body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
"अरे, अशोकला 'आन मिलो सजना' लागलाय अन विजयला 'हाथी मेरे साथी'. काय करायचं?" - मित्र.
"आन मिलो सहाचा पाहू अन तिथून विजयला जाऊ. साडेनऊचा 'हाथी मेरे साथी." मी.
दहावीची परीक्षा डोक्यावर आलेली असताना लागोपाठ दोन सिनेमे पाहायचे असे बेत आखणारे केवळ मी आणि माझे मित्रच नव्हतो.
'एक ढूंढो, हजार मिलेंगे' असा तो जमाना!
साठ-सत्तरच्या दशकात, शाळा-कॉलेजच्या जमान्यात सिनेमा हेच मनोरंजनाचे मुख्य आणि एकमेव साधन. ते आपल्यापर्यंत किवा आपण त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे थेटर (थिएटर) किंवा टाकी (टॉकीज).
तेव्हा बीडला ईन-मीन दोन थेटरं होती - 'विजय'आणि 'अशोक '.
मुंबईत प्रदर्शित झाल्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी बीडच्या थेटरात सिनेमे लागत. पडेल असेल तर थोडा लवकर! ईद, दिवाळीला तुलनेने नवा सिनेमा झळके. पाच-सहा महिन्यांचा नवा सिनेमा लागला, तर अप्रूप वाटे. सिनेमाच्या सुरुवातीस सेन्सॉरचे प्रमाणपत्र दाखवतात, त्यात प्रदर्शनाची तारीख आणि सिनेमाची लांबी (किती रिळांचा) कळते. ते दिसले की पब्लिककडून तारीख व रिळे यांचा सामूहिक उच्चार होई.
मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, जालना या ठिकाणी थेटरांची संख्या जास्त होती. तिथे सिनेमे लवकर लागत.
बीडातले काही लाडावलेले धनाढ्य सिनेरसिक खास नवे सिनेमे पाहण्यासाठी भाड्याच्या जीप वगैरे करून तिकडे जात आणि परत आल्यावर इतरांसमोर नवा सिनेमा पाहिल्याच्या बढाया मारत आणि सिनेमाच्या 'इस्टुर्या'ही सांगत. ज्यांना हे चोचले शक्य नव्हते, ते निमूटपणे ऐकत. बिच्चारे! सिनेमा नाही, तर स्टोरी तरी.. दुधाची तहान ताकावर!
सिनेमा लागण्यापूर्वी गावात पोस्टर लागत. रात्रीच्या शांत वेळी, थेटरात काम करणारी दोन-तीन पोरे हातात शिडी, पोस्टर चिकटवायला लागणार्या खळीच्या बादल्या, ब्रश आणि पोस्टरचे गठ्ठे घेऊन संचार करत. पोस्टरच्या जागा ठरलेल्या. मोठे पोस्टर मुख्य रस्त्यावरील इमारतींच्या भिंतीवर.
पोस्टर लावण्याचे काम मेहनतीचे आणि कसरतीचे. आधीचे पोस्टर ओरबडून काढायचे. तो कचरा तिथेच गटारात टाकायचा. लावायचे पोस्टर रिकाम्या रस्त्यावर उलटे टाकून ब्रशने बादलीतील खळ त्याला लावायची. शिडीवर चढून ते भिंतीवर डकवायचे.
पोस्टरचे आकार वेगवेगळे असत. लहान पोस्टर लावणे सोपे. मोठे पोस्टर चार-पाच भागांत असे. ते भाग एकत्र जुळवून चिकटवण्यासाठी चिकटवणारा अनुभवी लागे. उलटसुलट झाले तर सगळी मेहनत वाया.
पोस्टरबाजीचा उद्योग पाहाणे हे रिकामटेकड्यांसाठी वेळ घालवण्याचे व मनोरंजनाचे उत्तम साधन होते. याचा एक फायदा म्हणजे कुठल्या थेटरला कुठला सिनेमा कधी लागणार, हे त्यांना सर्वातआधी कळे. पोस्टर लावण्याच्या प्रक्रियेच्या एवढ्या सविस्तर वर्णनावरून रिकाम्या मंडळींत आस्मादिकांचाही समावेश होता, हे चाणाक्ष वाचकांच्या ध्यानात अर्थात आले असेलच!
सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी हातगाडीवरून शंकूच्या आकारात लावलेले सिनेमा पोस्टर फिरवले जात. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी समोर ताशा-हलगी वाजत असे. नंतरच्या काळात एक निवेदक रिक्षातून लाउडस्पीकरवर ओरडून सिनेमाची जाहिरात करत असे. त्याची खास स्टाइल बरीच प्रसिद्ध झाली होती.
सिनेमाच्या प्रिंट्सचे - म्हणजेच रिळाचे डबे जालना, परळी इ. ठिकाणांहून बसने लोखंडी पेट्यांतून येत. अतिउत्साही मंडळी त्याच्याही मागावर असत. बसस्टँडवर किंवा थिएटरवर जाऊन त्याची माहिती काढणे हा त्यांचा छंद असे. कुठल्या सिनेमाची रिळे आली, हे त्यांच्याकडून कळे. निजामाबाद टेरिटरी, अमरावती टेरीटरी असे शब्द त्यांच्याकडून कानी पडत. तिथे सिनेमा डिस्ट्रिब्यूटर असत आणि ते सिनेमाच्या प्रिंट्स गावोगावचे थेटराला पाठवतात, अशी माहिती या तज्ज्ञ मंडळींकडूनच कळली होती. म्हणजे नक्की काय होते, हे मात्र कळत नसे.
थेटरला चार प्रकारची आसन व्यवस्था असे. तिकीट दर अर्थातच वेगवेगळे असत. फर्स्टक्लास म्हणजे खुर्चीचा दर एक रुपया. सेकंड क्लास म्हणजे पाठी असलेले बेंच/बाकडे, सत्तर पैसे. थर्ड क्लास म्हणजे बिनापाठीचे बेंच/जमीन - तीस पैसे. पुढे त्यात वाढ होऊन ती अनुक्रमे दीड रुपया, एक रुपया व पंचाहत्तर पैसे झाली. नंतरही त्यात नियमित वृद्धी होत गेली असणार, हे सांगायला नको. चौथा वर्ग म्हणजे जनाना क्लास - फक्त महिलांसाठी. महिला व पुरुष एकत्र बसणे, बसवणे सभ्यपणाचे समजले जात नसावे किंवा पुरुषांच्या बाजूला बसणे सुरक्षित वाटत नसावे. कदाचित हा भाग निजामशाहीत होता, हेही एक कारण असेल. महिलांसाठी ही स्वतंत्र व्यवस्था फर्स्टक्लासच्या बाजूला होती. पुरुषांची नजरसुद्धा त्यांच्यावर पडू नये, म्हणून 'जनाना'समोर एक पडदा लावलेला असे. सिनेमा सुरू होण्याच्या वेळीच तो पडदा हटवला जाई. मध्यंतर झाले, लाइट लागले की तो भाग 'पडदानशीन' होई. समोरचे अनेक गब्रू, मिळेल तेवढे नयनसुख घेण्याच्या आशेवर मागचा पडदा उघडण्याच्या प्रतीक्षेत मागे माना वळवून बसलेले असत. बहुधा पदरी निराशाच येई. मग माना पुढे वळवून समोरच्या पडद्यावर. असो.
एकदा एक गमतीचा प्रकार घडला, एका वनसाइडेड रोमिओला, त्याची 'वन साइडेड लव्ह स्टोरी' माहीत असलेल्या एका 'मित्राने' त्याची 'गम्मत' करण्यासाठी, शाळेतील त्याची 'ती' फर्स्ट शोला येणार, अशी थाप मारली. वरती ही खातरीशीर बातमी आहे अशी पुस्ती जोडली. त्याचा जीव टांगणीला! तयार होऊन तो थेटरासमोर हजर. वाट पाहून पाहून जीव शिणला आणि सिनेमा सुरू होण्याची घंटा झाली तरी तिचा पत्ता नाही. आपल्यालाच उशीर झाला असावा आणि कदाचित ती आधीच आत गेली असावी, या आशेने घाईघाईत आत गेला. इंप्रेशन मारण्यासाठी नेहमीप्रमाणे थर्डक्लासऐवजी फर्स्टक्लासचे तिकीट काढलेले. सिनेमात कसले लक्ष लागते? मागे परत परत परतुनि पाहे, या अवस्थेत सगळा वेळ गेला. सिनेमा संपल्यावरहि तेच. ती आलीच नव्हती. मग आपण फसवले गेलो हे ध्यानात आले. ती दिसली नाही व मित्राने फसवले असे दुहेरी दु:ख. 'दोस्त दोस्त ना रहा' (मित्रासाठी), तेरी राहो मे खडे है दिल थामके (तिच्यासाठी) इत्यादी इत्यादी गाणी आळवत घरी परत गेला बिचारा. दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर शाळेसमोर तिच्या साक्षीने दोघांची फ्रीस्टाइल हाणामारी आम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळाली.
रोज संध्याकाळी सहा/साडेसहा व रात्री नऊ/साडेनऊ दोनच खेळ. मॉर्निंग शो, मॅटिनी शो असे स्वतंत्र खेळ नसत. नवा सिनेमा असेल, तर सुरुवातीचे काही दिवस तीन/चार शो होत. सिनेमा गाजलेला असला की पहिल्या दिवशी गर्दी (अर्थातच 'तुफान') होई. रांग, शिस्त असले फालतू लाड मोठमोठ्या शहरात, अशी पब्लिकची धारणा होती, तर आगाऊ तिकीट विक्री हा आगाऊपणा आहे, अशी थेटरवाल्यांची धारणा. पहिल्याच दिवशी पहिला शो पाहणारे 'व्रतस्थ' असंख्य. त्यामुळे तिकीट खिडकीवर ही झुंबड उडे. एक॔दरीत गर्दी लक्षात घेता सगळ्यांना तिकीट मिळणे अपवाद वगळता अशक्य नसे. परंतु ढकलाढकली, दंडेली करत, समोरच्यांना बाजूला सारत, गरज पडल्यास इतरांच्या खांद्या-डोक्यावर चढून खिडकीजवळ जायचे, खिडकीच्या छोट्या भोकातून आधी आत घुसलेल्या दोन-तीन हातांमधून आपलाही हात पैशासह कोंबायचा, हाताच्या बोटांनी किती तिकिटे पाहिजेत ते तिकीट देणार्या त्या अदृश्य माणसाला सांगायचे, त्याने हाती दिलेली तिकिटे आणि परत दिलेले सुट्टे पैसे काबीज करून युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात परतण्यात मिळणारा आनंद वेगळाच, असे मानणारे असंख्य होते. या सगळ्या प्रकारात आपल्याहून जास्तीचे 'भुजबळ' असलेला कुणी वीर मध्ये आला, तर हाणामारीची शक्यता असणारच! ती गृहीत धरलेली असे. एवढा पराक्रम गाजवताना शर्ट फाटणे, गुंड्या तुटणे, खिडकीचा पत्रा लागून हाताला जखमा होणे असे किरकोळ प्रकार होणारच की! पण त्याची फिकीर कुणाला? 'भुजबळांच्या' तिकीट खिडकी वरील चढाया आणि धुमश्चक्री निमूटपणे पाहत दूर उभे असलेल्या गरीब बापड्या प्रेक्षकांना नंतर उरलेली तिकिटे आरामात मिळत.
गर्दी असली की तिकीट मिळेल की नाही या विचाराने अनेकांच्या जिवाची घालमेल होई. अशा वेळेस एखादा धूर्त भामटा एखादे भोळे सावज हेरून, तिकीट काढून देतो म्हणून त्याच्याकडून पैसे घेऊन पसार होण्याचे प्रकारही होत. मग रिकाम्या खिशात हात घालून, मान खाली घालून घरी परतायची वेळ! गाजलेला शिनुमा असला की पहिले काही दिवस काळा बाजारवाल्यांची चलती असे. अतिगरजू, दर्दी सिनेरसिक दुप्पट-तिप्पट भावाने तिकीट खरेदी करीत आणि बहुतेक वेळेस पस्तावत. कारण नंतर ओळखीचा कुणीतरी, "मला तर आरामात खिडकीवरच तिकीट मिळाले" किंवा "मी तर एकचे तिकीट फक्त दीडलाच घेतले" असे सांगून त्याचा 'तिकिटानंद' हिरावून घेई. काळा बाजारवाले आणि तिकीट विकणारे यांच्यात 'गॅटमॅट' आहे असे त्या विषयातले तज्ज्ञ सांगत. पण मला काही बोध होत नसे. हल्लीच्या काळात मात्र सिनेतिकिटांच्या काळा बाजाराचा धंदा बुडून ही जमातच नामशेषच झाली असावी. 'बिच्चारे' काळा
बाजारवाले! या धंद्यात अर्थ उरला नाही असे कळल्यानंतर कुठल्या धंद्यात शिरले असतील, कोण जाणे? एका थेटरजवळच्या पान टपरीवरून ब्लॅकने तिकिटे विकणारा मात्र काही वर्षांनंतर नगरसेवक झाल्याचे पाहण्यात आहे. पण तिकिटांचा काळा बाजार हा त्याचा साइड बिझनेस होता. मुख्य धंदा मटक्याचे आकडे घेण्याचा होता. असो.
गुलाबी, निळ्या-हिरव्या रंगाची पातळ कागदी तिकिटे हाती घेऊन आपापल्या 'क्लासनुसार' त्या त्या दरवाजावर जायचे. डोअरकीपर नामक प्राणी तिकीट फाडून आत पाठवे. सीट नंबर वगैरे भानगड नसल्यामुळे त्याने प्रेक्षकाला जागेपर्य॔त सोडण्याचा प्रश्नच नसे. मोकळी जागा पाहून बसायचे. एखादा आधीच आपल्या मित्रांसाठी वगैरे आख्खे बाकडे आडवून ठेवी. मग भांडाभांडी आलीच. त्यात कोण जास्त 'पावरफुल' यावरून सीट मिळणार की 'आरक्षित' केलेली सीट जाणार, हे ठरे. थर्ड क्लासवाल्या मंडळींना बाकांसमोर मोकळी जागा अगदी पडद्यापर्यंत उपलब्ध असे. शिवाय प्रवेशद्वाराजवळच्या पायर्यांवरहि दाटीवाटीने लोक बसत. एकमेकाच्या पायावर पाय पडणे, धक्काधक्की होणे हे नित्याचेच असे.
हा कल्लोळ फक्त पहिले दोन-तीन दिवस असे. नंतर मात्र सगळ्या जागा ओपन कॅटॅगरीत जात. कुणी कुठेही बसा, नो प्रॉब्लेम.
तिकीट मिळून थेटरात जाईपर्यंत अंधार होऊन फिल्म डिव्हिजनची सरकारी डॉक्युमेंटरी सुरू झालेली असे. शेती, आरोग्य, कुटुंबनियोजन, सहकार, विविध सरकारी योजना असे कुठलेही विषय शक्य तेवढ्या रटाळ पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणे हा त्यामागचा उद्देश असे. राष्ट्रपतींचे, पंतप्रधानांचे विदेशी दौरे, परदेश प्रमुखांचे भारतदौरे, वाटाघाटी, बैठका, करार, कुठले कुठले शासकीय समारंभ इ.ची वार्तापत्रे दाखवली जात. कधी कधी क्रिकेट, हॉकी सामन्यांची अर्धवट, अपुरी चलतचित्रेही दाखवली जात. टीव्ही नव्हता त्या काळात, अशा रितीने आवडते खेळाडू आणि त्यांची कामगिरी पाहायला छान वाटे.
अनेकदा वार्तापटांना फाटा देऊन डायरेक्ट सिनेमा सुरू होई. थेटरात पब्लिक स्थिरस्थावर होईपर्यंत एखादे गाणे किंवा महत्त्वाचा प्रसंग होऊन गेलेला असे. 'सुरुवात चुकवू नका' अशा टाइपचा सिनेमा असला की नेमकी सुरुवातच चुके. वैताग येई. लोकांनी पुन्हा सिनेमाला यावे, म्हणून थेटरावाले मुद्दाम असे करतात असे काही सराईत प्रेक्षक बोलत. अशा वेळेस सिनेमा रिपीट पाहणारा एखादा, सुरुवात चुकलेल्याला, आधीची 'इष्टुरी 'थोडक्यात सांगायचा प्रयत्न करी. बाजूचे लोक "शुक शुक, गप्प बस" असे ओरडून त्याला गप्प करत. काही उत्साही सिनेरिपीटर मध्ये मध्ये रनिंग कॉमेंट्री करून, पुढे काय होणार आहे ते आधी सांगत. 'आता बघ धर्मेद्रच्या मागून प्रेम चोप्रा येतो आणि त्याच्या पाठीला पिस्तूल लावतो, मग धर्मेंद्र..' वगैरे वगैरे. हे ऐकून आजूबाजूचे पब्लिक शिवीगाळीवर येई. 'शेवट कुणाला सांगू नका' टाइपच्या सिनेमात 'द एंडचे'आधीच रहस्यभेद करणारे कुणी सिनेरिपीटर आपल्यासोबत असणे परवडत नसे. त्याची बडबड ऐकून, पडद्यावर पाहण्याऐवजी बाजूचे कुणी बदडणार तर नाही नं? याकडेच लक्ष द्यावे लागे.
हे सिनेरिपीटर परवडले, असा बालप्रेक्षकांचा एक वर्ग असे. हाणामारीच्या प्रसंगात स्वतःच्या जागेवरून बसल्या बसल्या वा उभे राहून अॅक्शनसह हिरोला वाचिक, कायिक स्वरूपात सूचना देत सावध करणे, प्रोत्साहित करणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर त्याचे काही खरे नाही, असे समजून "अरे, तो मागून येतोय, लक्ष दे, बदड त्याला, सोडू नको, दे ठोसा, अजून एक, हां.." अशी बडबड सुरू असे. इतरांसाठी वैताग किंवा करमणूक!
सिनेमाला साधारणत: एक मध्यंतर असते. बीडच्या थेटरात एकच प्रोजेक्टर असल्याने, चार-पाच रिळांनंतर आधीचे रीळ बदलून पुढची रिळे प्रोजेक्टरवर चढविण्यासाठी सिनेमा थांबवला जाई. अशी एकूण तीन मध्यंतरे होत. त्याला मध्यंतराऐवजी 'पावांतर' म्हणता येईल. या पावांतरात काही प्रेक्षक पाय आणि पोट मोकळे करायला बाहेर जात आणि फेरीवाले थेटरात येत. खारे दाणे, चणे-फुटाणे, चॉकलेट, गोळ्या, सोडालेमनची विक्री करीत. सोडा बाटल्यांवर ओपनर फिरवत 'खर्रर्रर्रर्रटक, खर्रर्रर्रर्रटक' असा चमत्कारिक आवाज काढत. तो ऐकून "ए सोडा.. (हे त्याला उद्देशून) दोन इकडे दे तिसर्या लायनीत" वगैरे ऑर्डरी सुटत.
अशा रितीने सिनेमा पुढे सरकत असताना अचानक वीज जाणे हा प्रकार नवीन नव्हता. वीज जाण्याने रसभंग होऊ नये, म्हणून थेटरात जनरेटर ठेवणे ही फुजुलखर्ची आहे, असे थेटरमालकांचे मत होते. वीज गेल्यावर अर्थात सिनेमा बंद पडे. वीज परत कधी येईल हे निश्चित नसे. मग अंधारात आणि उकाड्यात बिच्चारे प्रेक्षक विजेची वाट पाहत बसत. काही अँग्री यंग मेन मात्र थेटरमालकाचा पिढ्यांसहित उद्धार करत. वीज येणारच नाही असे निश्चित कळल्यावर, दुसर्या दिवशी 'हाच खेळ पुन्हा' असे जाहीर होई. मग प्रेक्षक घरी जात, उद्या परत येण्यासाठी. फुकटात 'डब्बल' पाहायला मिळते म्हणून काही जण खूशही होत.
एकदा सलग तीन दिवस मध्यतरानंतर वीज जाऊन खेळ बंद पडला. तिन्ही दिवस तेच थेटर, तोच सिनेमा, तीच तिकिटे, तेच पब्लिक. सिनेमात काही 'एकदम खास' सीन होते. पुन्हा पुन्हा आणि फुकटात पाहायला मिळते, म्हणून प्रेक्षक भलतेच खूश. थेटरमालकासाठी मात्र वैतागच की!
प्रेक्षकानां वैताग आणणार्याही अनेक गोष्टी असत. सिनेमा रंगात आलेला असे. उंच पर्वताच्या कड्यावर हिरॉइन झाडाच्या फांदीला लोंबकळत आहे, ती फांदी कोसळायच्या बेतात आहे, तिला वाचवण्यासाठी हिरो एका दोराला लटकून खाली उतरत आहे, त्यातच व्हिलन त्याच्याशी मारामारी करत दोर कापण्याच्या प्रयत्नात आहे.. काय होईल? दोर तुटेल? फांदी सुटेल? हिरो-हिरॉईन दरीत पडतील? की? असे प्रश्न डोक्यात घेऊन प्रेक्षक दातांनी नखे कुरतडत जीव मुठीत धरून पाहत आहेत. एवढ्यात..
रीळ तुटते. सिनेमाची रिळे जोडून सिनेमा सुरू होईपर्यंत तिकडे हीरो-हिरॉइन आणि इकडे प्रेक्षक लटकलेले!
हे रीळ तुटून सिनेमा बंद पडण्याचे प्रकार वारंवार होत. एकप्रोजेक्टरी थेटरे असल्याने 'पावांतरात' रिळे बदलण्याच्या प्रक्रियेत कधी उलटापालटही होई - म्हणजे मध्यंतरापूर्वी खुनाचा रहस्यभेद होऊन खरा खुनी पकडल्याचे आधी दाखवले जाई. खून कुणाचा झाला, कधी झाला हे मात्र मध्यंतरानंतर दिसे. हे ऑपरेटरचे 'संकलन कौशल्य!' 'आधी कळस मग पाया' पद्धतीची ही गंमत अनेकांच्या लक्षातही येत नसे.
शिस्तप्रिय आणि नियमाने चालणार्या प्रेक्षकांच्या वैतागाची कारणे वेगळीच असत. 'धूम्रपान निषेध' असे फलक सगळीकडे असूनही, सिगारेट-बिड्यांचा धूर थेटरात वर वर जाताना दिसे. तो पाहून यांच्या डोक्यात धूर! थेटराच्या भिंतीवर अतिसंथ गतीने फिरणारे मोठे पंखे सुरू असल्यास त्यातून येणारी मंद हवा, तो धूर (खरा, डोक्यातला नाही) थेटरात सर्वत्र पसरवायला मदत करे. तो धूर, ती हवा तेव्हाच आसमंतात विलीन झाली.
इतक्या वर्षांनंतर ती थेटरेही विस्मृतीच्या अवकाशात लुप्त झालीत. आता अस्तित्वात तरी आहेत की नाहीत, माहित नाही. आत खोलवर कुठेतरी दडून बसलेल्या बालपणाच्या, तरुणपणाच्या अशा अनेक आठवणी मात्र आपल्या नकळत केव्हातरी तळ ढवळून वर्तमानाच्या पृष्ठभागावर येतात आणि आठवणींचा सिनेमा सुरू होतो मनाच्या थेटरात!
हे थेटर सुरूच राहणार आहे, श्वास सुरू आहे तोपर्यंत.
नीलकंठ देशमुख .