गुजरात सहल २०२१_भाग २

भाग १ येथे वाचा

विजय विलास पॅलेस पाहून मांडवीतून कच्छच्या रन साठी निघालो. थोडी भूक लागायला सुरुवात झाली होती पण जास्त वेळ वाया घालवायची इच्छा नव्हती. वाटेत दाबेली आणि तसेच काही पदार्थ एका गावातील छोट्याशा स्टॉलहून खरेदी केले. बाकी घरून आणलेलेही काही खाद्य पदार्थ होतेच. गाडीतच जेवण झाले.
भुज पार करून पुढे निघालो. एका ठिकाणी आपण काल्पनिक कर्कवृत्त रेषा ओलांडून पुढे आलो. यानंतरही संपूर्ण सहलीत काही वेळा नकळत कर्कवृत्त ओलांडणार होतो.

कच्छच्या रन प्रवेशासाठीचा ऑनलाईन परवाना काढायचा राहून गेला होता. वाटेत एका चौकीवर शुल्क भरून तो घेतला. (रु.१००/- प्रति व्यक्ती अधिक गाडीचे ५०).

साडे तीनपर्यंत भुजपासून साठ किमीवर असलेल्या होडका या गावात आमचे बुकिंग ज्या रिसॉर्टला होते तेथे पोहचलो. रिसॉर्ट पारंपरिक "भुंगा" प्रकारच्या घरे असलेले होते. या प्रकारची घरे गोलाकार असून वर छप्पर शंकूच्या आकाराचे असते. बांधकामासाठी चिखल,लाकूड, व गवताचा वापर केलेला असतो.
आम्ही दोन दिवसांकरिता सहा भुंगा आरक्षित केलेले होते. भुंगा बाहेरून जितके सुंदर वाटत होते तितकेच आतूनही होते. खिडक्या दारे, छत व त्यांची रंगसंगती खूपच आवडली.

चार वाजले होते. कच्छचे श्वेत रण पाहण्यासाठी निघालो . साधारण अर्ध्या तासात (२५किमी) येथे पोहचलो. रण सुरु झाल्यापासून थोड्या अंतरापर्यंत रस्ता आहे. येथे एक उंच लोखंडी मनोरा बनविला आहे ज्यावरून दूरपर्यंचे रण नजरेस पडते.
पावसाळा संपल्यावर पाणी भरलेला भाग सुकतो व समुद्री क्षारांमुळे उन्हात अतिशय शुभ्र असा चमकतो. मावळत्या सूर्यप्रकाशात येथील बदलत्या रंगछटाही सुंदर वाटत होत्या. चंद्रप्रकाशात विशेषतः पौर्णिमेच्या रात्री याचे सौंदर्य अधिकच खुलते.
दूरपर्यंत पसरलेले शुभ्र रण , येथील सूर्यास्त वगैरे बघण्यात अलौकिक आनंद आहे. उंटावरची फेरी व पगडी/पारंपरिक वेष भाड्याने घेऊन फोटो काढण्यात एक वेगळीच मजा.

पार्किंग

मनोऱ्याहून दिसणारा नजारा

मनोरा

उंट सफारी

सूर्यास्त

अमावसेची रात्र असून सुद्धा विद्युत झोतात झगमगणारे रण

काही नकारात्मक गोष्टी : गुजरात पर्यटन मंडळातर्फे डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या काळात येथे रणोत्सव आयोजित केला जातो. प्रत्यक्षात जागेवर असे काहीच कार्यक्रम होताना दिसले नाहीत. भरपूर पैसे मोजून गुजरात टुरिझमच्या टेन्ट सिटीत राहिलो तरच तिथले भव्य सेट, या काळात तेथे होणारे स्थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम वगैरे अनुभवता येतील. रेतीच्या वाळवंटात भुसभुशीत वाळूत चालायला, छोट्या मोठ्या वाळूच्या टेकाडांवरून घरंगळायला खूप मजा येथे. इथे मात्र दूर दूरपर्यंत ओलसर मिठाचा एकसखल थर असलेली जमीन. आराम करण्यासाठी थोडेसे कुठे बसण्याचीही सोय नाही. एकच एक स्थिर देखावा आपण बघणार तरी किती वेळ. ज्या गोष्टीचा इतका उदो उदो होतो आहे ती एकदा अनुभवली. परत परत जाण्याइतके हे ठिकाण मात्र इतके काही खास वाटले नाही.

अंधार पडल्यावर परत निघालो. टेन्ट सिटी ते रण या अंतरात वाटेत दुतर्फा काही खाण्यापिण्याचे तर काही कपड्यांचे, भेटवस्तूंचे स्टॉल लागलेले दिसले. आमचे जेवण रिसोर्टलाच असल्याने आम्ही मात्र थांबलो नाही.
जेवणानंतर आमच्या रिसॉर्टला स्थानिक कलाकारांचा गायनाचा कार्यक्रम झाला. बहुतेक गाणी गुजराती, कच्छी भाषेत होती. कच्छी भाषेतील काही शब्द कळत नव्हते पण कानाला गोड वाटत होते. मध्यभागी पेटवलेली शेकोटी थंडीला पळवून लावत होती. कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या भुंग्यात पळाले.

आज सहलीचा दुसरा दिवस. आज माता ना मढ़ (आशापुरा देवी), नारायण सरोवर , कोटेश्वर मंदिर, लखपत फोर्ट असा जवळपास अडीचशे-तीनशे किमी भटकंतीचा कार्यक्रम होता पण काहींना थोडा थकवा जाणवत होता त्यामुळे लांबचा प्रवास रद्द करून ढोलावीरा जाण्याचा विचार केला. कच्छच्या रण पासून नवीनच झालेल्या शॉर्टकटमुळे हे शक्यही होते पण ड्रायव्हरने नकार दिला. रस्ता कच्चा व काही ठिकाणी अरुंद आहे. मोठ्या गाडीने जाणे कठीणआहे असे त्याचे म्हणणे.. त्यामुळे हाही पर्याय संपला. शेवटी सकाळी जवळचेच एक ठिकाण "कालो डुंगर" व दुपारनंतर भुज जवळील खेडे भुजोडी व तेथील वंदे मातरम स्मारक याला भेट द्यायचे ठरले.

सकाळी नऊला कालो डुंगरसाठी निघालो. आमच्या रिसॉर्ट पासून एक दीड तासाच्या अंतरावरील डोंगर म्हणजे कच्छ मधील सर्वात उंच ठिकाण. आपल्या महाराष्ट्रातील डोंगर पहिले तर याला एखादी टेकडीच म्हणता येईल. समुद्रसपाटीपासूनची याची उंची ४६२ मीटर असून येथून दूरपर्यंतचे कच्छच्या रण नजरेस पडते. येथून फक्त ४०किमी दूर भारत-पाकिस्तान सीमा आहे. डोंगरावर ४०० वर्षांपूर्वीचे दत्त मंदिर आहे. आजूबाजूला श्वेत रंगाचे रण व मधे हा काळपट दिसणारा डोंगर म्हणून याचे नाव काला डुंगर पडले असावे.

वाटेत पक्षी दर्शन

कालो डुंगर

दत्तात्रय मंदीर

दुपारी जेवणाच्या वेळी हॉटेलवर परत आलो. जेवण आटोपून लगेच भूजोडीला जाण्यासाठी निघालो. भुजोडी हातमागावर विणलेल्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. लोकरी किंवा सुती शॉल , ब्लॅंकेट, गालिचे येथे रास्त दरात मिळू शकतात. भुजोडीला पोहचता पोहचता पाच वाजले. खरेदीला जायच्या आधी येथे असणाऱ्या वंदे मातरम स्मारकाच्या संग्रहालय व उद्यानाची तिकिटे आधी काढून घ्या असे ड्रायव्हरने सांगतले. घाई करूनसुद्धा संग्रहालयाची तिकिटे मिळाली नाहीत, फक्त उद्यानाची तिकिटे मिळाली यातच संध्याकाळच्या 'लाईट अँड साउंड शो" पाहता येतो. आतमध्येही हस्तकला व कपड्यांची दुकाने आहेत असे कळल्याने बाहेर फिरण्याचा विचार सोडून उद्यानात प्रवेश केला. हे स्मारक ब्रिटिश राजवटीशी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रसंगांची आठवण करून देते. हे भव्य स्मारक १२ एकर जागेत वसलेले आहे.

सेल्फी पॉईंट

सातचा लाईट अँड साउंड शो पाहून रात्री रिसॉर्टला परत आलो. आज रात्रीही येथे स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम होता तो जवळपास संपलाच होता. थोडा वेळ बाहेर शेकोटीजवळ गप्पा मारत बसलो. थंडी वाढायला लागली तसे सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले.

क्रमश: