडे जाणारी वाट पण दिसली. त्यावाटेजवळच एक काठोकाठ भरलेली विहीर होती. तिथे सगळ्यांनी पाणी बाटल्या भरून घेतल्या. थंडगार पाण्याने चेहरा धुतला. त्यामुळे थकवा दूर होऊन मस्त फ्रेश वाटले. विहिरी भोवती ग्रुप फोटोज् काढले. समोर भीमाशंकरला जाणारी शिडीची वाट दिसत होती. मागे वळून बघताना भीमाशंकर खूपच उंचावर दिसत होते.

.

.

.

.

आता वाट पदरगडाला डावीकडे ठेऊन पठारावरून पुढे निघाली आणि वाटेवरील सुंदर गणपती मंदिरा जवळून खाली उतरली. बाप्पाचे दर्शन घेऊन आम्हीपण त्या वाटेवरून उतरते झालो. एव्हाना ४ वाजले होते. पुढे झपाझप उताराची वाट उतरत अर्ध्या तासात खाली खांडस गावात पोचलो जिथे आमची बस उभी होती. फ्रेश होऊन सगळ्यांनी थोडे स्ट्रेचिंग केले. गरमागरम चहा पिऊन ६ वाजता पुण्याकडे रवाना झालो. जाताना लोणावळ्यापर्यंत खूपच गाढ झोप लागली. तळेगाव पासून काही लोकांना ड्रॉप करत करत, ९.३०/९.४५ वाजता बाणेरला अगदी घरासमोर हायवेवर बसने मला ड्रॉप केले आणि एका अती सुंदर घाटवाटेच्या ट्रेक ची सांगता झाली.

.

.

.

.

.

.

विवेक फाटक
०३.०१.२२