श्रीगणेश लेखमाला २०२० - अजाणता

1

मी त्या वेळी चार-साडेचार वर्षांची असेन. आम्ही त्या वेळी मलकापूरला राहात होतो. मी सगळ्यांत धाकटी, शेंडेफळ. त्यामुळे सर्वांची लाडकी. वडील डॉक्टर. घरापासून दवाखाना जवळच होता. मलकापूर तसं खेडंच. घरापासून दूर एस टी स्टँड होता. रेल्वे नव्हती. घरापासून जरासं दूर एक देऊळ होतं. त्या देवळातच शाळा भरायची. प्राथमिक. शाळेत मुलं फारशी नव्हती. मी गंमत म्हणून कधीतरी शाळेत जाऊन बसायची. वडील डॉक्टर म्हणून गावात वडिलांचा दबदबा होता. डॉक्टरांची मुलगी शाळेत येऊन बसते याचं कौतुकच होतं. हरकत कुणीच घेत नसे. मी कंटाळा आला की शाळेतून उठून यायची. तसंही शाळेत अ‍ॅडमिशन वगैरे घ्यायचं माझं वय नव्हतंच. त्या वेळी मॉंटेसरी, बालवाडी असं काही मलकापुरात तरी नव्हतं. सर्वांत जवळचं जिल्ह्याचं शहर म्हणजे कोल्हापूर.

मी दिवसभर हिंडत असायची. शिवदेवी नावाची माझी मैत्रीण होती. बाळू नावाचा एक पोरगा मित्र होता. आम्ही तिघेही खेळायचो. भूक लागली की घरी जायचं, नाहीतर शिवदेवीकडेच जेवायचं. आई शोधत यायची जेवणाची वेळ झाली की. मी जशी मनात आलं की शाळेत जायची, तशी देवळातही जायची. देवाला नमस्कार करायचा. प्रदक्षिणा घालायची. त्याच्यावर आधीच वाहिलेलं फूल उचलून पुन्हा तेच त्याला वाहायची. (नाहीतरी आपण काय करतो? देवाचीच निर्मिती असलेल्या झाडावरचं फूलच देवालाच पुन्हा अर्पण करतोच ना?)

देवळात बसायचा कंटाळा आला की मी वडिलांच्या दवाखान्यात जायची. डॉक्टरसाहेबांची मुलगी म्हणून तिथले कंपाउंडर, नर्सबाई कौतुक करायच्या. उचलून घ्यायच्या. दवाखाना सरकारी होता. वडील सरकारी डॉक्टर होते. वडिलांच्या दवाखान्यात माझा मुक्त संचार असे. वडिलांची एक स्वतंत्र, प्रशस्त केबीन होती. तिथेच पडदा लावून तपासणीचं एक टेबल ठेवलेलं होतं. वडिलांसमोर एक मोठं टेबल होतं. त्यावर एक डेस्क कॅलेंडर, प्रिस्क्रिप्शन पॅड, बीपीचं मशीन असं ठेवलेलं असे. अर्थात हे मी आत्ता मोठेपणी सांगतेय. लहानपणी माझ्या दृष्टीने ते एक कसलं तरी मशीन हंतं.

तिथे आणखी एक वस्तू होती. बाउलसारखं एक पसरट भांडं होतं. त्या भांड्यात भरपूर नाणी ठेवलेली असत. वडिलांकडे पेशंट्स यायचे. त्यांनी दिलेले पैसे वडील त्यात ठेवायचे आणि त्यातूनच त्यांना उरलेले सुटे पैसे द्यायचे. त्या वेळी फी अगदी कमी होती. एखादा रुपया असेल. रुपये-आणे-पैशांत हिशेब चालायचा. त्या नाण्यांशी खेळायला मला खूप आवडायचं. ती चिल्लर ओतायची आणि पुन्हा भरायची हा माझा आवडता खेळ असायचा. वडील रागावले की मी हा खेळ आटोपता घ्यायची.
माझं जग फार लहान होतं. घर, दवाखाना, देऊळ, शाळा आणि बाळूचं शिवदेवीचं घर. वाहनं नव्हती. रस्ता रहदारीचा नव्हता. सगळं सेफ होतं. मुलं कुठे खेळताहेत याचा आईवडिलांना पत्ता नसायचा. माझ्या अंगात दिवसभर एकच फ्रॉक असायचा. पायांत चपला वगैरे नाहीत.

माझ्या ह्या लहानशा परिसरात एक आकर्षण होतं. तिथे एक 'गारीगारवाला' यायचा. तो ओरडायचा, "ठंडा मीठा लाया है। बरफवाला आया है।" त्याची एक हातगाडी होती. त्यावर एका पोत्याखाली बर्फ झाकून ठेवलेला असे. एक खिसणी असे. वेगवेगळ्या रंगाचं साखरेचं पाणी भरलेल्या बाटल्या असत. कांड्या असत. तिथली शाळेतली मुलं हे त्याचं गिऱ्हाईक होतं. मधल्या सुटीत मुलं त्याच्या गाडीभोवती गोळा होत. मग ती मुलं बर्फाचा गोळा मागत. तो एक कांडी घेत असे. पोत्याखालचा बर्फ दगडाने फोडत असे. तो बर्फाचा तुकडा खिसत असे. खिसलेला बर्फ कांडीभोवती हाताने सर्व बाजूंनी दाबून गोलाकार करत असे आणि त्या बर्फाच्या गोळ्यावर बाटलीतलं साखरेचं रंगीत पाणी टाकत असे. लाल, ऑरेंज, पिवळा, चॉकलेटी. मग तो रंगीत गोळा मुलाच्या हातात देत असे. त्याच्याकडून पैसे घेऊन पत्र्याच्या चौकोनी डब्यात टाकत असे.

तो गोळा बघून माझ्या तोंडाला पाणी सुटत असे. वाटत असे, आपण पण तो गोळा घ्यावा आणि खावा. कसा लागत असेल? मी प्रयत्नपूर्वक लाळेचा आवंढा गिळत घरी परतत असे.

एके दिवशी मी हट्ट धरला. आईला म्हटलं, "मला तो बरफवाल्याकडचा गोळा खायचाय." आई म्हणाली, "शी.. तसलं काही खायचं नसतं. शहाणी मुलं खात नाहीत." वडील म्हणाले, "तो बर्फ शुद्ध, चांगल्या पाण्यापासून केलेला नसतो. त्याच्यावर टाकलेलं पोतं स्वच्छ नसतं. त्या बर्फवाल्याचे हात स्वच्छ धुतलेले नसतात. तो त्याच हाताने नाक पुसतो, विडी ओढतो. त्याच हातांनी नाणी घेतो. नाण्यांना तर कितीतरी जणांचे हात लागलेले असतात. त्याच हातांनी तो बर्फाचा खीस दाबतो. ते खाल्लं की पोटात जंत होतात. तू शहाणी ना? हट्ट करायचा नाही."

मी गप्प बसायची. मान डोलवायची, पण मनातून तो बरफवाला जायचा नाही. एके दिवशी मी कसलासा निश्चय केला. मी वडिलांच्या दवाखान्यात गेले. वडील हसून म्हणाले, "आली का माझी शोनी? गडबड करायची नाही हं. शांत बसायचं. बैस त्या खुर्चीवर. तुला कागद, पेन्सिल देऊ का? चित्र काढत बसतेस? फूल काढ." मी मान डोलावली. दिलेल्या कागदावर काहीबाही गिरबाटलं. माझं लक्षच नव्हतं चित्र काढण्याकडे. आणि मला फुलाच्या चित्राखेरीज दुसरं चित्र तरी कुठं काढता येत होतं? माझं लक्ष होतं वडिलांच्या टेबलावरच्या पैशाच्या बाउलकडे. वडील खाली मान घालून काहीतरी लिहीत होते. समोर पेशंट उभा होता. मी टेबलाजवळ गेले आणि बाउलमध्ये हात घालून सरळ त्यातले काही पैसे उचलले आणि फ्रॉकच्या खिशात घातले. ते किती होते कुणास ठाऊक! मोजता कुणाला येत होतं? 'मी जाते घरी'असं वडिलांना जेमतेम सांगून मी दवाखान्याबाहेर पडले.

दूरवर बरफवाला उभा होता. मी पळत त्याच्याकडे गेले. त्याच्या हातगाडीच्या उंचीला माझी हनुवटी लागत होती. बरफ कांडीची किंमत किती वगैरे विचारायचं मला कळतच नव्हतं. खिशातले सर्वच्या सर्व पैसे मी निष्पापपणे त्याच्यासमोर धरले. म्हटलं, "बर्फाचा गोळा द्या. लाल रंगाचा." त्याने ते पैसे न मोजताच पत्र्याच्या पेटीत टाकले.

त्याने हातात कांडी घेतली. खिसलेला बर्फ तिच्यावर दाबला. साखरेचं लाल रंगीत पाणी तिच्यावर टाकलं आणि कांडी माझ्या हातात दिली. माझ्या तोंडात चळ्ळकन् लाळ सुटली. मी आवंढा गिळला. मी कडेकडेने चावत चोखत तो बर्फाचा गोळा सावकाशपणे खायला सुरुवात केली. संपूर्ण परिसरात कुणीच नव्हतं. मी एकटीच होते. बर्फाचा गोळा मी डोळे मिटून खात होते. गोड गोड. गार गार. माझे ओठ आणि जीभ लाल झाली असणार. शाळेतल्या त्या मुलांची होते तशी. मी तृप्त झाले. शांत झाले.

मी घरी आले. जेवायची वेळ झाली. वडील जेवणासाठी दवाखान्यातून घरी आले. ताईने पानं मांडली. दादाने पाण्याचे तांब्ये भरून आणले. सगळे जेवायला बसलो. सगळे जेवताना गप्पा मारत होते. मी मात्र गप्पपणे जेवत होते. आईला वाटलं, शिवदेवीशी भांडण झालं म्हणून मी गप्प आहे.

वडिलांनी माझ्या तोंडाकडे पाहिलं आईनेही पाहिलं.

वडील म्हणाले, "ह्या रविवारी आपण कोल्हापूरला जाऊ या. सगळे जण पोटभर आइसक्रीम खाऊ या."

आईने हसून मान डोलावली.

माझ्या मनात खूप खूप विचार येत होते. मी पैसे घेतले आणि बर्फाचा गोळा खाल्ला हे वडिलांना कळलं असेल का? नसावं. नाहीतर ते मला रागावले असते. त्यांनी मला शिक्षा केली असती. कोण सांगणार त्यांना? शाळेतले गुरुजी? त्यांचा तो तिथे उभा असलेला पेशंट? की बरफवाल्यानेच सांगितलं? की वडिलांनी स्वतःच पाहिलं पैसे घेताना? न विचारता दुसऱ्याचे पैसे घेणं वाईट?

आई म्हणते, "आपण कुठलंही काम करत असताना आपल्याला वाटतं आपल्याला कुणीच पाहिलं नाही. पण देव आपल्याला पाहात असतो." मी पैसे घेताना, गोळा खाताना देवाने मला पाहिलं असेल का? मग तो मला शिक्षा करेल? मला भीती वाटली. रडू फुटलं. पण कुण्णाला काहीही सांगितलं नाही. देवाने नंतर बर्‍याच शिक्षा आयुष्यात दिल्या, पण कोणत्या चुकीची कोणती शिक्षा हे मानवाला सांगण्याची देवाची पद्धत नाही. त्यामुळे मला त्या चुकीची शिक्षा मिळाली का, हे मला समजलं नाही.
एक खरं - त्यानंतर लहानपणी मी इतक्यांदा दवाखान्यात गेले, पण पैशाच्या त्या बाउलला मी कधी हात लावला नाही.
2