आमच्या अहोंच अस काम आहे ,भाजीपाला आणायला सांगितला तर हमखास तीन चार हिरवे टमाटर आणतात.आता हे कधी पिकणार ? या विचारात न पडता ,मैत्रिणीच्या डब्यात असणारी सगळी माझ्याच वाट्याची असणारी टमाटर हिरवी चटणी आणि तिचा स्वाद जिभेवर रेंगाळतो. साधारण ३-४ वेळा प्रयत्न करून ही अंतिम केलेली पाककृती लिहिते.
हिरव्या टमाटरची चटणी:
साहित्य:
१.तीन हिरवे टमाटर
२. १/२ वाटी तीळ +शेंगादाणे(प्रमाण वाढवू नका.नाहीतर हेच वरचढ होतात.)
३.तीन हिरव्या मिरच्या(तुमच्या मिरच्या किती तिखट आहेत त्यावरून ठरवू शकता किती घ्यायच्या ते )
४. एक लसूण (५-६ पाकळ्या)
५.एक चमचा गुळ
६.चवीनुसार मीठ,तेल,जिरे
७.आवश्यकतेनुसार कोथिंबीर
कृती:
आधी शेंगादाणे चांगले भाजायचे मग तीळ भाजायचे वेगवेगळे खरपूस भाजायचे.
आता हिरवे टमाटर मध्यम आकारात कापायचे.(जर आता लाल बी असेल तर काढून टाका.त्याने पदार्थाचा
रंग बदलतो).
तर कढई ताई ऐवजी तवा मामा घ्यायचा.काळा काळा लोखंडी ,नॉन स्टिक नको.(चटणी गावठी बाजाची आहे.)
तवा मामा तापल्यावर तेलाची टाकायचे.जिरे टाकायचे.द्यायची.तडतडून नाचायला लागले की.. टमाटर ,लसूण टाकायचे..चर्रर आवाज..क्या बात..
या पाककृतीत टमाटरची हिरवी मैत्रीण मिरची टाकायची.
खरपूस रंगात उठणारे मीठ ,शेंगादाणे आणि तीळ यांना शेवटी एन्ट्री द्यायची.(हे साईड अभिनेते आहेत.)
एक वाफ येऊ द्यायची.आता भांड्यात साहित्य घेतल्यावर चिरलेली कोथिंबीर आणि गुळ टाकायचा .
हे सर्व साहित्य मिक्सरवर वाटून घ्यायचं.तो रंग हिरव्या छटेतला मनमोहून घेतो.
मस्त मोहरी,हळद,हिंग ,कढीपत्ता यांची फोडणी करायची.चटणीला चमचमीत करायचं.
तर ही आंबट गोड तिखट चटणी .. संपूर्ण!
-भक्ती