उकडहंडी

लागणारे जिन्नस:
एक कांदा, १ मोठा बटाटा, १ कच्चे केळ, लाल भोपळा १०० ग्रॅम, फरसबी ५० ग्रॅम, कांद्याची पात ४-५ कांदे, १ लहान रताळे, १ वांगे

१-२ चमचे मीठ, १-२ चमचे लाल तिखट, १/२ चमचा हळद, १/२ चमचा काळा मसाला, १/२ चमचे जिरे, २ लवंगा, दालचिनी, कढीपत्ता १०-१२ पाने. साखर अर्धा चमचा.

२ चमचे तेल

क्रमवार पाककृती:
१. सर्व भाज्या चिरून लांबलांब फोडी कराव्यात.

२. नॉन्स्टिक पॅनमध्ये सगळ्या फोडी, तेल,मीठ, तिखट, मसाला, हळद, जिरे, कढीपत्ता, दालचिनी, लवंगा आणि साखर घालून व्यवस्थीत हलवून घ्यावे.

३. नंतर मंद आचेवर भांडे ठेऊन झाकण लावून शिजवावे. पाणी अजिबात घालू नये.

४. पाच सात मिनिटानी एकदा भाजी खालीवर करावी. मसाला तळाला लागतो आहे, असे वाटले तर २-४ चमचे पाणी घालावे. पुन्हा झाकण लावून शिजवावे.

हा पदार्थ खरे तर मडक्यात करतात. मडक्यात भाज्या घालून घट्ट झाकण लावून आगीत शिजवतात. सोयामीटचे तुकडे स्वच्छ धुऊन पाण्यात १०-१५ मिनिटे भिजवावेत. त्यातले पाणी पिळून ते तुकडेदेखील भाजीत घातले तर छान लागतात. झटपट होणारा प्रकार आहे. काळा मसालाऐवजी रस्सम मसाला घातला तरी चव छान येते . कुठल्याही भाज्या चालतात. शक्यतो चार पाच तरी असाव्यात. पालाभाजी, भेंडी , कच्चा टोमॅटो वापरले तरी चव छान येते.

माहितीचा स्रोत:
'मिसळपाव' वरील गणपाभाऊंची उकडहंडी ....

पोपटी नावाचा असाच एक मडक्यात करायचा भाजीचा प्रकार आहे (म्हणे.) त्यात नॉन्व्हेज प्रकारही करतात.

======================================

यावेळी ह्याच उकडहंडीत अळुवडीचे रोलही टाकले होते. अळूच्या पानाना लावायला बेसन आणि चिंचेचा कोळ घालून मिश्रण तयार केले, ते लावून रोल केले. तेही मस्त शिजले. नंतर फक्त तुकडे केले.

1

2

3