किचन मध्ये पुन्हा थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न आता करावा म्हणतो आहे. कधीकाळी रुम वरती थोडाफार स्वयपाक केल्याचा अनुभव होता.. पण त्या नंतर कित्येक वर्ष मात्र किचन मध्ये काहीच केले नाही..
बेसिक गरज : किचन हे स्वच्छ असावे .., फोटो देताना पण किमान निदान स्वच्छता दिसलीच पाहिजे.
(अवांतर
- नाहीतर मध्ये फेसबुकवरती, केतकी चितळे ने साबण कमी वापरुन त्याचा परिपुर्ण वापर कसा केला पाहिजे हे सांगायला बाथरुम मधला साबन कापण्याचा विडीओ दिला, आणि तिचे अतिशय घाणेरडे बाथरुम बघुनच किळस आली. कसे कळत नाही बरे लोकांना.
असे निदान पाककृती विभागात झाले नाही पाहिजे, किचन छानच हवे.
पाककला च काय कुठलीही कला ही स्वच्छतेच्या ठिकाणी जास्त उठुन दिसते असे माझे मत..
)
सुरुवात करताना जरा चांगला किंवा वेगळा पदार्थ घेवून सुरुवात करावी असे जरी वाटत असले तरी चहा प्रथम घेण्याचे कारण आहे.
एक तर चहाची रेसेपी मी कुठे ही कोणी लिहिलेली किंवा सांगितलेली पाहिलेली नाही.
आणि बर्याचदा चहा पिताना, असला का यांनी /हिने चहा बनवला आहे असे वाटत राहते.
बर एकाच माणसाने रोज सारख्याच चवीचा चहा तरी करावा ना, पण नाही, आज काय गोड, उद्या सपक, नंतर काय तर चहापत्तीच नीट उकळलेली नाही.
असो.
आता चहा पण प्रत्येकाला वेगवेगळा आवडतो, काहींना काळा चहा आवडतो, काहींना मसाला चहा आवडतो, काहींना अद्रक वाला तर काहींना विलायची चहा.
काहींना दुध आणि चहा पावडर नंतर कपात मिक्स केलेला चहा आवडतो.
मला मात्र नेहमी प्लेन चहा आवडतो.. प्लेन आणि कडक, कधीतरी गवतीचहा ची पाणे टाकतो त्यात मी. पण जास्त आवडतो तो प्लेन असलेला चहा..
माझे म्हणणे असेच आहे, कुठली ही गोष्ट ही त्याच्या बेसिक गुणधर्मावर आवडली पाहिजे, त्यात कसल्या ही गोष्टी अॅड करुन त्या प्रमाणे चव आणली तर बेसिक गोष्ट कुठे तरी हरवल्या सारखी वाटते. अगदी वडापाव जरी खायचा म्हंटला तरी त्याची चटणी बाजुला घेवून तीला तोंडी लावुन खाण्यात मज्जा असते, ती चटणीच पावाला अखंड लावून तीची चव म्हणजे वडापाव ची चव भारी असे का म्हणायचे ? अगदी पुण्यातला गार्डन वडापाव त्यामुळेच मला आवडत नाही, चटणीचीच सारी चव.. अरे वडापावला स्वताची चव असतेच असते.
चहाचे पण तसेच आहे..
तर चला आता जास्त पान्हाळ न लावता चहा कडे वळु या.
साहित्य आणि कृती (2 कप चहासाठी) :
१. मल चहा आणि दुध मिक्स करुन नंतर त्यात चहा पावडर टाकणार्यांचा खुप राग येतो..
तर आधी १ १/२ कप पाणी गॅस वर ठेवावे.
असे झोपेतुन उठुन आल्यासारखे, तुमच्या घरात लुडबुड करायला कोणी असेल तर त्याला लुडबुड करुन द्यावी.
१ १/२ कप पाणी.
२.आणि गॅस चालु करुन, पाणी थोडे उकळायला लागले की त्यात चहा पावडर टाकावी.. मला कडक चहा आवडतो म्हणुन रेड लेबल चहा मला जास्त आवडतो.
जर तुम्ही टीव्ही किंवा इतर काही बघता बघता चहा करत असाल तर साखर पण लगेच टाकली तरी जास्त काही फरक पडत नाही.. नाही तर थोड्या वेळाने साखर टाकावी. आणि चहा उकळुन द्यावा.
प्रमाण : ( चमच्याचे माप वेगवेगळे असेल तर एक दोनदा चहा करुन हे प्रमाण आपल्या आवडी नुसार बदलावे)
चहा पावडर - ३ छोटे चमचे.
साखर - ३ मोठे चमचे.
चहापावडर टाकताना
साखर टाकताना
३. चहा चांगला ५ मिनिटे उकळुन द्यावा, अतिशय सुंदर चहाचा सुवास यायला लागल्यावर त्यात १ कप उकळलेले दुध टाकावे.
काही लोक गार दुध चहात टाकतात, त्याने चहा आणखिन जास्त वेळ उकळवुन द्यावा लागतो, आणि त्यामुळे तो काळा किंवा कडवट ही बनु शकतो. म्हणुन दुध बाजुला उकळुन घेवुन मग चहात टाकावे.
चहा हा घट्ट , दाट असला पाहिजे, त्या साठी म्हशीचे दुध वापरावे. गाईच्या दुधाचा चहा निट लागत नाही.
त्यात ही सकाळी चहा करत असाल तर कालचे शिळे फ्रीज मध्ये ठेवलेले दुध पुन्हा एकदा उकळवून ते चहात मध्ये टाकल्यास चहा खुपच भारी लागतो.
४. आता चहा पुन्हा ३-४ मिनिटे हळु गॅस वर ठेवुन द्यायचा, घाई घाई करुन मोठा गॅस वर लगेच उकळी आणुन द्यायची नाही,आपल्याला काय २ मिनिटात चहा केला असले कुठलेही पारोतोषिक जिंकायचे नसते किंवा कुठे जाहिरात ही करायची नसते. त्यामुळे हळु गॅस वर ३-५ मिनिटे चहा उकळुन द्यायचा, आता चहाला सुंदर लालसर रंग आलेला असतो, काळासर चहा लोक का करत असतील हे मला कळत नाही. जर काळाच चहा करायचा असल्यास बीन दुधाचा चहा करावा.
५. आता चहा कपात घ्यावा. त्याला लालसर कलर आलेला हवा.. आणी तो चहा दाट आणि सोबत कडक ही हवा. काही लोकांना दाट चहा करताना तो कडक होत नाही, आणि कडक चहा म्हंटले की त्याला जास्त उकळल्याने, तो एकतर मुळ चवी पेक्षा जळका आणि काळा होतो,
चहा..घट्ट आणि लालसर आणि कडक पण.
कधीतरी दुध पिणार्या माऊ ला पप्पांनी केलेला चहा प्यायचा असेल तर थोडासा पिऊ द्यावा.. तेथे नियम लावु नये.