.galema {width:100%; background-color:#F0F8FF; box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,0.16),0 2px 10px 0 rgba(0,0,0,0.12); text-align: center; font-size:24px; padding: 16px; margin-bottom:32px;}
.field-items {padding: 16px;border: 1px solid #eee;background-color:#FFF;text-align:justify}
श्रीगणेश लेखमाला २०२१
श्री गोपाळ गणपती मंदिर - फर्मागुढी, गोवा.
गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर पणजी पासून सुमारे २६ कि.मी. अंतरावर आणि फोंड्याच्या ३ कि.मी. अलीकडे असलेल्या फर्मागुढी पठारावर छत्रपति शिवाजी महाराज ' किल्ल्याच्या (पूर्वीचे नाव 'किल्ले फोंडा') अगदी समोर 'श्री गोपाळ गणपती मंदिर' आहे.
प्राचीन आणि अर्वाचीन हिंदू स्थापत्यशास्त्राचा संगम बघायला मिळणाऱ्या गोमंतकातील फारच थोड्या मंदिरांपैकी हे एक मंदिर असून ह्या सुंदरशा छोटेखानी मंदिराचे बांधकाम गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत श्री. दयानंद बांदोडकर ह्यांनी केले आणि त्यांच्याकडे असलेल्या पंचधातूच्या गणेशमूर्तीची २४ एप्रिल १९६६ रोजी ह्या नव्या मंदिरात स्थापना केली.
ह्या ठिकाणी असलेल्या मूळ जुन्या मंदिराबाबत एक कहाणी सांगितली जाते ती अशी कि, बांदिवड्याचे राजे असलेल्या सौंधेकरांच्या पदरी चाकरीस असलेल्या 'हापो' नावाच्या गुराख्याला सुमारे १०० वर्षांपूर्वी माळरान असलेल्या ह्या पठारावर गाई चरायला घेऊन आला असताना ह्याठिकाणी फूटभर उंचीची श्री गणेशाची दगडी मूर्ती सापडली आणि त्याने नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेल्या मंडपात तिची स्थापना केली होती. गोपालन करणारा गुराखी म्हणजे 'गोपाळ' आणि गोपाळाने स्थापन केलेला हा गणपती असल्याने त्याचे नाव 'गोपाळ गणपती'.
मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजवीकडे दीपमाळ आहे. मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असून येथे दरवर्षी गणेश जयंती उत्सव भाविकांच्या लक्षणीय उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा होतो आणि भाविकांना देवस्थानतर्फे महाप्रसाद दिला जातो.. यादिवशी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रात्री भजन आणि अन्य कार्यक्रम होतात. अनंत चतुर्दशीला गुढी उभारण्याची ह्या मंदिरात प्रथा आहे.
याशिवाय संकष्टी, अंगारकी व विनायकी चतुर्थीला मंदिरावर रोषणाई केली जाते आणि भाविकांच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या रांगा लागतात. मी गेलो होतो त्यादिवशी अनायसे संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे मला अचानकपणे श्रींचे दर्शनहि घडले आणि रोषणाईही पाहायला मिळाली. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असूनही करोना पर्वातील निर्बन्धांमुळे फार गर्दीही नव्हती.
फर्मागुढीच्या या गोपाळ गणपतीच्या मंदिरात वर्षभर विविध उत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या इमारतीत प्रशस्त अशी सभागृहे आहेत आणि त्यांचा वापर लग्न तसेच इतर मंगल कार्यासाठी केला जातो. फर्मागुढीचे पठारा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायम या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू असते. गोपाळ गणपतीवर गोमंतकीयांची आणि हिंदू धर्मियांची श्रद्धा आहेच पण विदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने या मंदिराला आवर्जून भेट देतात. हे मंदिर किल्ल्याच्या समोरच असल्याने किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना आपसूक देवदर्शनही घडते.
फर्मागुढीच्या या गोपाळ गणपती मंदिरा समोर असलेला सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने बांधलेला 'फोंडा किल्ला' (Ponda Fort) हा 'फर्मागुढी किल्ला' (Farmagudi Fort) नावानेही प्रसिद्ध असला तरी आता 'छत्रपति शिवाजी महाराज किल्ला' म्हणून ओळखला जातो.
१६६४ साली शिवाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केले तेव्हा फोंडा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता पण त्यात अपयश आले. पुन्हा १६७५ साली जोरदार आक्रमण करून महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील करून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगीजांनी ह्या किल्ल्यावर ताबा मिळवला पण १६ व्या शतकाच्या अखेरीस छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिकून घेतला. अनेक घनघोर लढायांचा साक्षीदार असलेल्या ह्या किल्ल्याचे खंदक, तटबंदीचे प्राचीन अवशेष आता शिल्लक नाहीत आज जो किल्ला दिसतो त्याचे बहुतांश बांधकाम नव्याने केले आहे.
किल्ल्यावरुन दिसणारे 'श्री गोपाळ गणपती मंदिर'
लहानसा असला तरी हा किल्ला, त्यातला महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि बगीचा प्रेक्षणीय आहे.
( फर्मागुढीला संध्याकाळी पोचलो तेव्हा किल्ला बंद व्हायची वेळ होत आली असल्याने उपलब्ध असलेल्या कमी वेळात आधी किल्ला पाहून नंतर मंदिरात गेलो त्यावेळी बऱ्यापैकी अंधार पडला होता त्यामुळे फोटो फार काही चांगले आले नाहीयेत. मंदिराचा पहिला फोटो जालावरून साभार. )
-टर्मीनेटर