body {background-image: url("https://i.postimg.cc/52VQjg83/bg-main.jpg");}
.navbar-fixed-top {
background-color: #000011;
border-bottom: 1px solid #111;
}
.node-info {background-color: #f5f5f5;padding:8px;}
.page-header {background-color: #008080;color: #ffffff;text-align:center;border-bottom: 0px solid #111;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Eczar',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
/* Hidden Items*/
.input-group {display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
/* फोटो */
.field-items img {background-color: white;border: 1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12);max-width:100%;height:auto!important;}
.author-type-posted, .field-items a:link {color:#660000;}
.left {float:left;display:inline-block;margin-right:10px;margin-top:16px;}
.right {float:right;display:inline-block;margin-left:10px;}
.center {margin: auto;}
.portrait { margin-bottom:10px;max-width:450px;}
.landscape { margin-bottom:10px;max-width:800px;}
.kavita p{text-align:center}
.title {text-align:center;margin-bottom:32px;margin-left:24px;margin-right:24px;}
.col-sm-9 {padding:16px;background-color:#fefefa;box-shadow:0 4px 10px 0 rgba(0,0,0,0.2),0 4px 20px 0 rgba(0,0,0,0.19)}
.anklogo {float:left; max-width:300px;margin-top:4px;margin-right:16px;}
.voilet {background-color: #9900cc;color:#ffffff;}
परदेशातील मंदिरे (आणि तेथील चविष्ट जेवण!)
अविनाश चिंचवडकर
बंगळुरू
भारतात असताना मंदिराची पायरीही न चढणारे लोक परदेशात गेल्यावर मात्र नियमितपणे मंदिरात जाण्याइतके भाविक का होतात, हे मला पडलेले कोडेच होते. पण परदेशात गेल्यावर मात्र हे कोडे सुटले. मंदिराचे खरे महत्त्व मला तेव्हाच कळले.
सर्वप्रथम परदेशातील भारतीय मंदिराची ओळख झाली ती स्वीडनमध्ये. अतिशय थंड देश, त्यात भारतीय पद्धतीचे जेवण मिळण्याची खूपच बोंब होती. आपले खाद्यपदार्थही फक्त एकाच दुकानात मिळायचे. तेथील कडाक्याच्या थंडीत, सामान घरी आणून जेवण बनवायचे हे खूपच कठीण काम होते. मी असा त्रस्त झालेलो असतानाच कुणीतरी मित्राने सांगितले की "स्टॉकहोममध्ये सोलनटूना या भागात एक हिंदू मंदिर आहे आणि तेथे रविवारी आरतीनंतर स्वादिष्ट जेवण मिळते." मग काय, आम्ही ऑफिसच्या भारतीय सहकाऱ्यांनी पुढच्याच रविवारी तेथे जाण्याचा बेत ठरवला.
रविवारी सकाळी आम्ही घाईघाईने लवकर उठलो, कधी नव्हे ते लवकर अंघोळ केली आणि मंदिरात जाण्यासाठी ट्रेन पकडली. स्टॉकहोम हे अतिशय सुंदर आणि नीटनेटके शहर! कुठेही जाण्यासाठी लोकल ट्रेन असतात. पण लोकल ट्रेन आपल्यासारख्या भरगच्च नसतात आणि रविवारी सकाळी तर ट्रेन अगदी रिकामीच होती. मंदिर असलेल्या भागात पोहोचलो आणि आम्ही मंदिराकडे चालू लागलो. आखीव-रेखीव घरांच्या ओळीतच एका मोठ्या प्लॉटवर मंदिर बांधलेले होते.
मंदिरात बरीच गर्दी होती. काही कुटुंबवत्सल लोकही दिसत होते. पण बहुतेक मंडळी आमच्यासारखीच - भारतात कुटुंब असलेली किंवा अविवाहित होती. सगळ्यांनी मिळून देवांची आरती केली. परदेशातील मंदिरे बहुधा मल्टिपर्पज असतात; म्हणजे एकाच देवळात राम, शंकर, विष्णू, गणपती, हनुमान असे सगळे देव असतात. हे पंजाबी हिंदूंचे मंदिर असल्याने सगळे हिंदू देवच होते. एवढ्या सगळ्या देवांच्या आरत्या म्हणेपर्यंत कडकडून भूक लागली होती. आरतीचे ताट फिरवीत असतानाच काही जाणकार मंडळी लगबगीने तळमजल्याकडे जाताना दिसली. आम्हीसुद्धा आरती घेऊन त्यांच्या मागे गेलो आणि या घाईचा उलगडा झाला.
तळमजल्यावर ओळीने लोक जेवायला बसले होते. आम्ही लगबगीने जागा पकडल्या. थोड्या वेळात ताटे वाढण्यात आली आणि सुंदर दाल माखनी, आलू सब्जी, पुरी आणि पुलाव वाढण्यात आला. सोबत खीरही होती. सगळे अन्न स्वच्छ आणि घरगुती पद्धतीने बनवलेले होते. त्याचा सुगंध येत होता. ते अन्न पाहूनच आमच्या तोंडाला पाणी सुटले. कितीतरी दिवसांनी असे शुद्ध भारतीय, घरगुती जेवण दिसत होते. आम्ही त्यावर अक्षरशः तुटून पडलो. वाढणारेही कुठेच काटकसर करीत नव्हते. सगळ्यांनी अगदी पोट भरून जेवण केले आणि मंदिराला खरोखर मनापासून धन्यवाद दिले.
नंतर कळले की तेथे काम करणारे स्वयंसेवक अनेक वर्षांपासून किंवा पिढ्यांपासून तेथे स्थायिक झालेले होते. प्रत्येकाचा स्वतःचा व्यवसाय, घरदार असा जम बसलेला होता. परंतु भारतापासून हजारो किलोमीटर दूर असूनही त्यांनी आपली हिंदू संस्कृती तेथे जपली होती. 'अतिथी देवो भव' हा मूलमंत्र खरा ठरवून ते स्वतःच्या खर्चाने अनेक भारतीयांना अन्नदान करत होते, तेही कुठलीही अपेक्षा न ठेवता! अगदी तृप्त होऊनच आम्ही त्यांचा निरोप घेतला. घरापासून हजारो मैल दूर, त्या थंड बर्फाळ प्रदेशात मिळालेल्या साध्याच पण घरगुती जेवणाची किंमत केवळ अनमोल होती. ते जेवण नेहमीसाठी लक्षात राहिले!
त्यानंतर आम्ही सगळ्यांनी तिथे दर रविवारी जाण्याचा निश्चय केला, पण काहीतरी कारणाने ते शक्य झाले नाही. दोन-तीन वेळा आम्ही तेथे गेलो असू. माझी पत्नी आणि मुलगा स्वीडनला काही काळासाठी आले असताना त्यांनाही मी तिथे आवर्जून घेऊन गेलो होतो. त्यांनाही ते मंदिर आणि अर्थात जेवण खूप आवडले.
मग अचानक मला स्टॉकहोम सोडावे लागले आणि मंदिरात शेवटचे जाताही आले नाही. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात ते पंजाबी हिंदू मंदिर कुठेतरी घट्ट बसले आहे!
*
त्यानंतर पुन्हा परदेशातील मंदिरात गेलो ते इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये. बर्मिंगहॅम हे जणू मिनी पाकिस्तानच! सगळीकडे पाकिस्तानी दुकाने आणि पाकिस्तानी वंशाचे लोक. भारतीय शाकाहारी हॉटेल्स कमीच होती. पण इंग्लंडमध्ये इतर युरोपियन देशांपेक्षा परिस्थिती थोडी बरी आहे. तेथे अनेक भारतीय आहेत, त्यामुळे खाण्याचे एवढे वांधे होत नाहीत.
मग एक दिवस माहिती मिळाली की बर्मिंगहॅममध्ये डडली रोड येथे एक बालाजीचे विशाल मंदिर आहे. मुख्य म्हणजे तेथे शनिवार-रविवारी चविष्ट भारतीय जेवण मिळते. मग काय, आम्ही तेथे जाण्याचा बेत ठरवला. तेथेही मी ऑफिसमधील सहकाऱ्यांसह गेलो होतो.
पुढच्याच रविवारी ट्रेनने-बसने प्रवास करून बालाजीचे मंदिर गाठले. हे मंदिर खूपच विस्तीर्ण होते. स्वीडनच्या मंदिराच्या तुलनेत हे खूपच मोठे होते. आजूबाजूला प्रशस्त मोकळी जागाही आहे. कार पार्किंगमध्ये धनवान ब्रिटिश भारतीयांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या लावल्या होत्या. हे मंदिर ब्रिटनमधील श्रीमंत तेलगू लोकांनी बांधले आहे. त्यांना जगभरातील धनवान तेलगू लोकांनी भरभरून देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे प्रति-तिरुपती म्हणावे असेच हे मंदिर आहे.
या मंदिरातील गाभाराही प्रशस्त आहे, त्यामुळे पन्नास ते शंभर लोक आरतीसाठी आरामात उभे राहू शकतात. आम्हीही सगळ्या लोकांबरोबर उभे राहून आरती केली. आरतीचे ताट समोरून फिरवले गेले. सगळे जण बिनधास्तपणे पौंडच्या नोटा टाकत होते. त्यात स्वतःजवळच्या मर्यादित रकमेपैकी एक पौंड टाकताना मन थोडे हेलावले.
आरती संपल्यावर मग नेहमीप्रमाणे सगळ्यांची लगबग सुरू झाली ती प्रसादासाठी. आम्हीसुद्धा घाईघाईने सगळ्यांबरोबर चालू लागलो. या मंदिराचे प्रशस्त आवार होते, त्यामुळे त्यांनी प्रसादासाठी एक वेगळे दालनच ठेवले होते. तेथे व्यवस्थित टेबल-खुर्च्या मांडून जवळजवळ शंभर लोक एकावेळी बसतील अशी व्यवस्था होती. येथील प्रसादही दाक्षिणात्य पद्धतीचा होता. सांबार, भात, सागू (भाजी) आणि शिरा खणाच्या ताटलीत व्यवस्थितपणे वाढला जातो. तेथील गरम गरम सांबार आणि भात खाऊन मन तृप्त झाले. पुन्हा तुम्ही कितीही वेळा ताट भरून घेऊ शकता. कपाळावर आठ्या न पडता प्रसन्न चेहऱ्याने तेथील स्वयंसेवक तुम्हाला वाढतात. परदेशातील मंदिरे आणि तेथील जेवणाची व्यवस्था अगदी स्वच्छ असते. त्या त्या देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतिबिंब त्यात दिसते. लोकही अगदी रांगेत उभे राहून आपला नंबर येण्याची वाट पाहत होते. कुठेही गडबड नाही. अन्न वाया जाणार नाही याचीही दक्षता घेतली जात होती.
अशा वेळी प्रकर्षाने आपल्याकडील (काही अपवाद वगळता) मंदिरांची आठवण येते. अशी स्वच्छता आणि सुव्यवस्था शेगावसारखे अपवाद वगळता कमीच ठिकाणी दिसते. बालाजी मंदिरातील प्रसादाने मन अगदी तृप्त झाले. परदेशात घरापासून दूर असलेल्या लोकांचा देवावरील विश्वास अशा प्रकारच्या मंदिरांमुळे अधिकच दृढ होतो. हे मंदिर तसे बर्मिंगहॅम शहरापासून बरेच लांब होते, त्यामुळे पुन्हा काही तेथे जाणे झाले नाही. पण तिथला विस्तीर्ण परिसर, सुंदर, स्वच्छ मंदिर आणि चविष्ट प्रसाद आजही स्मरणात आहे!
*
आणि मग मला पुन्हा एकदा लंडनला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा मी तेथील मंदिरांची माहिती काढू लागलो. परदेशात कामाचे दिवस तर सहज निघून जातात, पण वीकेंडला काय करायचे हाच मोठा प्रश्न असतो. अशा वेळी इतर प्रेक्षणीय स्थळांप्रमाणेच मंदिरांचाही आधार वाटतो.
तर मग शोध घेता घेता लंडनमधील निस्डन या भागात स्वामीनारायण मंदिराचा शोध लागला आणि मी तिथे एका मित्रासह जाऊन धडकलो. अतिशय सुरेख आणि भव्य मंदिर! फुलांचे ताटवे सगळीकडे पसरलेले. ते पाहूनच मन प्रसन्न झाले. इंग्लंडमधील गुजराती समाज खूपच धनाढ्य आहे. त्यामुळे त्यांनी या देवस्थानाला सढळ हाताने देणगी दिली आहे. त्यामुळे सगळीकडे त्याच्या वैभवशाली खुणा दिसत होत्या. पण प्रसादाच्या बाबतीत मात्र येथे निराशा झाली, कारण येथे प्रसाद मोफत दिला जात नाही.
रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले की मंदिराच्या परिसरातच एक उपाहारगृह आहे. तेथे पैसे मोजून मग जेवण घ्यावे लागते. प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतात. जेवण सुंदर होते, पण थोडे महाग वाटले. काही भारतीय वस्तूसुद्धा विक्रीला ठेवल्या होत्या. या मंदिरात प्रसादाच्या बाबतीत निराशा झाली असली, तरी एकंदरीत तेथे खूप प्रसन्न वाटले. भारतीय माणसाला परदेशात मंदिरांचा खूप आधार वाटतो हे मात्र खरे!
*
त्यानंतर काही वर्षांपूर्वी मी ऑस्ट्रेलियात सिडनीला गेलो, तेव्हा गुरुद्वारात जाण्याचा योग आला. गुरुद्वारा हे एक वेगळेच प्रकरण असते. तेथे थोडीशी कडक नियमावली असते. पण अतिशय शिस्तबद्ध, स्वयंशासन पूर्ण असा कारभार! तसाही शीख समुदाय हा अतिशय मेहनती आणि प्रामाणिक असतो, तसेच त्यांची वृत्ती सेवाभावी असते, त्यांच्या गुरुद्वारातही त्याची प्रचिती येते.
शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही रांगेत उभे राहून गुरूंचे दर्शन घेतले आणि मग लंगरमध्ये प्रसादासाठी गेलो. या वेळी माझ्याबरोबर कुटुंबीय मंडळी होती. जेवण आणि वाढण्याची पद्धत एकदम शिस्तबद्ध होती. खाली बसून जेवायचे, अपवाद फक्त अतिशय वृद्ध आणि अपंग लोकांसाठी.
सर्वप्रथम त्यांनी शाळेप्रमाणे लांब सतरंज्या टाकल्या. त्यावर सगळे बसले. मग एका माणसाने सगळ्यांच्या समोर ताट-वाट्या आणून ठेवल्या. एक माणूस फक्त सगळ्या पेल्यांमध्ये पाणी घालायचे काम करत होता. मग प्रत्येक जण एक एक पदार्थ आणून वाढू लागला. दाल, रोटी, छोले, शिरा असे चविष्ट जेवण होते. वाढताना त्यात एक प्रकारचा भक्तिभाव होता. मध्येच "वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह” अशा प्रार्थनाही ते म्हणतात. त्यामुळे आपण केवळ अन्नभक्षण करत नसून तो प्रसाद आहे याची जाणीवही होते. संपूर्ण जेवण अतिशय स्वच्छ होते. मला तरी वाटते वाटते की स्वच्छता ही मंदिराचे पावित्र्य आणखीनच वाढवते. अस्वच्छ वातावरणात मनातील भक्तिभावही जागृत होत नाही.
अशा प्रकारे लंगरमधील प्रसादाचे मनःपूर्वक सेवन करून आम्ही जेवण आटोपले. इथे प्रत्येकाला आपले ताट-वाटी स्वतःला स्वच्छ करावी लागते. त्यासाठीसुद्धा वेगळी रांग होती. ताट धुताना आत बघितले तर अनेक चांगल्या घरातील शीख स्त्री-पुरुष भांडी घासत होती. काही लोक भाज्या चिरत होते. सगळे जण आपल्या घरातील काम असावे, अशा प्रकारे वाहेगुरूंची सेवा करीत होते.
परदेशातील गुरुद्वारा आणि लंगर अनेक लोकांना संकटाच्या वेळी मदत करतात, असे ऐकले. गुरुद्वारात आलेल्या कुणालाही उपाशी रहावे लागणार नाही, चार घास तरी नक्कीच खायला मिळतील, याची हा समाज दक्षता घेतो. त्या वेळी मग तो माणूस शीख समाजाचा आहे की इतर समाजाचा, असा भेदभाव करण्यात येत नाही.
शीख समाजही परदेशात बहुधा श्रीमंत असतो. त्यामुळे तो केवळ पैशानेच नव्हे, तर श्रमानेही या गुरुद्वारास मदत करतो. आपण भारतात असताना गुरुद्वारात अभावानेच जातो. पण परदेशातील गुरुद्वारे पाहून मात्र आपुलकी आणि अभिमान वाटतो.
*
तर अशा प्रकारे मी भेट दिलेल्या आणि मला आवडलेल्या परदेशातील मंदिरांची ही मुशाफिरी! तेथे जाण्याचे आकर्षण अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जेवण हे असले, तरी ही मंदिरे आपल्या देशाची, संस्कृतीची नाळ तुटू देत नाहीत हे मात्र खरे! उलट परदेशातील अतिशय वेगळ्या वातावरणात ही मंदिरे आपल्याला खूपच दिलासा देतात, घराची उणीव भासू देत नाहीत.
म्हणतात ना की देवाला स्थळकाळाचे कुठलेही बंधन नाही. त्याला कुठल्याही देशाच्या सीमारेषा, चौकटी लागू होत नाहीत. त्यामुळे तो जसा भारतात असतो तसाच परदेशातही रमतो आणि आपल्याला एक प्रकारची शांतता मिळवून देतो.
परदेशातील जीवनात एकाकीपणा जीवघेणा असतो. कधीकधी आपल्याला घराची आठवण येऊन नैराश्य येते. अशा वेळी ही मंदिरे आपल्याला दिलासा देतात, धीर देतात. जणू काही ती आपल्याला सांगतात -
सबका है ऊपरवाला
सबको उसी ने सम्भाला
जब भी घिरा ग़म का अंधेरा
उसने किया उजियाला
राही तू रुक मत जाना
****************
अविनाश चिंचवडकर
बंगळुरू
avinashsc@yahoo.com
9986196940