नमस्कार मिपाकर्स..
सालाबादप्रमाणे गणरायांच्या आगमनाचा दिवस आला आहे.
आज आहे मिपा परिवाराचा १४वा वर्धापनदिन!
आणि हाच तो दिवस जेव्हा येते मिपाची श्री गणेश लेखमाला. दरवर्षी आपण एका संकल्पनेभोवती लेखमाला गुंफतो आणि ती वाचकांसमोर सादर करतो.
यंदाच्या नवव्या लेखमालेची संकल्पना आहे आठवणी, स्मृती, नॉस्टॅल्जिया. आपल्याला आठवणी किती प्रिय असतात, हे यंदाच्या श्रीगणेश लेखमालेच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादावरून लक्षात येते. गणेशोत्सवाचे दहा दिवस आपण साधारण दहा ते पंधरा लेख प्रकाशित करतो. यंदा चाळीसहून अधिक लेख व्य नि आणि ईमेलने प्राप्त झाले. त्यातून निवडक लेख घेणे हे तसे जिकिरीचे काम होते. सर्व चांगल्या लेखांना जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल, याचा प्रयत्न करत आहोत.
यानिमित्ताने काही नवे सदस्य आपल्या परिवारात सामील होत आहेत. त्यांचंही मनःपूर्वक स्वागत. तुम्ही लिहिते राहाल, याची खात्री आहे. मिपावर अनेक तरुण, उत्साही, नव्या विचारांचे सदस्य येत आहेत. त्याने आपल्या सर्वांचे मिपायुष्य जास्त समृद्ध होत राहील.
पुढचे दहा दिवस उत्साहाचे, चैतन्याचे, मांगल्याचे अन आपल्या मिपाच्या श्रीगणेश लेखमालेचे आहेत. आपलं मिपावरील प्रेम, लोभ असंच अखंडित राहू द्या.
तुम्हाला, तुमच्या परिवाराला, मित्रपरिवाराला गणेशोत्सवाच्या आणि चौदाव्या मिपा वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!