body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
आज आबासाहेब लई दिसांनी शिळवाडीच्या इठ्ठलाच्या मंदिरात कीर्तनासाठी आलं व्हते. त्ये इठ्ठलावर रुसलं व्हतं. इतकं दिसं त्यांचं चित्त थाऱ्यावरच नव्हतं. गेला महिनाभर त्ये कुनासंगच बोलत नव्हतं का कुनाला भेटत नव्हतं.
आबासाहेबांना नमस्कार करून बुवांनी कीर्तनाला सुरुवात केली. `` जय जय राम कृष्ण हरी I विठोबा रखुमाई I विठोबा रखुमाई I``
मंडळी, तुकोबारायांनी म्हणूनच ठेवलयं, `` सुख पाहता जवापाडे I दु:ख पर्वताएवढे I`` लोकहो, आपल्या संसारात सुख-दु:ख दोन्ही असतं. सुखापाठोपाठ दु:ख येतंच पण आपल्याला सुख इवलुसं वाटतं आणि दु:ख पर्वताएवढं वाटतं.
`` खरं हाय, माजं दु:ख तर गगनाएवढं हाय.`` आबासाहेब हळूच पुटपुटलं.
बुवांनी हळूच आबासाहेबांकडं पाहिलं. आबासाहेब शांतपनं डोळं मिटून खांबाला टेकून बसलं व्हतं. कीर्तनात त्यांचं लक्षच न्हवतं. ते आपल्याच विचारात बुडून गेलं व्हतं. नजर थिजलेली, मनात प्रश्नांची भुतावळ उठलेली, तरणाताठा संपत गेल्याचं मोठ्ठं दु:ख. कसं पचवायचं हे सारं? मनात घोंघावणारं वादळ कसं थोपवायचं? हे दु:ख कसं पेलवायचं या वयात? चुकलं कुनाचं? माजं.... का संपतचं....? उत्तर घावतचं नाय. आन त्ये घावनार तरी कसं? कोन दिल याचं उत्तर? आबांना भोवळ आल्यासारखं झालं.
बुवांच्या ते लक्षात आलं. त्यांनी आपलं कीर्तन थांबवलं. आबांच्या जवळ बसत त्यांनी आबांचा हात हातात घेतला आणि आबांना भानावर आणण्याचा प्रयत्न केला. `` आबा, दैवभोग बघा हे सारे. प्रत्येकाच्या वाट्याला येतातच ते. सावरा स्वतःला. मोकळं करा तुमचं मन. तेवढाच मनावरचा भार हलका होईल.``
बुवांचं बोलनं ऐकून समदे आबांभोवती गोळा झालं. आबा भानावर आलं. गुडघ्यावर हात देत उटायचा प्रयत्न करू लागलं. पन तोल जात व्हता. जानबा आन भिकोबांनी त्यांना हाताला धरून उटवलं. हळूहळू पावलं टाकत आबा घरी जायला निघालं.
पांडूतात्यांनी आबांना वाड्यातल्या वसरीवरल्या झुल्याव आनून बसवलं. त्यांची चाहूल लागताच आक्कासाब धडपडत उठून भायेर आल्या. त्यांनी तर संपत गेल्यापासून हातरुनच धरलं व्हतं.
आक्कासाहेबांना पाहताच पांडूतात्या म्हनाले, `` आवं आक्कासाब, तुमी कशापायी उटून आलास. म्या हाय की आबासायबांच्या सोबत. त्यांना नीट झ्वाप लागल्याबिगर म्या काय मागारी जात न्हाय बगा. तुमी पडा आत जाऊन.``
`` माजातरी कुटं डोळा लागतोय पांडबा. सारका, `` आये, तू तरी समजाव नं गं आबांना. त्ये तुजं ऐकत्याल.`` असं म्हननारा संपतचा चेहराच येतोय बगा डोळ्याफुडं.``
पांडबानं आपलं डोळं टिपत म्हनलं, `` खरं हाय आक्कासाब, पन आता दैवगतीफुडं कुनाचं काय चालतंय व्ह्य? इस्वरइच्छा म्हनायचं, आन दुख गिळायचं बगा. दुसरं आपल्या हातात हाय तरी काय आता?``
आबासायबांना लईच गळाठल्यागत झालं. पांडबानं त्यांना आत निऊन झोपावलं आन आक्कासायबांचा निरोप घिऊन त्ये घरला ग्येले.
आबासायबांनी लईयेळ झोपायचा प्रयत्न क्येला. पन रातभर तळमळत राह्यलं. म्या संपतवर अन्याव क्येला का? त्याचं म्हननं मानायला पायजे हुतं का? पर त्ये मान्य तरी कसं करनार? त्येची मागनी इपरीतच व्हती. आत्तापातुर जीवापाड जपलेल्या काळ्या आईचं तुकडं करायंचं म्हनतं व्हता त्यो. आन निस्तं तुकडंच करायंचं न्हाय, तर त्याज्या वाटंचा तुकडा ईकायचा म्हनत व्हता त्यो. वाडवडलांच्या काळ्या आयचं कंदी तुकडं करत्यात का? आन त्यी कंदी ईकत्यात का? आन बास्नी ह्या काळ्या आयला जीवापल्याड जपायचा सबुद दिलाय, त्येचं काय? जनमदात्या आयपरीस ज्यादा जीव हाय ह्या काळ्या आयवर.
या माज्या काळ्या आयला ईकायची? सुकाळात-दुस्काळात काय बी कमी पडून दिलं नाय ह्या काळ्या आयंनं. बाच्या वाडवडलांनी, बानं, आनं म्या बी ह्या काळ्या मातीत पिकल्यालं धान्यधुन्य, फळं- भाजीपाला गरीबा-गुराबाला वाटला. घरातल्या, रानातल्या हिरीचं पानी उपसून-उपसून समद्यांसनी पाजलं. म्हनुनच आत्तापत्तूर कंदी काय कमी पडलं नाय. गाव कंदी कोरडं ऱ्हायलं नाय. कुनीबी उपाशी-तापाशी झोपलं नाय.
आबांचं डोळं पाझरायला लागलं. संपतच्या जान्याच्या अतीव दु:खानी का काळ्या आयंच्या मायेपोटी त्ये काय आबांना कळलं नाय. रातभर त्ये टिपं गाळत बसलं. रातभर त्येंच्या डोळ्याफूड नजर जाईल तिथपत्तूर पसरल्यालं, तरारलेल्या पिकांनी डुलनारं त्ये काळ्या आयंचं शिवार येत राह्यलं.
आबांच्या वाडवडलांची पन्नास एकर बागायती जिमीन व्हती. आबांच्या आन आजूबाजूच्या शिवारांची तहान भागवनाऱ्या दोन हिरी व्हत्या. पाटातनं झुळझुळ वाहनारं पानी व्हतं. त्यावर फळझाडं- फुलझाडं तगली व्हती. आमराई आंब्यांच्या झाडांनी बहरत व्हती. थोरल्या सदानं पिरमानं जपल्याली फुलशेती व्हती. चाफा-मोगरा, जाई-जुई-चमेलीच्या येली आसमंत सुगंधानी भरून टाकायच्या. उनाल्यात निळा-जांभळा, केशरी गुलमोहोर फुलायचा. दराक्षाच्या भारानं येली वाकून जायच्या. शिवाराच्या बांधावर कडूलिंब, चिंच, आवळा, रामफळ, सीताफळ, पेरू, चिक्कू, डाळिंब, जांभळाची झाडं व्हती.
आबांचं शेत म्हनजे सगळ्याचं ईश्रांतीस्थान. हुरडा-हुळा खायला, कैऱ्या-आंबे तोडायला गावातले, पावणे-रावळे हक्कानं यायचे. बिनधास्त कुनीबी चिंचा-आवळे-बोरं तोडून खायचे. आबांनी कंदीच कुनाला आडकाठी केली नाय. निसर्गाच्या लहरी, वादळ-वारं झेलत काळ्या आयंनं भरभरून दिलं. तिनं जेवढं दिलं तेवढं आबा सायबांनी गोड मानून घ्येतलं. त्यामुळंच काळी आय त्यांच्यावर प्रसन्न व्हती.
अश्या या काळ्या आयंचं कुटं तुकडं करायंचं आन कुनाला इकायचा त्यो काळजाचा तुकडा? त्ये बी का तर पैशाच्या लोभानं? आबांनी त्यांच्या उभ्या जिंदगीत असा इचार ना कंदी क्येला व्हता ना मरोस्तवर करनार व्हते. पन संपत मात्र पैशासाठी काळ्या आयंला इकायला तयार व्हता. तसा त्याचा हट्टच व्हता. त्यासाठीच त्यो आबांशी मधूनअधून शेताच्या वाटणीचा विषय काडायचा. आडूनआडून जिमीन इकायची भाषा करायचा. पन आबांनी त्येला भिक घातली नव्हती. त्यो तंडला, रडला-भेकला तरी आबा त्येला पैसं दिऊन गप करायचे. आबांच्या पैश्यांवर संपत शहरात जाऊन चैन करायचा. पैसं उडवायचा.
लहानपणापासून संपत ह्ये जरा येगळच प्रकर्ण व्हतं. एक नंबरचा हट्टी आन सोताचंच म्हननं खरं करनारा. त्यातून शेंडेफळ म्हनून लाडावलेला पोरगा. आबा त्येचा सबुद कंदी खाली पडू द्यायचं नाय. त्येची हरएक मागनी पुरी करायचे. पन त्यामुळं त्यो शेफारला. ऐदी झाला. आक्का-आबांना जुमानेसा झाला. पन पोरवय हाय, समज आल्यावं सुधरंल म्हनून आबांनी त्येला संभळून घ्येतलं. अंजारलं-गोंजारलं. गोडी-गुलाबीत समजवलं.
त्येला अब्यासात डोकं व्हतं. त्यो शहरात जाऊन शिकला. अब्यासात प्रगती केली. पन त्याबरुबरच पैसं उडवायला बी शिकला. त्येच्याकडचा पैसा बगून चांडाळचौकडी त्येच्या मागंफुडं करायला लागली. त्येच्याच पैशावर ऐशआराम करून त्येला कंगाल बनवलं. मंग त्यो आबांकडं सारकं पैशे मागू लागला. त्येची पैशाची मागनी वाढतच चालली. त्या चलाख चांडाळचौकडीनं त्येच्याकडंनं पैसं उकळण्यासाठी त्येच्या डोस्क्यात बिजनेसचं खूळ भरवलं. आबांकडून भांडवलासाठी २५-३० लाख रु. आन म्हनून त्येच्या मागं लागलं. संपतची पन बुद्धी फिरली. त्येला बिजनेसची स्वप्नं पडू लागली. त्येला दोस्तांची शेतीचा एखादा तुकडा काढून पैशे उभे करायची आयडिया पटली. आडूनआडून त्यो आबांना तसं सुचवू लागला. आक्का साहेबांना मधी घालून आबांचं मन वळवू लागला. पन आबांनी त्येला काय भिक घातली नाय. २-३ लाख रु. बिजनेससाठी द्यायंचं कबूल क्येलं. पन संपतची स्वप्नं मोठी होती. त्येला २-३ लाखात बिजनेस सुरु करायचा नव्हता.
आबा इतकं पैशे देत नाय म्हनल्यावर बिजनेससाठी त्या चांडाळचौकडीनं संपतच्या नावावर एका शेठकडनं १५ लाख रु. उसने घेतले. झोकात बिजनेसची सुरुवात केली. पन ऐषोआरामाच्या नादात बिजनेसकडं कुणाचंच लक्ष नव्हतं. लौकरच बिजनेसचे बारा वाजले आन संपतच्या डोक्यावर सतरा-अठरा लाखाचं कर्ज झालं. शेठ सारखी पैशाची मागनी करू लागला. चांडाळचौकडीतले दोस्त एकेक करून पसार झाले. संपतला टाळू लागले. चांडाळचौकडीच्या जाळ्यात फसल्याचे संपतच्या लक्षात आलं. आता त्येला आबांकडून पैशे घेण्याशिवाय दुसरा मार्ग दिसंना. त्यातच शेठनी पैशे परत देण्यासाठी फकस्त आठ दिसांची मुदत दिल्यावर संपत हडबडला.
त्या तिरमिरीतच त्यो गावाकडं आला. नेमकीच तवा त्येची जयादीदी माहेरपनाला आली व्हती. त्यांनी जयादीदीला सारी कहानी सांगितली. त्ये ऐकून जयादीदी पन गडबडली. पन आक्कासायबांच्या मध्यस्थीनं आबांशी बोलायचं वचन तिनं दिलं. संपतला थोडा धीर आला. आबांचा चांगला मूड बघून त्या दोगींनी आबांकडं संपतच्या बिजनेसचा ईषय काढून पायला. पन आबा काय एवढं पैशे द्यायला तयार नव्हतं. त्यांनी तसं स्पष्टचं सांगितलं. मंग संपतनी आक्का सायबांकडं त्यांचं दागिनं इकून पैशे देन्याची गळ घातली. पन आक्कासाहेब आबासाहेबांच्या अपरोक्ष एवढा मोठा सौदा करू शकत नव्हत्या.
संपत पुरा खचून गेला. इथूनच कुटंतरी गायब व्हावं. परत शहरात जायलाच नको असं त्येला वाटायं लागलं. पन कुटं जावं? शेठनी दिलेली मुदत संपत आली व्हती. संपत सैरभैर झाला. काय करावं ते त्येला समजतच नव्हतं. तशातच शेठचे पैशाचे तगादे लावणारे फोन यायला लागले. संपतला आबांकडं जमिनीच्या वाटणीचा विषय काढण्यावाचून दुसरा मार्ग दिसत नव्हता. संपतनं रातभर लई इचार क्येला. इचार करून करून डोस्क फुटायची येळ आली.
शेवटी दुसऱ्या दिशी सक्काळीच, आबा शेतात जायच्या आधी त्येंच्याकडं जिमीनीच्या वाटणीचा विषय काढला. `` आबा, मला काय शेतीभाती करायची आवड नाय. मी शहरात जाऊन बिजनेस करनार हाय. त्यासाठी मला २५-३० लाख भांडवल पायजेल. तुमी तर काय एवढं भांडवल द्यायला तयार नाय. तवा मला जिमिनीतली माजी वाटणी द्या. जिमीन इकून म्या माजं भांडवल उभं करतो.`` तिरमिरीत मागचा-पुढचा काय बी इचार न करता संपत बोलून ग्येला.
संपत असं कायतरी बोलंल असं आबांना सपनात बी कंदी वाटलं न्हवतं. जिमिनीची वाटणी? काय बोलतोय संपत? का म्याच कायतरी चुकीचं ऐकतोय? आबांना कळलंच नाय. त्यांना भोवळ आल्यासारखं झालं. झुल्याचा आधार घेत त्ये मटकन खाली बसलं. संपतनी त्येंना आधार दिला. पन त्येचा हात जोरात झटकत आबा गरजले, `` संपतराव, काय बोलताय तुम्ही? काय कळतंयं का? डोकं ठिकाणावर हाय का तुमचं? आवं, माज्या काळ्या आयंचं तुकडं कराय सांगताय. त्यापरीस माजंच का नाय तुकडं क्येलं तुमी. ह्ये ऐकण्यापरीस सुटलो तरी असतो येकदाचा.``
आबांचा चढलेला आवाज ऐकून आक्का साब, सदादादा, जयादीदी पळत वसरीवं आलं. आक्का सायबांनी आबांना सावरलं. त्येंना पानी प्यायला दिलं. आबा थोडं शांत झालं. मंग आक्का सायबांकडं वळून बोललं, `` मालकीणबाई, ऐकलं का तुमचं चिरंजीव काय बोलत्यात त्ये. जिमीनीतली वाटणी पायजे त्येंना. माज्याकडंनं तरी ह्ये काम काय व्हायचं नाय. म्या जित्ता हाय त्योपत्तूर तरी ह्या जिमिनीची काय वाटणी व्हायची नाय.``
`` तुमाला काय मार्ग सुचत असंलं तर सांगा. तुमच्या चिरंजीवांना बिजनेससाठी २५-३० लाख रुपयं पायजेत. त्ये भांडवल त्ये जिमीन इकून उभं करनार हायंतं म्हनं. ``
`` मालकीणबाई, बोला कायतरी. मार्ग सुचवा.``
ह्ये सगळं ऐकून आक्कासाब तर लटलट कापायलाच लागल्या व्हत्या. त्येंच्या तोंडून शब्दच फुटत नव्हता. कसाबसा धीर गोळा करून त्या बोलल्या, `` संपत, तू काय बोलतो, तुजं तुला तरी कळतंय का? आबा सायबांशी असं इपरीत कायतरी बोलायची तुजी हिम्मत तरी कशी झाली? आमी तुला काय कमी केलं म्हनून तुला अशी आकाबाय आटवली.``
जयादीदी मधे पडली. `` आक्कासाब, पोरवय हाय संपतचं, अजाण हाय. कुनाला काय बोलायंचं ह्याचा पाचपोच न्हाय त्याला. तुमी त्याला समजून सांगितलं तर ऐकंल त्यो. व्ह्य ना रे संपत?``
संपतनं मान डोलावली. आक्का सायबांचं मातृहृद्य कळवळलं. आपन तरी पोराला आसं बोलायला नगं. बिथरेल पोरगं आणखी. त्येला समजून सांगाया पायजे.
त्या समजुतीच्या स्वरात बोलल्या, `` आरं संपत, ती जिमीन म्हंजे निस्ती दगड-माती नाय रं. आपल्या वाडवडलांचा वारसा हाय त्यो. त्यांची पुण्याई हाय. आपली नाळ जोडलेली हाय त्या जिमिनीशी. आपल्या वाडवडलांनी, तुज्या आबांनी घाम गाळलाय त्या जिमीनीत. कष्ट केल्यात, रगात आटवलंयं तवा कुटं आजचं दिस आल्यात. तुला आजचं या जिमीनीचं वैभव दिसतंय त्यामागं आबांची मेहनत हाय. आबांनी आन गावकऱ्यांनी सरकारदरबारी सतरा खेटं घातलं, अर्ज-इनंत्या क्येल्या तवा कुटं धरणाचं काम झालं बग. धा वर्षामागं धरण झाल्यापासनं आपल्या गावची शेतं अशी हिरवीगार दिसत्यात. त्याआदी काय एवढं पिकपाणी येत नव्हतं. निस्त्या पावसावर एवढं पिकं येत नाय बाबा.``
संपत जरा शांत झालाय असं बगून आबासाहेब बोलले, `` आरं, संपत, तुजं नशीब समज, तुला वारशानं येकाजागी एवढी जिमीन मिळालीय. ज्यांच्याकडं इंचभर सुदिक जिमीन नाय त्यांच्याकडं बग म्हंजी तुला कळल की तू किती भाग्यवान हाय ते. तळमळत्यात इंचभर जिमिनीसाठी सुदिक रं.``
`` त्याचं कशाला, ज्यांची जिमीन धरणाखाली ग्येली, त्ये लोकं येडीपिशी झालती रं जिमिनीसाठी. म्हातारे-कोतारे ढसाढसा रडलं रं काळ्या आयंला सोडताना. सरकारनं दुसरीकडं घरं-जिमिनी दिल्या. पन त्ये उपरं जिणं रं. रमले नाय तिथं त्ये. कित्येकजन तर धरन बांधून झाल्यावर बी येत व्हतं आपली जिमीन बगाया. पान्याखाली असली तरी आपली जिमीन तिथं हाय याचंच सुख व्हतं बग त्यांना.``
संपतला आपलं बोलनं पटतंय असं वाटलं म्हनून आबा समजुतीच्या स्वरात बोलले, `` ठीक हाय संपतराव, तुमाला जिमिनीशी काय लळा नाय. लहानपनापासून तुमी जिमिनीशी कंदी नातं जोडलं नाय. त्यामुळं त्या काळ्या आयंचं दु:ख तुमाला कळायंचं नाय. सोडून दिऊ त्यो ईषय.``
`` तुमाला बिजनेस करायचा हाय ना? ठीक हाय. म्या तुमाला कुटूनतरी सात-आठ लाखाची सोय करून देतो. आजपत्तूर म्या कंदी कर्ज काडलं नाय. पर तुमच्यासाठी काडतो कुटूनतरी. तुमचा बिजनेस सुरु झाला की फेडा तुमी त्ये.``
सदादादाबी बोलला, `` म्या लय नाय, पन दोन-तीन लाखाची सोय करतो. मंग धा लाख व्हत्यात की. जमंल ना तेवढ्या पैशात?``
आक्कासायबांचा राग बी जरा शांत झाला. त्या बोलल्या, `` म्या काय म्हनते संपत, ह्ये दोगंबी मिळून तुला धा लाख रुपय द्येत्यात तर शहरात जान्यापरीस हितंच का नाय एखादा बिजनेस करत. आपल्या हिथं जागाबी हाय. तूबी आमच्या डोळ्याम्होरं ऱ्हाशील. आता तुज्या लग्नाचं बी बगायचं हाय. मंग त्ये बी जमंल.``
तिथलं वातावरण जरा निवळतंय म्हनल्यावर जयादीदी बोलली, `` मंग ठरलं तर संपत, तू तुजा जिमिनीचा आन वाटणीचा ईषय सोड. वाटणी-बिटणी काय नगं. ज्ये काय हाय त्ये समदं तुमच्या दोगांचच हाय. मला त्यातलं काय बी नगं. म्या माज्या घरी सुखी हाय. तू हिथंच कायतरी बिजनेस सुरु कर.``
सदादादाबी बोलला, `` आरं, संपत, आपन दोगं आत्तापत्तूर राम-लक्ष्मणागत राह्यलो. आत्ताच कशाला ह्यो वाटणीचा घोळ. मला वाटणी-बिटणी काय नगं. समदं तूच घ्ये. म्या तुज्या शेतात राबून माज्या पोटापुरतं कमवंल. मंग तर झालं? आता हा इषय सोड. आपल्या घरात तंटा-बखेडा नगं. आरं इतकं दिस आबांनी समद्या पंचक्रोशीचं तंट-बखेडं सोडवलं. बाबानु जिमिनीवरनं तंडू नका म्हणून हात जोडून इनंती केली. लोकांनी बी त्ये मानलं. म्हनूनच तर `` तंटामुक्ती गाव`` म्हनून आपल्या गावाला बक्षीस भेटलं. तू भांडू-तंडू नगं बाबा. हिथंच सुखानं ऱ्हा.``
`` हिथंच ऱ्हा म्हनं. हाय काय या भुक्कड गावात?``
`` आरं, आपल्या गावात डांबरी सडक हाय, शिमिटीचं बंधारं हायंती, पानी-ईज, गोबर गैस हाय, कुक्कुटपालन हाय, अंगणवाडी हाय. गावाचा पाणलोट इकास झालाय. वृक्षारोपण केलंया. आदर्श गावाचा पुरस्कार हाय आपल्या गावाला. अजून काय पायजे?``
संपत ह्ये कायबी ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. त्याला शेठचा क्रूर चेहरा दिसत होता. पैशे नाय दिलं तर मला काय त्यो जिता सोडनार नाय. पन ह्ये सगळं ह्यांना कसं सांगनार? संपतची चांगलीच गोची झाली व्हती. हिकडं आड न तिकडं हीर.
कसंबसं अवसान आनत त्यो बोलला, `` माजी २५-३० लाखाची सोय झाल्याबिगर म्या काय हितनं हालत नाय. आन त्ये जिमीन इकल्याबिगर व्हईल असं मला वाटंत नाय.``
संपत काहीकेल्या आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. आता काय करायचं? सगळेच चिडीचूप बसले.
सगळ्यांची नाष्टा-जेवणं व्हायची व्हती. म्हनून आक्कासाब बोलल्या, `` चला, समद्यांनी आदी नाष्टा करून घेऊ. मला अन जयाला जेवणाचंबी बगायचं हाय. चला, उटा.`` असं म्हणून आक्का साब आन जयादीदी आत ग्येल्या.
आबासाब बोलले, `` संपतराव, आता लई इचार करू नगासा. आठ-धा दिस शांतपनं इचार करा. आन मग ठरवा काय ते.``
पण संपत इरेलाच पेटला व्हता. त्यो कुनाचंच काय ऐकत नव्हता. त्यो बोलला, `` आता इचार नाय आबा साब, या मिटिंगीतच काय त्यो फैसला करायचा. मला माज्या वाटणीची जिमीन पायजे म्हंजे पायजे. आन मला ती इकायची हाय. दुसरा काय उपाय नाय.``
संपत हटूनच बसला. आबासाब निरुत्तर झालं. कुनी याच्या डोसक्यात ह्ये खूळ भरवलं देव जानं. हताश होऊन त्ये गप बसून राह्यले.
आता हा पोरगा असा ऐकायचा नाय. त्याला जरा धाकच दावायला पायजे. म्हनून धीर गोळा करत आक्का साब निर्धारानं बोलल्या, `` ती जिमीन आपल्या वाडवडलांची हाय. आमी दोगांनी नानासायबांना ही जिमीन जीवापल्याड जपायचं वचन दिलं हाय. आमच्या जीवात जीव हाय त्योपत्तूर आमी दोगंबी त्ये वचन मोडू शकत नाय आन मोडनार बी नाय.``
`` तुला वाटणीच पायजे असंल तर आदी आमच्या दोगांच्या अंगावरनं ट्रक्टर का काय हाय ना ते फिरव आन मंग घ्ये तुला काय वाटणी घेयाची ती.``
आबांनी पन आक्कासायबांना दुजोरा दिला आन संपतला ठणकावून सांगितलं, `` आमी दोगं जित्त हाय त्योपत्तूर काय तुला वाटणी मिळायची नाय. मंग ती जिमीन इकन्याची भाषा तर दूरच. तू त्यो इचार बी करू नगंस.``
आबा साहेबांचं असं बोलनं ऐकताच संपत बिथरला. `` ठीक हाय आबा, म्या बी बगतूच काय करायचं त्ये.``
घराभायीर येत त्यानं मोटारसायकलला खच्चून किक मारली. आक्कासाब आन जयादीदी त्याच्यामागं धावल्या. `` आरं पोरा, थांब-थांब, आसं डोस्क्यात राख घालून घिऊ नगंस. काडू आपन कायतरी तोडगा. मागं फिर रं पोरा.``
पन संपत मोटारसायकलवर सुसाट वेगात शहराच्या दिशेनं कवाच निगुन ग्येला व्हता. त्याला कुनाचंच बोलनं ऐकू येत नव्हतं.
सुसाट वेगात तो हायवेला लागला. डोस्क्यात इचारांचं मोहोळ उटलेलं. समदेच मार्ग खुंटलेलं. इचार करायची ताकदच संपलेली. त्याच्या डोळ्यांपुढं अंधारी आली. फुडचं कायबी दिसेनासं झालं. त्येची मोटारसायकल वेडीवाकडी पळायला लागली आन त्येला कायबी कळायच्या आतच हायवेवर दुरुस्तीसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर धाडदिशी जाऊन आदळली. संपत जोरात बाजूला फेकला गेला त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला.
आजूबाजूच्या गाडीवानांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तो बेशुद्ध पडला व्हता. त्याला लगीच दवाखान्यात न्यायला पायजेल. कुनीतरी ट्राफिक पोलीसला फोन क्येला. कुनीतरी अम्बुलन्स बुलावली आन लगोलग त्येला जवळच्या गावातल्या दवाखान्यात नेलं. अपघाताची केस म्हनून आदी त्याला दवाखान्यात दाखल करून घेत नव्हते पन तेवढ्यात ट्राफिक पोलीस तिथं पोचलं. त्याला तिथं दाखल करून लगीच आयसीयुत नेलं. पोलीसांनी त्याच्या मोबाईलवरून आन ड्रायव्हिंग लायसन्सवरुन त्याचा पत्ता शोधून काढला आन शिळवाडीला आबासाहेबांच्या घरी फोन लावला. फोन सदादादानं उचलला. पयल्यांदा त्याला त्यो पोलीस काय बोलला तेच कळलं नाय. पन त्यानी परत त्या पोलिसाला काय झालयं म्हनून इचारल्यावर त्याला कळलं की, संपतच्या मोटारसायकलला अपघात झालाय आन त्यो फुगेवाडीच्या दवाखान्यात हाय.
त्यो फोन तसाच ठीऊन डोकं धरून मटकन खाली बसला. फोनमधून हैल्लो ss हैल्लो आवाज येत राह्यला. तो आवाज ऐकुन सदाची बायको भायेर पळत आली.
`` आवं, काय जालं तुमास्नी? असं का बसलाय सा? उटा बगू आदी आन नीट बोला बरं काय झालंय त्ये.``
`` आगं कांते, घात झालाय गं. आपल्या संपतच्या गाडीला अपघात झालाय आन त्यो फुगेवाडीच्या दवाखान्यात हाय. सिरीयस हाय म्हनं. त्यो पोलीस सांगत व्हता.``
`` आगं बया ह्ये काय हून बसलं? आक्कासाब आन आबासायबांना ह्ये कसं सांगायचं? झेपलं का त्यास्नी ह्ये समदं ?``
संपत घरातनं भायेर पडल्यापासून घरातलं समदं गुमसुम बसून व्हते. कुनाला खान्यापिन्याची शुध नव्हती. आबा साहेब डोळं मिटून शांत पडले व्हते. आक्कासाब त्याचं डोकं चेपत व्हत्या. जयादीदी गुडघ्यात डोकं घालून बसली व्हती. सदा आत आल्याचं कुनालाच समजलं नाय. सदा तिथंच येरझाऱ्या घालत बसला.
थोड्यायेळात आबासायबांना जाग आली. `` का रं सदा, गप बस की जरा. येरझाऱ्या कशापायी घाल्तुयास?``
`` संपत पोचला आसंल नव्हं शहरात? त्येचा काय फोनबीन आला का न्हाय?``
`` आबा, संपत शहरात पोचला नाय. त्येच्या गाडीला अपघात झालाय. फुगेवाडीच्या दवाखान्यात हाय त्यो. आपल्याला लगीच निगायला पायजेल.``
आबासाहेबांना भोवळ आली. त्ये खाली पडनार एवढ्यात आक्कासायबांनी त्यास्नी सावरलं.
सदानी दोन मित्रांना सोबतीला घ्येतलं आन समदेजन लगोलग फुगेवाडीला पोचले. संपतला कुनाला भेटू देत नव्हतं. लांबूनच पाहिलं तर संपत निपचित पडला व्हता. त्याचं डोकं पांढऱ्या पट्ट्या बांधून पार झाकून टाकलं व्हतं. त्याला पाहून आक्कासाब आन आबा साहेबांना गलबलून आलं. आक्कासायबांचं डोळं पाझरायला लागलं. जयादीदी त्यांना जवळ घेऊन थोपटत बसली व्हती. आबासाब एका कोपऱ्यात डोकं गच्च धरून बसले व्हते. सदाच काय ती धावपळ करत व्हता.
समदेजन आठ दिस दवाखान्यात काचं पल्याडल्या संपतला बघत व्हते. पन नवव्या दिशी समदं संपलं. समदीकडं निस्ता हलकल्लोळ माजला.
संपतला मूठमाती दिल्यावर तर आबासाब पुरतंच ढासळून ग्येले. त्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं. संपतच्या मरनाला म्याच जबाबदार हाय हेच त्ये डोस्क्यात घिऊन बसले व्हते. समद्या गावाचं आधारवड असलेलं आबासायेब असं कोलमडलेलं पाहून सारं गाव हळहळलं. कायबी करून आबासायबांना पुन्हा उभं करायसाटी प्रत्येकजन आपल्या परीनं झटत व्हता. आक्कासायबांची तर पार दैना झाली व्हती. त्यांनी तर हातरुनच धरलं व्हतं. सदा आन जयादीदी दोगांना कसंबसं सावरत व्हती.
आता वाटणीचा काय ईषयचं उरला नव्हता. म्हयना-दोन-म्हयन्यात आबासायबांनी संपतनं घ्यातल्यालं समदं कर्ज फेडलं. घरदार-जिमीनजुमला समदं सदाच्या हवाली करून आबासाब आन आक्कासाब चारधाम यात्रला निगुन ग्येलं.
नाव- श्रीमती रश्मी रामचंद्र पटवर्धन,
पत्ता- सदनिका नं. A-1-302, तिसरा मजला,
मयूर किलबिल अपार्टमेंट, धानोरी, पुणे ४११०१५
मोबाईल- ९१६८८९४३८०
E-mail patwardhanrashmi60@gmail.com