मोदकाची आमटी करण्यात माझा हात सफाईदारपणे बसला आहे .वेळेला कोणतीच भाजी नसेल तर २५-३० मिनिटांत ही आमटी तयार होते.ही आमटी खानदेशातली खासियत आहे .पण सुगरणीला कोठेही अगदी सहज शक्य आहे.
झटपट का ? तर इथे चातुर्मासामुळे कांदे नसल्याने ग्रेव्हीला फाटा मिळाला आणि पदार्थ लवकर होतो.
साहित्य :
दोन वाटी डाळीचे पीठ (बेसन)
ओवा १ चमचा
तेल २ चमचे
-सारण साहित्य
अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
अर्धी वाटी तीळ
एक चमचा खसखस
२ चमचे जिरे
लसूण -६ पाकळ्या
सुकलेल्या २ लाल मिरची
१ चमचा गरम मसाला
कोथिंबीर
तेल १ मोठा चमचा
-मोदक कृती:
१.तेच ते आपले मुख्य नायक डाळीचे पिठ त्यात अर्धा चमचा तिखट ,चवीनुसार हळद ,मीठ,ओवा आणि दोन चमचे तेल टाकावे.घट्ट असे हे पीठ मळावे .(नीट ह बऱ्याचदा पाणी जास्त म्हणून पीठ ओता आणि असा खेळ खूप वेळ चालतो .)
२.पीठला जरा आराम द्यावा ,बाजूला ठेवावे.मधल्या लुटपुट सारणासाठी कढईत एक मोठा चमचा तेल घ्यावे.गरम झाल्यावर लाल मिरची ,खोबऱ्याचा कीस ,तीळ ,जीरे,लसूण पाकळ्या,खसखस अशा क्रमाने टाकावे .चांगले लाल होईपर्यंत मंद आचेवर परतावे.नंतर थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवावे.
३.वरील सारण पदार्थ गार झाल्यावर कोथिंबीर आणि गरम मसाला घालून मिक्सरमधून बारीक वाटावे.मोदकात भरण्यापूर्वी त्यात एक चमचा तेल आणि किंचित पाणी टाकून पेस्ट ओलसर करावी (कोरडे सारण नीट शिजत नाही .)
४.डाळीच्या मळलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या लाट्या करून मोद्कासारख्या बारीक गोल लाटाव्या .
५.गोल पारींमध्ये मध्यम आकाराचे सारण भरावे आणि मस्तपणे पाकळ्या जोडून मोदक बनवावे.
-आमटी
१.कढईत तेल घेऊन फोडणी द्यावी.
२.उकळलेले पाणी (साधारण ४ वाट्या ) त्यात ओतावे.उकळी आल्यावर त्यात दाण्याचा कुट टाकावा.चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकवे.
३.पाण्याला उकळी फुटल्यावर मोदक त्यात सोडावे .
४.मोदक शिजायला जरा पंधरा मिनिटे लागतात .असे ते टम्म होऊन वर आले की शिजले समजावे .(जास्त काळ शिजल्यावर फुटण्याची पाकृची फजिती होऊ शकते.)
बाप्पाला गोड गोड मोदक आणि अशी ही तिखट मोदकाची आमटी आपल्याला आहे ना गंमत !!
-भक्ती