पालक मसाला डोसा

" पालक " ही पालेभाजी घरातील सर्व सदस्यांनी खावी अशी इच्छा एकंदरीत सगळ्या "पालकांची " असते , सगळ्या पालकांची म्हणजे अगदी आजी - पणजी पासून सगळे आपापल्या मुलांना सांगताना आपण ऐकतो, कारण सगळ्यांना ही पालेभाजी आवडेलच असे नाही . आजकाल "पालक - पनीर " या हॉटेल मध्ये मिळणाऱ्या आणि त्यात पनीर आहे म्हणून खाणाऱ्यांचं प्रमाण थोडे बहुत अधिक आहे. असो आज एक नवीन रेसिपी लिहीत आहे जी पौष्टिक , झटपट नाही जरा वेळ लागतोच, खमंग, चटपटीत आहे .... शिवाय ज्यांना पालकाची चव विचित्र, मातकट इत्यादि वाटते त्यांना ती ठराविक चव लागणारच नाही पण पौष्टिकता भरपूर...

साहित्य -
-हिरवे मूग - १ वाटी
-हरभरा डाळ, तूरडाळ , उडीद डाळ- 2 मोठे चमचे प्रत्येकी
( या शिवाय ज्या हव्या त्या डाळी चालतील)
- १/२ वाटी तांदूळ
- लसूण पाकळ्या ३-४
- हिरव्या मिरच्या ( चवीनुसार)
- पालकाची १५-२० पाने
- जिरं
- हिंग
- हळद
- 2-3 उकडून घेतलेले बटाटे
- १/२ वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची,
-१/२ वाटी किसलेले गाजर
- आमचूर पावडर
- चाट मसाला
- मीठ
- तूप अथवा बटर -२-३ चमचे
- लाल मिरची पावडर
- चीज (आवडत असल्यास)

कृती -
-हिरवे मूग, सर्व डाळी, तांदूळ ६-८ तास भिजवून घेणे
भिजवलेल्या डाळी

साहित्य

साहित्य
- नंतर मिक्सर मध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं , पालकाची पाने, भिजवलेले डाळींचे मिश्रण एकत्र वाटून घ्यावे.
- त्यात मीठ घालून डोश्याचे पीठ तयार होते.
- एका पॅन मध्ये तूप घ्यावे , त्यात जिरं, हिंग, हळद घालावे, त्यात किसलेले गाजर, बारिक चिरलेली शिमला मिरची घालून परतून घ्यावे .
- १वाफ येऊ द्यावी, त्यात उकडलेला बटाटा कुस्कुरऊन घालावा.
- या नंतर त्यात मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला , लाल मिरची पावडर मिसळून छान वाफ आणावी.
- डोश्याच्या आत भरण्यासाठी मसाला तयार आहे.
मिश्रण

-तव्यावर डोसा तयार करून घ्यावा , कडेने मोकळा करून घ्यावा .
- तयार मसाला त्यात मध्यभागी भरावा, वरून पाहिजे असल्यास चीज किसून भुरभुरावे, दोन्ही बाजूंनी डोसा बंद करून त्याचा रोल बनवावा.
डोसा
-याला कोणत्याही चटणी सोबत, टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतो.

चीज घातल्याने ही रेसिपी मुलांना आवडते, त्यासोबत बाकीच्यांना चीज आवडत असेल तर घशात अडकणार तर नक्कीच नाही.
डोसा