पालक चकली (फोटो-विडिओ सोबत)

काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला.
इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.

जिन्नस:

  • पालक - ८-१० पानं
  • तांदूळ पीठ - २ कप
  • बेसन - पाव कप
  • उडीद डाळ पीठ - पाव कप
  • मूग डाळ पीठ - पाव कप
  • मैदा - १ कप
  • दालचिनी - १-२ काड्या
  • काळी मिरी - १/२ टीस्पून
  • जिरं - १ टीस्पून
  • धणे - १/२ टेबलस्पून
  • हिंग - पाव टीस्पून
  • ओवा - १ टीस्पून
  • तीळ - १ टेबलस्पून
  • दही - २ टेबलस्पून
  • तूप - ३ टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

पाककृती:
पालकाची पानं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या.
एका पॅनमध्ये तांदूळ पीठ २ मिनिटं मंद आचेवर परतून एखाद्या ताटात/परातीत काढा.
पॅनमध्ये बेसन, उडीद डाळ पीठ, मूग डाळ पीठ एकत्रित ४ ते ५ मिनिटं मंद आचेवर परता आणि तांदूळ पिठात एकत्र करून थंड होऊ द्या.
पीठं पूर्ण थंड झाली की त्यात मैदा घालून छान एकत्र करून घ्या.
पॅनमध्ये दालचिनी, मिरी, जिरं आणि धणे २ ते ३ मिनिटं मंद आचेवर भाजून घ्या आणि पूर्ण थंड झाला की ग्राइंडर मध्ये घालून बारीक वाटून घ्या.
वाटलेला १ टेबलस्पून मसाला, हिंग, तिखट, पिठीसाखर, ओवा, तीळ आणि मीठ पिठात घालून, एकत्र करा. (मी इथे मसाला मिक्सरला वाटला जावा म्हणून थोडा जास्त केलाय. उरलेला मसाला इतर भाजी/आमटीत वापरता येऊ शकतो)
एखाद्या पळीमध्ये तुपाचा मोहन करून पिठात घाला आणि मिश्रण एकत्र करा.
पालक बारीक चिरून पीठात घाला.
पीठात दही घालून पीठ कालवा.
थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून थोडा वेळ ठेवून द्या.
चकली पात्रात पीठ घालण्या आधी पीठाला तेलाचा हात लावून पीठ मळा.
चकली पात्रात पीठ घालून चकल्या पाडा आणि गरम तेलात गोल्डन ब्राऊन टाळून काढा.