गोवा सायकल दौऱ्याचा हा शेवटला भाग, या भागात सायकल दौऱ्यात निवास आणि भोजन कुठे केले याची माहिती आहे.

(दिवार बेटावर एक तळे)
निवास आणि भोजन
दौऱ्यात काही ठिकाणी निवासाची सोय मोठ्या हॉटेलमधे होती त्यामुळे ते जसे असायला हवे होते तसे होते. दिवार बेटावर आम्ही Mercure Devaaya Retreat या रिसॉर्टवर राहिलो होतो. हे हॉटेल मांडवी किंवा म्हादेई नदीच्या तीरावर होते. तीच गोष्ट शेवटल्या दिवशीच्या Beleza रिसॉर्टची आहे. हे रिसॉर्ट अगदी समुद्र किनारी होते. पाळोळे समुद्र किनारी असलेले Ciarans मात्र ठिकठाक होते.

(मॉलेम अभयारण्याजवळून जाताना)

तानशीकर स्पाईस फार्मचा अनुभव मात्र पूर्ण वेगळा होता. Tanshikar Spice Farm नेत्रावळी जंगलाच्या जवळच आहे. तिथे सेंद्रिय पद्धतीने (Organic) शेती होते. तानशीकर कुटुंब तिथेच राहतात. शेतात नारळ, सुपारी, कोको, पपई, अननस, काजू, हळद, विलायची, मिरे अशा विविध फळांची आणि मसाल्यांची झाडे आहेत. तिथे मधमाशांची शेती देखील करतात. शेतात त्यांनी काही कॉटेज बाधली आहेत. हि कॉटेज सर्व सोयींनी युक्त आहेत म्हणजे एसी, मोठा बेड, पंखा आंघोळीला गरम पाणी या सर्व सोयी आहेत. कॉटेजचे प्रकार आहेत मी Wooden Cottage मधे राहिलो होतो आणि छान होते. जंगलाच्या जवळच असल्याने प्रचंड शांत जागा आहे तसेच इथे रात्री इथे किर्र अंधार असतो. लाईट आहेत पण आपण किर्ऱ अंधारात, एका जंगलाच्या जवळ आहोत याची जाणीव होत राहते. या भागात फक्त BSNL चे नेटवर्क आहे. त्यांच्याकडे घरगुती पद्धतीचे जेवण होते. जेवणात त्यांच्या शेतातले मसाले वापरले होते त्यामुळे घरचे परंतु गोव्याच्या पद्धतीचे जेवण जेवल्याचा आनंद मिळाला. तानशीकर शाकाहारी आहेत परंतु त्याच्या इथले मसाले वापरुन ते मांसाहारी पदार्थ बाहेरुन बनवून घेतात. इथला बांगडा आणि सुरमयी चांगलेच लक्षात राहिले. जबरदस्त चव होती. मी त्यानंतर गोव्यात मासे खाणे टाळले कारण साधारणतः हॉटेल मधे साऱ्या पदार्थाना एकाच मसाल्याची चव येते. थोडा वेळ असता तर कदाचित शेताचा टूर सुद्धा करता आला असता. इथून बुडुबड तळे, सावेरी धबधबा पाच ते सात किमीच्या अंतरावर आहे. तुम्ही राहू शकता किंवा डे टूरमधे धबधबा, ट्रेक, शेताचा टूर करुन त्याच्याकडे जेवण करु शकता. ते त्यांच्या इथल्या मसाल्याची विक्रि देखील करतात. ही एका दुर्गम जंगलाच्या जवळच्या भागात राहायची सोय आहे, पंचतारांकित हॉटेल नाही याची जाणीव ठेवूनच इथे जायला हवे. पंचतारांकित सोयींची अपेक्षा ठेवू नये. तसेच जेवण किंवा इतर कुठलीही अक्टीव्हीटी करायची असेल ते आधी बोलून ठरवून गेलेले योग्य आहे.

(तानशीकर फार्म)

दुसरे लक्षात राहिण्यासारखे ठिकाण म्हणजे Dudhsagar Plantation आम्ही इथे पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो. हे ठिकाण भगवाण महावीर अभयारण्याच्या जवळ आहे. यांच्याकडे राहण्याची सोयसुद्धा आहे. कुळें रेल्वे स्टेशनपासून हे स्थान साधारण दहा किमीच्या अंतरावर आहे. इथले मुख्य वैशिष्ट म्हणजे इथे असलेला पोहण्याचा नैसर्गिक तलाव. मालकाने आम्हाला फेनी कशी बनवितात याची सविस्तर माहिती दिली. आम्ही फेनी विकत घेतली पण सायकलींग करीत असल्याने फेनी पिण्यासाठी रात्रीची वाट बघावी लागली परंतु इथे जंगल ज्यूस नावाचा प्रकार आम्ही पिला. त्यात उराक, लिमका, लिंबू आणि हिरवी मिरची असते. उराक म्हणजे काजूच्या फळाचे First distillation(मराठी शब्द?) फेनीच्या आधीची पायरी. उराक साधारणतः जानेवारी ते एप्रिलमधे मिळते परंतु काही मंडळी रेफ्रिजरेट करुन ठेवतात. उराकमधे अल्कोहोलचे प्रमाण फेनीपेक्षा कमी असते. परत त्यात इतर पदार्थ टाकल्याने आणखीन कमी होते. पुढे सायकलींग करायची असल्याने आम्ही छोटा ग्लास घेतला. रात्री फेनी प्रथमच प्यालो. मला तरी ती फेनी ऑन द रॉक व्हिस्की सारखी वाटली. जेवण घरगुती पद्धतीचे ठिकठाक होते. इथली आणखीन एक गंमत लक्षात राहिली. त्यांच्याकडे एक देशी कुत्रा होता. त्याला लगेच आमचा लळा लागला. तो आमच्यासोबत जवळ जवळ पाच किमी अंतर घरापासून दूर आला. मालकाला काळजी लागली की कुत्रा खूप लांब गेला तर घरी परत येऊ शकणार नाही. आपण आता भटकलोय याची जाणीव कुत्र्याला देखील व्हायला लागली होती. शेवटी एका ठिकाणी आम्ही थांबलो, मालक गाडी घेऊन आला आणि कुत्र्याला घेउन गेला. तेंव्हा कुठे मालकाचा आणि कुत्र्याचा दोघांचाही जीव भांड्यात पडला. मॉलेमच्या अभयारण्यात जाण्यासाठी नेचर नेक्स्ट नंतर हा एक पर्याय होऊ शकतो. इथून दूधसागर सुद्धा जवळ आहे. मी इथे राहिलो नाही त्यामुळे राहण्याच्या सोयीविषयी फार सांगू शकणार नाही. हे स्थळ सुद्धा जाऊन धडकण्यासारखे नाही तर बोलून ठरवून गेलेले उत्तम.

(दूधसागर प्लांटेशन)
खाण्याच्या बाबतीत लक्षात राहिलेले एक छोटे ठिकाण म्हणजे काणकोण मधले दयानंद हॉटेल आणि तिथला गोवाच्या पद्धतीचा नाष्टा विशेषतः केळी घातलेला गरमागरम बन. गोव्यातील नाष्टा म्हणजे भाजीपाव होताच पण बन निव्वळ अप्रतिम होता. भाजीपाव मला नॉर्मल वाटला, तसा भाजीपाव बऱ्याच ठिकाणी खाल्ला आहे. मिक्स भाजी म्हणजे उसळ ज्यात बटाट्याची सुकी भाजी घातली होती. हे हॉटेल काणकोण चावडीच्या तिथेच आहे. तसेच कोला बीचच्या चढाच्या पायथ्याशी एक छोटेसे हॉटेल होते. ते स्रियांच्या सेल्फ हेल्प ग्रुपने चालविले होते. तिथे नारळ पाणी, चहा अशा गोष्टी मिळत होत्या. तिथे खालेला वडापाव चविष्ट होता. कदाचित खूप थकल्याने अधिक चविष्ट लागला असेल पण लक्षात राहिला. आम्ही दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी तिथे थांबलो होतो.

(शेवटल्या दिवशी मधे कुठेतरी. )
शेवटी
४ डिसेंबरला म्हणजे नौदल दिवस त्यादिवशीच नौदलाचे प्रमुख केंद्र असलेल्या गोव्यात, आमच्या गोवा सायकल दौऱ्याची सांगता झाली. एक योग असा होता की दौऱ्याचे चार दिवस मी ज्या व्यक्तीसोबत रुम शेअर करीत होतो ती व्यक्ती निवृत्त नौदल अधिकारी होती. त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर I was submariner for 22 years. दुसरी गंमत म्हणजे जेव्हा आम्ही काणकोणवरुन चढ चढून जेंव्हा गडावर पोहचलो तेंव्हा आयोजकांनी आम्हाला एक सुखद धक्का दिला. आमच्या ग्रुपमधील एकाचा वाढदिवस त्यादिवशी हिलटॉपवर जंगलात, फॉरेस्ट चौकीच्या बाजूला केक कापून साजरा केला. त्या बर्थडे बॉय़ला देखील याची कल्पना नव्हती. हा वाढदिवस त्याला कायम स्मरणात राहिल. अर्थात कोणताही कचरा होणार नाही याची संपूर्ण काळजी घेतली होतीच. असे दौरे म्हटले की नवीन ओळखी, चर्चा, गप्पा या होणारच. नेहमीची चौकट मोडली की हे असे योग येतात, असे व्यक्ती भेटतात, वेगळ्या जगाची माहिती होते. याच छोट्या छोट्या गोष्टी सायकल दौरा करायला प्रेरीत करतात नाहीतर फिटनेस तर काय घरात ट्रेडमिल वर पळून देखील मिळवता येतो. मी काही फार फिट नाही मला सायकलवर काही कठीम चढ चढताना त्रास होतो. परंतु जो अनुभव असतो तो खूप वेगळा आणि आनंददायी असतो म्हणूनच मला हा दौरा संपताना आता पुढचा दौरा कधी करायचा याचे वेध लागले होते.

(समारोप वेताळभाटी)
जाता जाता
गोव्यातील मंडळींची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे फुटबॉल, त्यामुळे सायकलींग करताना बऱ्याच ठिकाणी फुटबॉलचे मैदान दिसले. ISL सीझन असल्यामुळे फुटबॉल टिमच्या बसदेखील दिसल्या. आम्ही ज्या Beleza रिसोर्टला आमचा दौरा संपविला त्याच्या बाजूचे रिसॉर्ट Mumbai City FC संघाने राहण्यासाठी घेतले होते. तसेच दौरा संपल्यानंतर असनोडाला मी कुटुंबासमवेत जिथे थांबलो होतो त्या रिसॉर्टमधे Goa FC ची टिम थांबली होती. तिथे तो बायोबबल वगैरे प्रकार होता. बरेच देशी विदेशी खेळाडू दिसले पण मी कुणाला ओळखत नव्हतो.
(समाप्त)
मित्रहो
http://mitraho.wordpress.com/