body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
लग्न हा काही फक्त मराठी मालिकांतला, चित्रपटातला किंवा नाटकातलाच महत्त्वाचा भाग आहे असे नाही, तर लग्न हा माझ्यासारख्यांच्या बालपणाचा एक फार मोठा घटक होता. ऐंशी-नव्वदच्या दशकात कुटुंब मिळून बाहेर जाणे म्हणजे कुणाच्या तरी लग्नाला जाणे हेच समीकरण होते. एके दिवशी पहाटे उठवले जायचे, पाण्यात बुचकळून अंघोळले जायचे, आईची लगीनघाई दिसायची.. म्हणजे दोनच शक्यता होत्या - एक नरकचतुर्दशीचे अभ्यंग स्नान किंवा कुणाच्या तरी लग्नाला जाण्याचा कंटाळवाणा प्रवास. पॅसेंजर ट्रेनमध्ये अख्खे कुटुंब मिळेल त्या जागेत कोंबले जायचे. ती पॅसेंजर अशा स्टेशनवर थांबायची, जिथे आसपास गावाचे नावनिशाणा नसे. पाच-दहा प्रवासी सोडले, तर बाकी सारे लघुशंका उरकायलाच खाली उतरायचे. अशा भकास स्टेशनावर पॅसेंजर हात-पाय पसरून मस्त ताणून द्यायची. एक -दोन एक्स्प्रेस गाड्या, एखादी मालगाडी पास झाल्याशिवाय तिचा पाय तिथून हलत नव्हता. लहान असताना एकच स्वप्न होते - आयुष्यात एकदा एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणार. असा प्रवास करत लग्नस्थळी पोहोचेपर्यंत लग्न केव्हाच आटपून आता जेवणाच्या पंगतीसुद्धा आटोपत आल्या असायच्या. नवरदेवाची वरात जर पॅसेंजर ट्रेनने येणार असेल, तर मुलीकडले बॅकअप नवऱ्याची सोय ठेवत असतील.. ठरलेला नवरा वेळेत पोहोचला नाही तर दुसरा हवा. तास-दोन तास होत नाहीत, तर लगेच परतीच्या पॅसेंजरचा प्रवास सुरू व्हायचा.
आपण अशा लग्नाला का जातो? हाच प्रश्न मला पडत होता. कुणाला तरी लग्नाच्या बेडीत अडकायचे होते, म्हणून आम्ही पोरे पॅसेंजरची कैद का भोगत होतो? त्या काळात मुलांना मत असते या गोष्टीला अजिबात मान्यता नव्हती, नाहीतर हल्ली 'आमच्या कुत्रीला लग्नात कंपनी नाही' म्हणून मंडळी लग्नाला जात नाहीत. आज तसे प्रवास करावे लागत नाहीत. लग्ने बदलली.. शास्त्रशुद्ध भाषेत 'लग्नात उत्क्रांती झाली'. डार्विनच्या उत्क्रांतीवादाप्रमाणे लग्नपद्धतींच्या उत्क्रांतीवादाचा सिद्धान्त मांडायचा झाला, तर मी उत्क्रातींचे चार टप्पे सांगीन. (या निमित्ताने स्वतःला डार्विनच्या जवळ नेता येते!) पहिला टप्पा ताट-पाट किंवा चिवडा-लाडू लग्न, दुसरा टप्पा टेबल-खुर्ची किंवा जिलेबी-मठ्ठा लग्न, तिसरा टप्पा कॅटरिंग लग्न आणि चौथा टप्पा करण जोहर जलसा लग्न. माझे बालपण विदर्भातील तीन जिल्ह्यांपुरते मर्यादित होते, त्यामुळे माझा अनुभव खूप व्यापक आहे असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. तुम्ही कितीही ‘आमच्याकडे नाही बाई’ असे म्हणा, परंतु मला खातरी आहे की थोड्याबहुत फरकाने सर्वत्र याच स्वरूपाचे बदल झाले असतील.
ताट-पाट किंवा चिवडा-लाडू लग्न या टप्प्यात फक्त लग्न पाटावर लागत होते असे नाही, तर सुलग्न पाटावर, सारा लग्नविधी पाटावर आणि मुख्य म्हणजे जेवणाची पंगतसुद्धा पाटावर (किंवा चटईवर) बसायची. चिवडा-लाडू हे मानवाचे मुख्य खाद्य असल्यासारखे जिकडे तिकडे तेच असायचे. लग्न लागले की मुलीकडला कुणी मोठ्या परातीत चिवडा आणि वाटीभर बुंदीचे लाडू ‘चरा भुक्कडांनो’ असे म्हणून ठेवून द्यायचा. तोच बुंदीचा लाडू जेवणात असायचा, लग्न मांडवातून निघताना मिळणाऱ्या पाकिटातसुद्धा तोच चिवडा आणि तोच लाडू. हा टप्पा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते ऐंशीच्या दशकापर्यंत दीर्घकाळ चालला. लग्न हा पारतंत्र्यात जायचा विषय असल्याने त्याला भारताला स्वातंत्र्य मिळाले या घटनेने फरक पडण्याचे काही कारण नव्हते. या टप्प्यात लग्ने उरकण्यावर भर होता, त्यामुळे अशा लग्नाला इव्हेंट मॅनेजर नाही, तर इव्हेंट उरकणारे होते. कुण्या पंधरा वर्षाच्या मुलाने घाबरत घाबरत जाड मिशीवाल्या काकांना सांगावे, “काका, वांग्याची भाजी संपत आली.” कौरवसेनेने विराटवर आक्रमण केले हे उत्तराने सांगितल्यावर त्याला अर्जुनाने ज्या शांततेने उत्तर दिले असेल ना, तसेच ते काका उत्तर देणार - “बादलीभर पाणी ओत त्यात.”
त्या काळातील लग्ने फ्रेडरिक टेलरच्या असेंब्ली लाइन पद्धतीने उरकली जात होती. सर्वत्र लग्ने सारखीच असायची. लग्नच ते, त्यात काय Differentiation दाखवायचे? असा खोल विचार त्यामागे होता. साध्या कागदाची पत्रिका, ज्यावर एका बाजूने एक मुलगा मुलीला हार घालतोय असे चित्र, तर दुसऱ्या बाजूने गणपतीचे किंवा देवीचे चित्र, आत एकाच टायपातील लाल अक्षरं, त्यात मजकूर कमी आणि आपले विनीत किंवा कृपाभिलाषी लिहून वंशावळच जास्त छापलेली असायची. ही लग्ने साधारणतः कुठल्यातरी देवळात किंवा शाळेत व्हायची, लग्न हे मंगल कार्य आहे यावर विश्वास नसल्याने कुणी मंगल कार्यालय बुक करीत नव्हते. लग्नाच्या जेवणाचा मेनू - पोळी, वरण, भात, मसाले भात, पातळ भाजी, रस्सा भाजी, कोशिंबीर, कढी असा ठरलेला होता. मेनू कार्ड बघून ऑर्डर देणे हा प्रकार तेव्हा हॉटेलातसुद्धा आला नव्हता. माणसाला निवडस्वातंत्र्य असते, याचा त्या वेळी शोध लागायचा होता.
माझ्यासारख्या लहान मुलांना लग्नात एक त्रास हमखास व्हायचा. कुणी म्हातारी विचारणार,
“बंड्याचा ना तू? ओळखलं का मला?” हा बंड्या कोण हेच मला माहीत नाही, तर हिला कसे ओळखू?
“अरे, मी तुझ्या बाबांच्या आत्याची नणंद आहे.” माझ्या बाबांच्या आत्याची नणंद म्हणजे माझी कोण? असा स्कॉलरशीप परिक्षेतील बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न मला पडायचा.
“कोणत्या वर्गात आहे?”
“चौथी.”
“अभ्यास करतो का?”.
“बरा आहे. पंचाऐंशी टक्के होते.” (तेव्हा एवढे मिळाले तरी आभाळ ठेंगणे होते.) आईने दोन शब्द आपल्या पोराचे कौतुक केले, तर लगेच नाक मुरडणार.
“ते वर्धेच्या शाळेत मिळतात.” Calibration किंवा normalizationच्या नावाने एखाद्याच्या करीयरची कशी वाट लावतात, याचा अनुभव लहान असल्यापासून घेत आलो आहे. काही चक्क विचारायचे,
“अच्छा! सांग बर सतरा आठे किती?” जसे काही नागपूरबाहेरील शाळेत जास्त मार्कांनी पास होणे हा गुन्हा होता. मुळात नागपूरातील मंडळी अ-नागपुरी वैदर्भीयांना नाव का ठेवायचे, हे एक कोडे होते. साधारणतः एखाद्या विभागातील मोठ्या शहरातील लोकांमध्ये त्यांच्याकडे त्या विभागाचे सांस्कृतिक, शैक्षणिक नेतृत्व आहे अशी एक भावना असते, त्यातूनच असे संवाद होत असतात.
“तुम्ही चंद्रपूरच्या लग्नाला आल्या होत्या का? काय बाई ते लग्न. परातीने भात वाढत होते. येवढा भात खायला महालातील कुत्र्यांनासुद्धा दोन दिवस लागतील.”
“काय ते वरण, चिंचेचे पाणी नुसतं. अशी काय पद्धत असते.”
“तिखट तरी किती? माझी मूळव्याध उमळली.” या काकांची मूळव्याध खरे तर सावजीचे चिकन खाल्ल्यामुळे उमळली असेल, पण उगाच चंद्रपुरातील वरणाला नाव ठेवत होते.
फक्त पुरुष मंडळी असतील तर मात्र गप्पा वेगळ्या असायच्या.
“काय करतो मुलगा?”
“जिल्हा परिषदमध्ये आहे.”
“स्टेटचा”
“स्टेट म्हणून कमी लेखू नका.”
“तुम्हा स्टेटवाल्यांना वाहतूक भत्ता नाही. आम्हा सेंट्रलवाल्यांनाच आहे फक्त.”
“नवीन जीआरमधे सुरू होणार आहे.”
“शक्यच नाही ते.” ते दोघे जरी कोणत्यातरी फालतू विभागात कारकुंडे असले, तरी एक पंतप्रधानांचा पीए आहे आणि दुसरा मुख्यमंत्र्यांचा पीए आहे या थाटात भांडायचे. तेव्हापासून मी स्टेट आणि सेंटर यांची भांडणे बघत आलो, म्हणून मला आज त्यात नवल वाटत नाही. तिकडे बायकांच्या चर्चा रंगायच्या
“काय साडी दिली.. पोतेरं आहे. त्यापेक्षा न दिलेली बरी.” हिला जर खरेच साडी दिली नसती, तर हिने कांगावा केला असता.. "शंभराची तरी द्यायची, पाचशेची मागत होते का मी?"
“तरी बरं, चुलत नाही, सख्या काकाची सख्खी पोरगी आहे. त्या मावशीचा कारभार आहे.” लग्नाचा कारभार जर का मावशीच्या हातात असला, तर आत्याच्या पोटात पोटशूळ उठलाच म्हणून समजा. भारतातील पोटदुखीचे कारणांमध्ये हे एक महत्त्वाचे कारण आहे. अशा साऱ्या गुणदोषासहित पन्नास-साठ वर्षे लग्ने एकाच पद्धतीने होत होती.
जिलेबी-मठ्ठा किंवा टेबल-खुर्ची लग्न या टप्प्यात लग्नातील बदलांना सुरुवात झाली. पाटाएवजी टेबल-खुर्ची आली. पत्रिकेत पूर्वी छापली जाणारी वंशावळ आता छोटी झाली. पत्रिकेचा कागद जाड झाला. ज्या लग्नाला जायचे आहे तिथे बुंदीचा लाडू आहे की जिलेबी याचा अंदाज पत्रिकेची जाडी बघूनच करता येत होता. पंगत जरी टेबल-खुर्चीवर होत असली, तरी एखादी वरमाय अडून बसायची ‘विहिणीची पंगत तरी पाटावरच हवी’. वाकून वाकून विहिणीचे कंबरडे मोडल्याशिवाय वरमायेच्या कंबरड्याला आराम मिळत नव्हता. कालांतराने वरमायांचे कंबरडे मोडले आणि तिलाच पाटावर बसणे कठीण झाले. जेवणात मसालेभातासोबत मठ्ठा आला आणि नळराजाची जिलेबी आली. त्या काळात नागपुरातील बहुतेक लग्ने चिटणीसांच्या वाड्यात लागायची. एका वाड्यात चार मंगल कार्यालये होती. चिटणीसांनी जर वाड्यात लग्न कार्यालय काढले नसते, तर कितीतरी पोरे बिनालग्नाची राहिली असती. चिटणीसाच्या वाड्यात मी जिकडे खेळायला मुले मिळतील तिकडे जात होतो आणि जिथे जिलेबी असेल तिथे जेवत होतो. आपण कोणत्या लग्नाला आलो याच काही सोयरसुतक नव्हते. आई एकच प्रश्न विचारायची, “जेवला का रे तू?” त्याचे उत्तर ‘हो’ दिले की संपले. काय जेवला, कुठे जेवला याच्याशी तिला देणेघेणे नव्हते. हल्लीच्या आया काय जेवला, कुठे जेवला, किती जेवला, किती कॅलरी, किती विटामीन, किती प्रोटीन असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. गोष्टी फक्त जेवणावरच थांबत नाही. शी झाली का तुझी, कधी झाली, किती झाली, काय रंग होता.. ‘शी बाई, याला काळीच शी होत आहे बँडी प्लस द्यावे लागणार.’ गुगळेमहाराजांच्या कृपेने हल्लीच्या आया अर्ध्या पेडियाट्रिशियन झालेल्या आहेत.
सीमान्त पूजनात ज्याला ओळखपरेड म्हणता येईल असा कार्यक्रम असतो. चिवडा-लाडू लग्न टप्प्यात हा कार्यक्रम सारी रात्र चालतो की काय, इतका ताणला जायचा. पोटात कावळे ओरडत असायचे आणि इकडे यांचे ‘अहो, ते जावई राहिलेत ना’ हे संपत नव्हते. मग मुलाचा कुणी नातेवाईक त्या जावयांना उठवायचा.
“चला रामराव” रामराव मघापासून आपला नंबर कधी येतो याची वाट बघत होते. आता मात्र सौजन्य दाखविणार.
“मी कशाला?”
“जावई आहा तुम्ही. तुमचा मान ठेवलाच पाहिजे.” मुलाच्या बारा-पंधरा चुलत बहिणीपैकी हा कुण्या एकीचा नवरा असायचा. सुटे पैसे नाही म्हणून रिक्षेवाल्याने घालून पाडून अपमान केल्यावर स्वतःच्या सन्मानार्थ ज्याच्या तोंडून चार शब्द निघत नाही, तो जावई म्हणून त्याचा मान ठेवा. स्वतः कसलाही उद्योगधंदा न करता बायकोच्या कमाईवर आरामात लोळत राहतो, त्याचा जावई म्हणून मान ठेवा. परवा जो दारू पिऊन झिंगून नाल्यात पडला होता, त्याचासुद्धा जावई म्हणून मान ठेवा. जावई आणि मान या दोन गोष्टी फेव्हीक्विकने चिकटवाव्या अशा चिकटल्या होत्या. जिलेबी-मठ्ठा या टप्प्यात ओळखपरेडला लागणारा वेळ कमी झाला. रुसवेफुगवे नक्कीच असतील, परंतु त्या रुसव्याफुगव्यांकडे दुर्लक्ष करावे इतकी नाती आता दुरावली गेली होती.
नाष्ट्याला चिवडा-लाडू जाऊन उपमा मिळायला लागला, हळूहळू इडली, पोहे आले. कधीकधी तो उपमा असा चविष्ट असायचा की एकदा लग्नात उपमा खाल्ला की पुढले सहा महिने उपमा खायची इच्छा होत नव्हती. लग्न हे एक मंगल कार्य आहे यावर या टप्प्यात शिक्कामोर्तब झाले आणि लग्न मंगल कार्यालयात व्हायला लागले. लग्नाच्या बाह्य स्वरूपात बदल व्हायला सुरुवात झाली. नवरानवरीच्या खुर्च्या रंगीत झाल्या, हाराचा साईज मोठा झाला, सनई जाऊन बँड आले, बँडच्या तालावर नाचणे आले, भटजींएवजीं मंगलाष्टके म्हणणारे स्वयंघोषित गायक आप्तेष्ट आले, कपड्यांमधे फिटिंग आली. सरकारी नोकरीचे कौतुक कमी होऊन मूल आता एमआर, इंजीनियर, प्रोफेसर, डॉक्टर असे उद्योग करायला लागले.
कॅटरिंग लग्ने या टप्प्यात लग्नकार्यात कॅटरर आणि फोटोग्राफर या दोन व्यक्तींचा प्रवेश झाला. लग्नाचा कारभार मावशीकडून कॅटररकडे गेला त्यामुळे आत्याची पोटदुखी थोडी कमी झाली. बाकी आत्याचे पोट इतर कारणांनी दुखत असेलच. लग्नात आत्याचे पोट दुखले नाही तर लग्नाच्या वैधतेवर शंका निर्माण व्हायची. चार खांब ठोकून त्यावर लाल-पिवळे पट्टे असणारे कापड टाकून तयार होणारा मांडव जाऊन डेकोरेशन आले, लायटिंग आली. लग्नाला जाताना आपण वैष्णोदेवीचा देखावा बघण्यासाठी कुण्या गुहेत शिरतोय असे वाटत होते. घरघर आवाज करणारे पंखे गुलाबपाण्याचा शिडकावा करायला लागले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या हाताला अत्तर लागले. अत्तराचा सुगंध यायचा बरे, फक्त पाणी नव्हते. लहान मुले दोनतीन वेळा बाहेर जाऊन अत्तर लावून येत होते. चार ठप्पे मारून मेहंदी काढणे बंद होऊन तासन तास मेंहदी काढणाऱ्या पोरी आल्या.
या टप्प्यात लग्नात व्हिडिओ शूटिंग नावाचा एक भयंकर तापदायक प्रकार सुरू झाला. व्हिडिओ शूटिंग म्हणजे लग्न नको पण शूटिंग आवर असे प्रकरण आहे. आधीच उन्हाळ्यात भयंकर उकडत असते, होमाच्या धुराने नवरा-बायको दोघेही पिडलेले असतात. अशात त्यांच्या तोंडावर पडतो हॅलोजन दिव्याचा कातडी भाजून टाकणारा प्रकाश आणि फोटोग्राफर सांगतो हसा. कसे हसणार? सकाळपासून विधीला बसून कंबरडे मोडलेले असते, पोटात कावळ्यांची कावकाव चाललेली असते. अशात बायकांच्या घोळक्यातून फोटोग्राफर सांगतो - इकडे बघा. नक्की कुठे बघू? बायकांकडे की तुझ्याकडे? शंभर बायकांच्या घोळक्यात पुलंच्या नारायणनंतर बिनधास्त शिरू शकणारी दुसरी व्यक्ती कुणी असेल तर ती आहे फोटोग्राफर. हे फोटोग्राफर एवढी मेहनत करून फोटो कुणाचे काढतात, तर माझ्यासारख्या ठोकळ्यांचे. Commitment to Professionचे याहून उत्तम उदाहरण सापडणार नाही. माझा चेहरा म्हणजे तुषार कपूरलाही लाज वाटेल इतका मख्ख, एखाद्या काळ्या ओबडधोबड भिंतीसमोर उभे करून जर फोटो काढला ना, तर फेस रेकग्निशन सॉफ्टवेअरचा गोंधळ उडालाच म्हणून समजा. कितीही डीप लर्निंग करा, कळणार नाही कोणता चेहरा आहे आणि कोणती भिंत. माझ्या लग्नाच्या व्हिडिओत मी चिडलोय, रागावलोय, आनंदलोय, त्रासलोय की संभ्रमात पडलोय यापैकी कुठलीही भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. याला म्हणतात ठोकळा अभिनय. बऱ्याच चित्रपटात अशा ठोकळ्या अभिनेत्यांची गरज असते, तेव्हा ज्यांना ठोकळा अभिनयसुद्धा धड करता येत नाही, अशा नटांना घेण्यापेक्षा कास्टिंग डायरेक्टरने लग्नाचे व्हिडिओ शूट बघून माझ्यासारखे ठोकळे निवडावे. लग्नात घास खाऊ घालतानाच्या फोटोत बायकोने असा चेहरा केला आहे की जणू काही मी तिला एरंडेलात कारले बुडवून खाऊ घालत होतो. माझ्या लग्नाच्या फोटोत दिसते सुबक ठेंगणी प्रकारातली एका हाडाची मुलगी आणि तिच्या बाजूला आयटी कंपनीत फुकट मिळणारे जेवण खाऊन सुटलेला काळा भोपळा. असे फोटो बघून काय डोंबलाच्या स्मृती जाग्या होणार आहेत!
कॅटरिंग लग्ने टप्प्यात जेवणात क्रांती झाली. खाद्यपदार्थांचे खऱ्या अर्थाने Democratization झाले. आता नागपुरातील काकू चंद्रपुरातील लग्नाला नाव ठेवू शकत नव्हती, कारण चंद्रपूरचा कॅटररसुद्धा तेच बनवीत होता. साऱ्या भारतातील लग्नात जवळजवळ सारखेच पदार्थ मिळत होते. मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या लग्नाला तिरुपतीला गेलो होतो, त्या लग्नात दोन दिवसांत इतका भात खाल्ला की पुढे महिनाभर भात खायची इच्छा झाली नव्हती. आज तसे होणार नाही. या टप्प्यात पंगती गेल्या आणि बूफे आला. खाणाऱ्याकडे आता निवडस्वातंत्र्य आले. वाटेल तेव्हा वाटेल ते खा. ‘मसालेभात आणा’ असे म्हणून कुणी ओरडतो का, याची वाट बघायची गरज उरली नाही. स्टीलची ताटे गेली आणि प्लास्टिकच्या प्लेटी आल्या. पदार्थांची तर रांग लागली. गुलाब जाम, काला जाम, रव्याचा शिरा, मुगाचा शिरा, दुधीचा शिरा.. तुम्ही म्हणाल त्या रंगाचा जामुन आणि म्हणाल त्या पदार्थाचा शिरा मिळायला लागला. रसगुल्ल्याचा रस्सा बेधडक ढोकळ्यात शिरायला लागला, गुजरात आणि बंगाल यांची अशी घट्ट मैत्री निदान जेवणाच्या ताटात तरी दिसायला लागली. मुंबईचा वडापाव, दक्षिणेतला दोसा, विदर्भातला गोळा भात यांच्या बाजूला रशियातली सॅलाड, इटलीतला पिझ्झा आणि चीनचे नूडल्स दिसायला लागले. या साऱ्यावर अफगाणची नान थाटात लोळत असतात. जगातील विविध देशांना एकाच टेबलावर आणायचे महान कार्य या बूफेने केले. मधल्या काळात उगाच हिणवले गेलेल्या पिठलंभाकरी, पाणीपुरी, पान या पदार्थांना सन्मानाची वागणूक मिळायला लागली.
लग्नातल्या चर्चा बदलल्या.
“काय करतो मुलगा?”
“आयटीत आहे पुण्याला, वीस लाखाचं पॅकेज आहे म्हणे.”
“कोळसे गुरुजी जास्तच सांगतात, पंधरा लाख असेल.” अशात कोणी जरा ज्ञानी असेल तर तो विचारणार.
“पॅकेज असेल हो. हातात किती पडतात?” आंब्याच्या झाडाला सफरचंदाचे फळ लागल्यासारखे काका त्याच्या थोबाडाकडे बघणार. कंपन्यांनी जॉब मार्केटमध्ये आणि लग्नाळू मुलांनी लग्नाच्या मार्केटमध्ये पॅकेजच्या नावाने जो फुगा फुगवलाय, त्यात नक्की हवा किती हे पॅकेज ऑफर करणाऱ्या एचआरलासुद्धा माहीत नसते, तर ते काका काय सांगणार! अहेराच्या पद्धती बदलल्या. साड्या गेल्या, वस्तू आल्या. रुसवेफुगवे असले, तरी त्याचे भर मांडवात जाहीर प्रदर्शन होत नाही. कॅटरिंग लग्न टप्प्यात लग्ने देशव्यापी झाली. आता गडचिरोलीतली मुलगी आणि तळकोकणातला मुलगा अशी लग्ने व्हायला लागले. त्यामुळे लग्नानिमित्ताने होणाऱ्या प्रवासाच्या कक्षा रुंदावल्या. माझा एक मित्र विजयवाड्यावरून थेट लुधियानाला वरात घेऊन गेला होता. एकदा पुण्यातल्या लग्नासाठी ट्रेनने वरातीत जात होतो. बोगीमध्ये सारे वरातीच होते. सकाळी मनमाड येताच दर मिनिटांना चहा-कॉफी विकणाऱे येत होते. त्यांच्या आवाजानेच मला जाग आली. एका काकांनी मला विचारले,
“का रे, चहाची काय सोय आहे? सारे मघापासून चहाची वाट बघत आहे?” मिनिटामिनिटाला चहा विकणारे येत असताना हे काकालोक चहाची वाट का बघत आहेत, हे काही क्षण डोक्यात आले नाही. मग ट्यूब पेटली - ट्रेन झाली म्हणून काय झाले, वरातीत आलेला वऱ्हाडी यजमानाने खाऊ घातल्याशिवाय पाण्याच्या थेंबालासुद्धा शिवत नाही, हा वरातधर्म आहे. लांबच्या प्रवासाची वरात मॅनेज करणे हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
हम आपके है कोण या चित्रपटात लग्नाने मुख्य कलाकाराची भूमिका बजावली. असे असले, तरी लग्नाला अॅकॅडमी अॅवॉर्डचा दर्जा मिळवून द्यायचे महान कार्य केले ते करण जोहर यांनी. म्हणूनच अशा प्रकारे होणाऱ्या लग्नांना मी 'करण जोहर जलसा लग्न' म्हणतो. अशा लग्नात हे लग्न आहे की अॅवॉर्ड सोहळा हे कळत नाही. लग्न हा इव्हेंट नाही असे मानणऱ्या समाजात लग्नाच्या प्रत्येक विधीचा इव्हेंट करायचे काम या माणसाने केले. अशा लग्नात मुलीच्या सँडलपासून ते मुलाच्या पायजामाच्या नाडीपर्यंत प्रत्येक गोष्ट डिझायनर असते. इतकेच नाही, तर लग्नाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने निदान ‘मान्यवर’चे कपडे घालणे अपेक्षित असते. मी अशाच एका लग्नात जीन्स-टीशर्ट घालून पोहोचलो. तिथे ज्यूसचे ग्लास घेऊन फिरणाऱ्या वेटरचे कपडे माझ्यापेक्षा योग्य होते. सारे माझ्याकडे ही व्यक्ती इलेक्ट्रिशियन आहे की प्लंबर म्हणून बघत होते. मला जेव्हा त्या लग्नाला योग्य अशा कपड्यातल्या माझ्या मित्रांचा घोळका दिसला, तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. अशा लग्नाची पत्रिका ही सात दिवस चालणाऱ्या व्याख्यानमालेच्या पत्रिकेसारखी चार-पाच पानांची असते. आता तर डिजिटल व्हिडिओच्या स्वरूपातसुद्धा पत्रिका येत आहेत. त्यातही काही दिवसांनी थीम येतील - उदा., बाहुबली थीम.. मग मुलगी देवसेनसारखी तलवार फिरवत सांगणार "आमच्या लग्नाला या." तर मुलाचा मामा बाहुबलीला तलवार भोसकत सांगणार, "लग्नाला या."
ही लग्ने साधरणतः तीन ते चार दिवस चालतात. हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन असे न ऐकलेले विधी असतात. पूर्वी लग्न म्हटले की घरातील स्त्रीवर्ग महिनाभर आधीपासून पापड, लोणचे अशा तयारीला लागायचा. आता महिनाभर आधीपासून संगीत कार्यक्रमासाठी नाचाच्या क्लासला जातात. प्रत्येकीला साईपल्लवीसारखे नाचायचे असते. असे करताना कायमचे कंबरडे न मोडले म्हणजे निभावले. लग्नात पोट दिसू नये म्हणून मुलाचा बाप धावायला सुरुवात करतो. ब्युटी पार्लरवाली बाई महिनाभर आधीपासून लग्नघऱीच दुकान टाकून बसते. अशा लग्नात हमखास असणारा प्रकार म्हणजे प्रीवेडिंग फोटो शूट. कुणी पतलू पायजामा छाप त्याच्या जाड्याभरड्या बायकोला तिच्याच वजनाच्या घागऱ्यासहित उचलून एखाद्या तलावाशेजारी फोटो काढीत असतो. अरे बाबा, सांभाळून.. पडशील. कधी कुणी मुलगी तिच्या पन्नास मीटर लांबीच्या ओढणीने मंदिर साफ करीत मंदिरात प्रवेश करीत असते.
जसे उत्क्रांती होऊनही काही गोष्टी अजिबात बदललेल्या नाहीत, तसे लग्नाच्या बाबतीतसुद्धा घडले आहे. काही गोष्टी अजिबात बदलल्या नाहीत. आजही कुणी भटजींच्या मंत्राचा अर्थ जाणून घेत नाही. आजही उखाणा घेतल्याशिवाय मराठी लग्न पूर्ण होत नाही. ट ला ट जोडणे वगळता त्या उखाण्याला फारसा अर्थ आजही नसतो. कुणी कवी झाला म्हणून तो उखाण्याचे काव्य करीत नाही किंवा कुणी गायिका आहे म्हणून काळी दोन लावून उखाणा म्हणत नाही. कितीही श्रीमंत घरातील लग्न असू द्या, लग्न हे पाटावरच लागते. लग्नाच्या वेळेला नवरा-बायको क्रेनवर उभे राहत नाहीत. लग्न आहे म्हणून आधीच हवेत असणाऱ्या नवरा-बायकोला त्यांच्या मित्रांनी कितीही वर उचलले, तरी नवरा-बायको हातानेच हार टाकतात, त्यासाठी ड्रोनचा सहारा घेत नाही. आजही खऱ्या फुलांचेच हार टाकले जातात. उगाच लग्न टिकावे म्हणून कुणी प्लास्टिकच्या फुलांचे हार वापरत नाहीत. अजूनही सप्तपदीच घातली जाते. आमचा मुलगा अमेरीकेत आहे म्हणून कुणी दोन फेरे जास्त घालत नाहीत. लग्नात अक्षताच टाकल्या जातात, त्यात सोने मिसळत नाही. इतकेच काय, कितीही थाटात लग्न लागू द्या, त्या लग्नात कुणीतरी रुसलेले असतेच. मोठ्या लोकांच्या गोष्टी बाहेर येत नाहीत म्हणून, नाहीतर अंबानींच्या लग्नातसुद्धा कुणीतरी रुसलेले असेल. आजही लग्नात मुलाचा कुणी दूरचा नातेवाईक मुलीच्या दूरच्या नातेवाइकाशी उगाच वाद घालत असतो.
लग्ने बदलली, पुढेही बदलत राहतील, हे बदल योग्य की अयोग्य हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे - बदलणारी लग्ने हे बदलणाऱ्या समाजाचे थोडक्यात दर्शन घडवणाऱ्या स्लाइड शोसारखे आहे. स्वातंत्र्य मिळाले तरी भारतीयांच्या आर्थिक स्थितीत बरीच वर्षे फारसा फरक पडला नव्हता, हे लग्नातून दिसत होते. एकत्र कुटुंब जाऊन विभक्त कुटुंबे आली, त्याचेही प्रतिबिंब लग्नात दिसू लागले. मुलाची नोकरी, नंतर मुलीची नोकरी या साऱ्या गोष्टी बदलणाऱ्या समाजाच्या प्रतीक होत्या. आर्थिक सुधारणा झाल्यानंतर भारतात आर्थिक सुबत्ता आली, गंगाजळी आली तसे लगनात दिसले. जागतिकीकरणानंतर प्रत्येक बाबतीत पर्याय उपलब्ध झाले, ते लग्नात दिसायला लागले. पर्याय, निवडस्वातंत्र्य हा माझा हक्क आहे हा विचार दृढ होत गेला. पूर्वीच्च्य चित्रपटात, लग्न लागले की चित्रपट संपायचे, आता चित्रपटातून लग्नाचे भव्य सोहळे दिसायला लागले. समाजाचा एक घटक - मग तो शहरात असो की गावात, या सुधारणांच्या फायद्यांपासून वंचित राहिला, हे त्यांच्या लग्नाला गेले की प्रकर्षाने जाणवते. Have आणि Have not यांमधला फरक लग्नात गेले की ठळकपणे जाणवतो.
लग्न हा आजही भारतीयांच्या आयुष्यातील महत्त्वाचा सोहळा आहे. माहित असते मुलगी स्वतंत्र आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, कितीही दूर असली तरी अगदी वीस तासांत परत येऊ शकते.. तरी आजही मुलीला निरोप देताना बापाचे हृदय तसेच पिळवटून निघते. लपवायचा खूप प्रयत्न करुनही बाहेर आलेली आसवे आजही तितकीच खऱी असतात. या अशा काही गोष्टी कधीच बदलणाऱ्या नाहीत. कितीही उत्क्रांती झाली, तरी अशा गोष्टी कधीच बदलू नये असे वाटते.
~मित्रहो
http://mitraho.wordpress.com/