चिजी - बटरी पिझ्झा.
ग्रीन पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य.
(चार मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १० पाकळ्या लसूण
- १.५ इंच आलं
- ३-४ हिरव्या मिरच्या
- थोडी कोथिंबीर
- अर्धे लिंबू
- १ टी स्पून मीठ
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ५० ग्रॅम अमूल बटर
वरील सर्व पदार्थ मिक्सर वर अगदी मुलायम पेस्ट तयार होई पर्यंत वाटून घ्यावे.
टॉपिंग्ज आणि स्टफिंग साठी लागणारे साहित्य.
(एका मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम कांदा.
- १ लहानसा टोमॅटो
- १ लहानशी भोपळी मिरची
- थोडे मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे
- थोडेसे ब्लॅक ऑलिव्ह्स
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ७५ ग्रॅम मोझरेला चिज (ग्रेटेड)
१.५ चिज क्युब्स वरच्या फोटोतल्या प्रमाणे लांबट आकारात कापून घ्यावेत.
एक पिझ्झा बेस ताटात घेऊन त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून घ्याव्या आणि त्यामध्ये कापलेले चिजचे तुकडे बोटाने दाबून दाबून भरावे.
एकीकडे मायक्रोवेव्ह ओव्हन , ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर जे उपलब्ध असेल ते १५ मिनिटे प्री हिट करण्यासाठी लावून, आधी आपण तयार करून घेतलेला ग्रीन पिझ्झा सॉस चमच्याने पिझ्झा बेस वर व्यवस्थित लावून घ्यावा.
आता त्यावर टप्प्या टप्प्याने कापलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची, मक्याचे दाणे आणि ब्लॅक ऑलिव्ह्स पसरून घ्यावेत.
आता ह्या सर्व टॉपिंग्स वर ७५ ग्रॅम ग्रेटेड मोझरेला चिज पसरावे. (माझ्याप्रमाणे भरपूर चिज असलेला पिझ्झा खायला आवडत असल्यास १५० ग्रॅमचे पूर्ण पाकीट त्यावर ओतावे 😀)
आता हा सुशोभित पिझ्झा बेस उचलून मायक्रोवेव्ह ओव्हन / ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बेक करण्यासाठी ठेवावा.
पिझ्झा व्यवस्थित बेक होण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही वापरत असलेल्या उपकरणानुसार वेगवेगळा असू शकतो, मी पिझ्झा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बनवत असल्याने जेमतेम ५ मिनिटांत तयार होतो. (शक्यतो काचेतून आत बघत राहावे म्हणजे आपला पिझ्झा करपणार नाही)
बेक झाल्यावर पिझ्झा बाहेर काढून त्यावर एक चिज क्यूब किसून घालावा आणि आवडीनुसार त्याचे चार किंवा सहा भाग करावेत.
त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो चवीनुसार भुरभुरावे.
मस्तपैकी तयार झालेला चिजी - बटरी पिझ्झा आवडत असल्यास टोमॅटो केचप घालून सर्व्ह करावा.
टीप: बाजारात तयार मिळणारे पिझ्झा बेस पातळ (आणि शिळे ) असतात त्यात चिज भरणे अवघड असल्याने शक्यतो बेकरीत ऑर्डर देऊन ताजे बेस घ्यावेत.