भाग २ येथे वाचा
------------------------
आज सहलीचा तिसरा दिवस. अर्धा दिवस भूजमध्ये भटकंती करून द्वारकेसाठी प्रवास करावयाचा होता. पण अंतर जास्त असल्याने वाटेत जामनगरलाच मुक्काम करणार होतो. ठरल्याप्रमाणे सकाळी नऊला नाश्ता आटोपून भुजकडे निघालो. वाटेत एका ढाब्यावर चहा घेतला. ढाब्यासमोर खाटा टाकलेल्या होत्या. माणसे येऊन बसली की लगेच प्रत्येकाच्या हातात बशी दिली जात होती व किटलीतून थेट बशीत चहा दिला जात होता. हीच पद्धत नंतर अनेक ठिकाणी दिसली. (चहा रु.१०/-प्रति बशी) चहा मात्र सर्व ठिकाणी उत्तम मिळाला.
आज प्रथम प्राग महालाला भेट दिली. सन १८६५ मध्ये प्रागमलजी २ यांच्या काळात सुरु झालेले महालाचे काम प्रागमलजी ३ यांच्या काळात सन १८७९ मध्ये झाले. कोरीव नक्षीकाम केलेले सुंदर खांब व मूर्ती हि येथील विशेषता. इटालियन मार्बल व राजस्थानातील रेतीचे दगड वापरण्यात आले आहेत. महालाचे काम करण्यासाठी अनेक इटालियन कारागीर असल्याने बांधकामावर तेथील शैलीचा प्रभाव आहे.
(प्रवेश तिकीट दर रु.२०/- , कॅमेरा ५०)
फुलांना कोणी हात लावू नये म्हणून रक्षणार्थ साप
पहिल्या मजल्यावर भव्य दरबार नजरेस पडतो.
महालाला लागूनच ४५ फूट उंचीचा मनोरा असून त्यामध्ये घड्याळ बसविण्यात आले आहे.
याच आवारात अजून एक महाल असून तो "आईना महल" नावाने ओळखला जातो.
कला व संस्कृतीची आवड असणारे महाराव लखपतजी यांच्या काळात सन १७५० ते १७६० च्या दरम्यान हा महाल बांधण्यात आला. लखपतजी यांचे कारागीर रामसंग मलम यांनी स्थानिक कला शैली व त्यावर यूरोपीय कलाकारी यांचा वापर करून अतिशय सुंदर कलाकृती निर्माण केल्या. रामसंग मलम यांनी १७ वर्षे हॉलंडला राहून तेथील कला व कसब आत्मसात केले होते.
महालात अनेक झुंबर, कारंजी, व अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले दरवाजे दिसतात. रामसंग मलंग यांच्या काही विशेष कलाकृतीही येथे आहेत. जसे हिंदू पंचांग दर्शविणारे लोलक असलेले घडयाळ, हिरे-मानके जडीत तलवार व ढाल, प्रत्येक पाऊल टाकल्यावर अत्तर उडवणारी पादत्राणे इ.
पहिल्या मजल्यावर हिरा महाल, फव्वारा महाल असे हॉल आहेत. हिरा महालमधील पलंगाच्या बाजूने सोन्याच्या फुलांची कलाकुसर केलेल्या चौकटीतील आरसे आहेत.
(तिकीट दर : रु.२०/- प्रत्येकी , कॅमेरा रु.१००/- मोबाईल रु.२०/- प्रत्येकी.)
महालात एका ठिकाणी मस्तानीचेही चित्र दिसले
कच्छ संग्रहालय
भूजच्या हमीरसार तलावाच्या काठावरील रस्त्याला लागूनच कच्छ मधील हे सर्वात जुने संग्रहालय. महाराव केंगारजी ३ यांच्या काळात मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या हस्ते याची कोनशिला बसविण्यात आली होती . येथे अनेक पारंपरिक वस्तू शिल्प, उत्खननात सापडलेले अवशेष इ. चे प्रदर्शन आहे.
रामकुंड
ही एक पारंपरिक पायऱ्यांची विहीर असून बाजूच्या भिंतींवर विष्णूचे दशावतार कोरलेल्या मूर्ती आहेत. संग्रहालयाच्या जवळच रामधून मंदिराच्या मागे एका अरुंद बोळात ही विहीर आहे.
येथेच एका धर्मादाय संस्थेमार्फत फक्त २० रुपयात पोटभर जेवण पुरविले जाते. जेवणाची वेळ झालेलीच होती. आम्हीही येथेच जेऊया का असा विचार करत होतो. तेव्हड्यात ड्रायव्हर बोलला गरजू लोकांसाठी ही सुविधा आहे त्यांना याचा लाभ घेऊ द्या. मी तुम्हाला भूजमधील प्रसिद्ध थाळी मिळते तिथे घेऊन जातो तेथे जेवा. (आमचा ड्रायव्हर भुजचाच रहिवासी होता)
दहा मिनिटात आम्ही "उमियाजी डायनिंग हॉल" ला पोहोचलो. लोक रांगेत उभे होते पण पाचच मिनिटात आमचा नंबर लागला. अप्रतिम थाळी जेवायला मिळाली. चार भाज्या, पोळी, पुरी, बाजरीची भाकरी (रोटलो), डाळ-भात , कितीतरी प्रकारचे लोणचे, कोशिंबीर, पापड, गोड पदार्थ, ताक, बटाटा वडा आणि असेच काही पदार्थ. कितीही खा. एकेक पदार्थ चाखता चाखताच पोट भरले. (थाळी रु.१८०/- प्रत्येकी)
दुपारी अडीचला भुज सोडले.येथून थेट द्वारकेला न जाता वाटेत जामनगरलाच मुक्काम करण्याचे ठरले होते. कारण अंतर जास्त होते. जामनगरच सात तास अंतरावर दाखवत होते. निघायच्या आधी गाडीतले शेवटच्या सीटवरचे सामान टपावर गेले. ड्रायव्हरने सीट आडवे पाडून मस्त बैठक तयार करून दिली. पुरुष मंडळींचा रमीचा डाव सुरु झाला. महिलाही हळू हळू पेंगल्या . जामनगरच्या आधी कच्छ सोडून कधी सौराष्ट्रात प्रवेश केला ते कळलेच नाही. वाटेत चहापाणी झाले.रहदारी जास्तच होती. आमचे हॉटेल जामनगरच्या थोडे पुढे महामार्गाला लागूनच होते. रात्रीचे साडेदहा वाजले पोहचायला. थोडेसे खाऊन बाहेर हिरवळीवर थोडीशी शतपावली केली आणि झोपायला गेलो.
आज सहलीचा चवथा दिवस.
जामनगर म्हणजे आमचा केवळ एक थांबा होता . येथे भटकंती करायची नव्हती. सकाळी नऊला नाश्ता करून द्वारकेसाठी निघालो. तीन तासाचा प्रवास होता. साडे बाराला आमचे बुकिंग असलेल्या हॉटेलला पोहचलो. आजचे हॉटेल होते गुजरात टुरिझमचे 'तोरण टूरिस्ट बंगला'. अगदी वाजवी दर , अगत्यशील कर्मचारी , स्वच्छता,टापटीप सगळेच आवडले. जेवणाची सोयही आहे. पोहचायला थोडा उशीरच झाला होता. आधी सांगून ठेवले असते तर लगेच जेवण मिळाले असते. आताही म्हटलात तर बनवू पण लवकर पाहिजे असेल तर एका खानावळीचा पत्ता देतो असे म्हटले. भुजप्रमाणेच येथील "श्रीनाथजी डाईनिंग हॉल " मध्ये चांगले जेवण मिळाले. (थाळी रु.१५०/-)
हॉटेलहून निघण्याआधी आज काय काय बघता येईल याची माहिती करून घेतली होती. बेट द्वारकेचे मंदिर ५ वाजता उघडते त्या आधी वाटेतला शिवराजपूर बीच बघता येणार होता. थोड्याच वेळात १०-१२ किमी वरील बीचवर पोहचलो. येथेही माणशी रु.३०/- प्रवेश फी आकारल्या गेली. बीचवर एक दीपगृह आहे. व किनाऱ्याने एक खडकांची रांग आहे. पुढे चालत गेल्यावर काही वॉटर स्पोर्ट्सही आहेत असे कळले. आम्ही पाण्यात उतरून थोडासा फेरफटका मारला , थोडावेळ तेथील खडकांवर थांबलो आणि परत फिरलो.
येथून २५ किमीवरील ओखा येथे पोहचून बेट द्वारकासाठी फेरी बोट पकडायची होती. चारपर्यंत आरामात पोहचलो. आम्हाला सोडून गाडी पार्किंगमध्ये गेली. एकामागे एक फेरी बोट येथून सुटतच असतात.
धक्क्यावर जातांना
आम्हीही लागलेल्या बोटीवर पटकन चढलो. पण पूर्ण भरल्याशिवाय बोट निघणार नव्हती. बोटीच्या सर्वबाजूने असणाऱ्या बाकड्यावर काही जण बसले. बाकीचे सर्व उभे . जवळपास सव्वाशे माणसे कोंबली. तेव्हा कुठे बोट सुटली. (तिकीट एका बाजूने रु.२०/-. स्वतंत्र बोट करायची झाल्यास जाऊन येऊन रु.५०००/-)
बोट सुटली आणि असंख्य पक्षी डोक्यावर घिरट्या घालायला लागले. प्रवाशांनी फेकलेला खाऊ टिपण्यासाठी त्यांची एकाच झुंबड उडत होती. डोक्यावर, कपड्यांवर टपटप करून पक्षांची घाणही पडायला लागली. कसेतरी डोक्यावर रुमाल, ओढणी टाकून उभे राहिलो. साधारण २० मिनिट वेळ लागला बेटावर पोहचायला.
ओखा ते बेट द्वारका रोडने जाण्यासाठी समुद्री सेतूचे काम सुरु आहे.
मंदिराचे प्रवेशद्वार
मंदिरात जायच्या आधी एका खिडकीवर चप्पल तर दुसऱ्या खिडकीवर कॅमेरा/मोबाईल सर्व जमा करावे लागते.
असं मानलं जातं की सुदामा आणि श्रीकृष्ण यांची भेट याच ठिकाणी झाली होती म्हणून याला भेट द्वारका (बेट द्वारका) म्हटले जाते. मंदिर ५०० वर्ष जुने असून सोबत आणखीही काही देव देवतांची (शिव, विष्णू, हनुमान, देवी) छोटी छोटी मंदिरे येथे आहेत .
आतमध्ये पंडे लोकांचा सुळसुळाट आहे. बरोबर काही लोकांना हेरून बाजूला काढतात आणि त्यांचा कार्यभाग साधून घेतात. पटापट दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो व परत बोटीने ओखा येथे पार्किंग केलेल्या गाडीत येऊन बसलो.
संध्याकाळचे सहा वाजले होते. २० किमी अंतरावरील नागेश्वर ज्योतिर्लिंग बघायचे ठरले. नागेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. पौराणिक कथेनुसार हे ठिकाण ज्या जंगल परिसरात आहे तेथे दारुका व दारूकी हि राक्षस जोडी राहात होती. व त्यांच्या नावावरून या जंगलास दारुका वन म्हटले जायचे व त्यावरूनच द्वारका हे नाव आले आहे.
मंदिराच्या बाहेर २६ मीटर उंचीची शंकराची मूर्ती आहे.
हा फोटो जालावरून साभार
येथे जास्त वेळ न थांबता आम्ही द्वारकेला पोहचलो.
येथील मुख्य मंदिर म्हणजे द्वारकाधीश मंदिर किंवा जगत मंदिर. असे मानले जाते की मूळ मंदिर २५०० वर्षांपूर्वीचे आहे. सांध्याचे मंदिर १५ ते १६व्या शतकातील असावे. मंदिराच्या शिखरावर एक खूप मोठा ध्वज फडकताना दिसतो. मंदिर दर्शनासाठी रात्री नऊपर्यंत उघडे असते. आजच दर्शन झाल्याने आता उद्या सकाळी लवकरच पुढच्या प्रवासाला निघता येणार होते.
मंदिरात फोन, कॅमेरा, वा कुठलीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मज्जाव आहे.
मंदिराच्या बाहेरून घेतलेला एक फोटो
क्रमश: