नमस्कार,
मागील दहा दिवस सुरू असलेला गणेशोत्सव अन मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचा शब्दोत्सव यांचा आज समारोप होतोय. मिसळपावची स्थापना श्रीगणेश चतुर्थीची. मिपाचा यंदा चौदावा वर्धापनदिन. गणेशोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या मिपा श्रीगणेश लेखमालेचे हे नववे वर्ष.
यंदा 'आठवणी - स्मृती' या विषयावर लेखमाला घेण्याचे जाहीर केले आणि मिपाकर नॉस्टॅल्जिक झाले. हा विषय किती जिव्हाळ्याचा आहे, हे आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून दिसून आले. वाचकांनाही हा विषय व लेखमाला आवडल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले.
या लेखमालेच्या निमित्ताने मिपाकरांनी किती वेगवेगळ्या आठवणींचा धांडोळा घेतला! सत्तर-ऐंशीच्या दशकातील चॉकलेट स्पर्धेपासून ते डोंगर-किल्ले फिरल्याच्या आठवणी.. आंघोळीच्या साबणापासून ते माळव्याच्या चित्रांपर्यंत स्मृती.. काही साध्यासुध्या आठवणी ते काही आठवणींच्या आठवणी.. चित्रपटांच्या आठवणी अन मनावर ओरखडा उमटवणाऱ्या आठवणी.. आपल्या स्मृती अन आठवणी शेअर करून मिपाकरांनी ही लेखमाला समृद्ध केली. मिपावरच्या लोकप्रिय लेखाची आठवण अन त्याची ध्वनिमुद्रित साठवण हा नावीन्यपूर्ण प्रयोगही मिपाकरांना आवडला आणि त्यांनी उचलून धरला.
आवर्जून उल्लेख करायचा आहे, तो या लेखमालेच्या निमित्ताने मिपा परिवारात सामील झालेल्या नवीन सदस्यांचा. या लेखमालेच्या निमित्ताने आपल्याला काही नवीन सदस्य मिळाले. त्यांच्या लेखांनाही भरभरून प्रतिसाद देऊन मिपाकरांनी त्यांचा उत्साह वाढवला. अनुराधा काळे (वय ७९) यांनी त्यांच्या बालपणीच्या स्मृती आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यांचा मिपावरील लेखनाचा हा पहिलाच प्रयत्न. लेख प्रकाशित झाल्यावर त्यांना आणि त्यांच्या बहिणीला (वय ८१) झालेला आनंद त्यांनी प्रत्यक्ष फोन करून कळवला. तो आम्ही इथे शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
अशा अनेक स्मृती या श्रीगणेश लेखमालेने आपल्याला दिल्या. मिपाचं साहित्यिक भांडार आणखीनच समृद्ध झालं. यासाठी सर्व मिपाकरांच्या वतीने स्मृती-लेखकांना मनःपूर्वक धन्यवाद. लेखकांचा उत्साह वाढवणारे प्रतिसाद देणाऱ्या मिपाकरांचेदेखील आभार. तुमचा लोभ असाच असू द्यावा.
धन्यवाद!
||गणपती बाप्पा मोरया||
ताजा कलम : मिपाचा दिवाळी अंक येतोय. लवकरच आवाहनाचा धागा प्रकाशित करतोय.