श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या

1
नमस्कार मिपाकर. सर्वप्रथम मिपाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा.

या वेळी श्रीगणेश लेखमालेचा विषय 'आठवणी' असा असल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू या, असा विचार करतच होतो, तेवढ्यात सुचले की मिसळपावच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याबद्दल काहीतरी लिहून काढू...

फोरम मिसळपाव.कॉमची ओळख -

चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी शुक्रवार पेठ चिंचेची तालीम येथे राहत होतो, नीलकांत (मिपामालक) आमचे रूम पार्टनर होते. एके दिवशी रात्रीचे साडेनऊ-दहा वाजले असतील, मंग्या आणि मी त्याच्या पीसीवर गाणे ऐकत बसलो होतो. तेवढ्यात "ओ भाऊ, चला बाजूला व्हा, मला कॉम्प्युटरवर काम करायचे आहे" असा आदेश देतच नीलकांत रूममध्ये आला. काय काम आहे? विचारल्यावर तो म्हणाला की "वेबसाइटचे काम करायचे आहे." काय, कसली वेबसाइट, काय.. अशी आमची चौकशी सुरू झाली. "एक मराठी संकेतस्थळ बनवायचे आहे, जे पूर्णपणे मराठीमध्ये असेल, लेखक / कवी त्यावर आपले लेखन प्रकाशित करणार व इतर सदस्य त्यावर प्रतिक्रिया देतील असे संकेतस्थळाचे स्वरूप असेल."

यावर मी म्हणालो, "म्हणजे फोरम ना???"

"नाही रे.." म्हणत त्याने की-बोर्डचा ताबा घेतला व पेन ड्राइव्ह जोडून एक फाइल उघडली, एक marathi.po फाइल ओपन केली.
आज संकेतस्थळ उघडल्यावर जे मराठी शब्द (सदस्यनाव, संकेताक्षर, मिसळपावचे सदस्य व्हा, नवीन संकेताक्षर बोलवा, शीर्षक, लेखक, आवागमन, खरडफळा...) आपल्याला दिसतात, ते इंग्लिशला पर्यायी मराठी शब्द दिसण्यासाठी त्या फाइलचा वापर होतो.

चौदा वर्षांपूर्वी श्रीगणेश चतुर्थीला संध्याकाळी नीलकांत रूमवर आला. त्याने सांगितले की "आज आपली साइट मिसळपाव.कॉम ऑनलाइन झाली." म्हणजे काय म्हटले, तर म्हणाला की "ते तुम्ही फोरम म्हणता ते सुरू झालं आजपासून." यानंतर नीलकांत रूमवर वेबसाइटची कामे करत असताना कधीकधी थोडीफार मदत करत होतो. चर्चा मात्र नियमित होत होती, परंतु बराच काळ सदस्यत्व घेतले नव्हते. एक दिवस आपण केलेले बदल सामान्य सदस्याला कसे दिसणार / दिसणार की नाही, हे बघण्यासाठी मिसळपाव खाते उघडले. मिपाशी मी असा कळत-नकळत जोडला गेलो.

२०१३ साली मी ऑफिसच्या कामासाठी पॅरिसला गेलो होतो. सुटीचा दिवस असल्याने तिथे शिकत असलेल्या नातेवाइकाला (समीरला) भेटायचे होते. समीरने लक्झेंबर्ग स्टेशनजवळ भेटायचे सुचवले. दुपारची वेळ होती. मी स्टेशनवर थोडा आधीच पोहोचलो. त्यामुळे समीरला फोन लावला आणि सांगितले, "मी स्टेशनवर पोहोचलो, तुला यायला किती वेळ लागेल?" त्याने सांगितले की "मला यायला कमीत कमी १५-२० मिनिटे तरी लागतील. तोवर तुम्ही स्टेशनवर न थांबता जवळच्या गार्डनमध्ये थांबा, मी तिथे पोहोचलो की फोन करतो." स्टेशनच्या बाहेर जाण्याचा मार्ग बघत होतो, तेवढ्यात समोरच एक काका दिसले. ते फोनवर बोलत होते.. "अगं.. माझी ट्रेन गेली.. मला यायला थोडा उशीर होईल." मराठी शब्द कानावर पडल्याने बरे वाटले. थोडा समोर जाऊन नमस्कार करून बोलायला सुरुवात केली. थोड्याफार गप्पा व प्राथमिक चौकशी झाली.

गप्पा चांगल्या रंगल्या होत्या, तेवढ्यात काकांनी विचारले,
काका : तुम्हाला लिहिण्या-वाचण्याची आवड असेलच ना?
मी : नाही हो. फार काही आवड नाही. कधीतरी थोडेफार वाचतो. लिहिणे जमत नाही.
काका : इतक्या वेळा पॅरिसमध्ये आलास, इथली बरीच ठिकाणे बघून झाली. त्यावर तुला मराठीतून छान काही लिहिता येईल.
मी : नाही हो, मला काही लिहायला जमत नाही.
काका : मला एका मराठी वेबसाइटबद्दल माहीत आहे. तिथे तु तुझे फिरण्याचे अनुभव लिहू शकतोस, फोटोसुद्धा टाकता येतील.
मी : अरे वा..! मीही एका मराठी वेबसाइटसाठी काम करतो. पण कधी लिहीत नाही.
काका : कोणती साइट?
मी : मिसळपाव.कॉम
काका : कोण तू? (कंबरेवर हात ठेवून, आश्चर्याने माझ्याकडे बघत) नाव काय तुझं?
मी : प्रशांत.
काका: नाही. मिपावरचं नाव काय आहे?
मी : प्रशांतच आहे.
काका : टेक्निकल कामात मदत करता, ते प्रशांत का तुम्ही?
मी़ : हो.
काका : अरे,! मी शरद... माझं नाव चित्रगुप्त..
मी : अहो... मी तुमचे लेख वाचतो.

1
इतक्यात समीर तिथे आला. चित्रगुप्तकाकांशी त्याची ओळख करून दिली. तेवढ्यात काकांचा फोन वाजला. त्यांनी घरी सांगितले की "एक ओळखीचे भेटले, त्यामुळे यायला उशीर होतोय." फोन झाल्यावर काकांनी सांगितले की "पहिल्यांदा मी फोनवर बोलण्याची सोंग करत होतो. तू फोनवर मराठीत बोलत होतास, तेव्हा तुला कळावे की मी मराठी बोलणारा आहे."

परत गप्पा सुरू झाल्या. त्यादरम्यान काकांनी सांगितले की त्यांच्याकडे louvre चा पास आहे आणि सोबत दोन व्यक्तीसुद्धा नेऊ शकतात (तिकिटे काढायची गरज नाही). मग लगेच पुढच्या आठवड्यात आम्ही louvreला जाण्याचे ठरवले. याआधी मी तीन वेळा तिथे गेलो होतो, पण दोन तासांत बाहेर पडलो होतो. मात्र या वेळी तीन तास एकाच हॉलमध्ये थांबलो होतो. चित्रगुप्तकाका प्रत्येक पेंटिंगची कथा सांगत होते, रंगसंगती समजावून सांगत होते.

मिपा कट्ट्यात भरपूर लोकांची ओळख झाली, काही खूप चांगले मित्रसुद्धा झालेत. कट्ट्याला किंवा इतर काही कारणाने मिपाकर भेटतात/बोलतात, मिपावर कसे आले ते सांगतात, त्यांचे मिपाबद्दलचे अनुभव सांगतात.

कोणी मिपाकर भेटून सांगतो, "मी कामानिमित्त मित्र/परिवारापासून दूर जातो, तेव्हा मला मिपाचा फार आधार मिळाला, मित्र मिळाले, त्यामु़ळे मिपाचे आभार.." असे अनुभव आठवले की मिपाचे काम करण्यास उत्साह येतो.

तर मंडळी, तुमच्या मिपाच्या/मिपाकरांच्या काही चांगल्या आठवणी असतील त्या सांगा.

2