मिपाकर तुम्हाला वाटत असेल गणपतीमध्ये गोडधोड सोडून हे काय तिखट मिरची?खूप खूप मोदक करून,खाऊन झाले.
तेव्हा अशाच लोळत पडलेल्या दोन पोपटी लांब लांब मिर्च्यांकडे लक्ष गेले.आल्या तेव्हा चांगल्या तरतरीत होत्या,आता पार आळसावल्या होत्या.चिडून कि काय लाल व्ह्यायला लागल्या होत्या.विचार करीत असतील आम्हाला ही घेते की म्हाताऱ्या झाल्यावर फेकते.
तेव्हा डोक्यात आलं,ते काठीयावाडी पद्धतीने बेसन पिठ पेरून खूप दिवसांपासून मिरच्या करायच्या होत्या.तेव्हा आजचा मुहूर्त चांगला आहे.तसही यापूर्वी नोकरी सांभाळून २० मिनिटांत स्वयंपाक करण्याची कला मी आत्मसात केली होती.ती मोडली ,पण हे यु ट्यूब वर पाककृती पाहून करण्यात एक शोधनिबंध वाटतो मस्त...
तेव्हा यु ट्यूब मावशीकडे गेले.शोधाशोध सुरु केली.एक पाककृती पाहून कधीच मी सुरुवात करत नाही.चांगल्या दहाबारा पाककृती पाहते.आपल्याकडे असलेले जिन्नस पूरक असतील तर सुरुवात करते.आणि स्वत:चीच एक अनोखी पाककृती तय्यार होते.माझी पद्धत पुढील प्रमाणे आहे.
साहित्य
१.दोन लांब पोपटी मिरच्या(ह्या तिखट नसतात.)
२.एक वाटी बेसन(घरच दळलेल नको,हिरा बेसन पाहिजे,(एक जीव होते.)
३.अर्धा वाटी चिरलेला कांदा(कांदा पाहिजेच ह ..नाहीतर मज्जा नाय)
४.आलं –लसून-मिरची वाटण
५.फोडणीसाठी-चमचाभर जिरे,ओवा,हळद,हिंग
६.दोन चमचे लिंबाचा रस(
७.एक चमाचा साखर
कृती:
प्रथम मिरच्यांचे उभे काप करा.काप करतांना दांडीच्या समोर न करता बाजूला काप करा.त्याने सारण नीट राहते. आतील बिया काढून टाका.
सारण करण्यासाठी कढईत दोन मोठे चमचे तेल घ्या.छान तापल्यावर जिरे,ओवा ,हळद ,आलं-लसूण-मिरची वाटण टाकावे.आता कांदा टाकावा .चांगला परतून घ्यावा.
आता मुख्य नायक बेसन पीठ अर्धी वाटीच टाकावे परतून परतून घ्यावे,जाळण्याचे टाळावे ..फक्त कच्चे राहता कामी नये.परत उरलेले पीठ टाकावे.
लिंबू रस टाकावा आणि एक चमचा साखर टाकावी..सगळ्या चवी एकीकडे आणि आंबट –गोड चव एकीकडे ..जिभेवरच सुख म्हणजे हेच ..अहाहा .
तर अशाप्रकारे सारण कढईतून काढून घ्यावे आणि थंड होऊ द्यावे.
अधीर झालेल्या मिरच्यांमध्ये हे सारण भरावे.अलगद पुन्हा तेल असलेल्या कढईत त्यांना सोडावे.मुक्तपणे तळून तळून द्यावे .कढईवर झाकण ठेवावे त्यात पाणी टाकावे म्हणजे आत मिरच्या शिजतील.(लक्ष असू द्या नाहीतर कोळसा होईल अनुभवाचे बोल).
शेवटी मस्तपणे आनंदाने भाकरी वा पोळीसोबत ताव मारावा.
पहिलीच वेळ आहे अशा काठियावाडी मिरच्या करण्याचा तेव्हा चलचित्र कसेही असले तरी चव अप्रतिम झाली आहे.:)
-भक्ती
https://drive.google.com/file/d/1bccbuGICZKZJrcfxMojnkBkZdXUASRMJ/view?…
फोटो उपलोड करणे शिकतेय सध्या हाच गुगल वर उपलोड झाला आहे.