माझा जन्म आणि पहिली २६ वर्षे इंदुरात गेली. हा प्रांत इतिहासात ‘माळवा’ या नावाने ओळखला जातो. मल्हारराव होळकर (१६९४ - १७६६) हे माळवा सुभ्याचे पहिले मराठी अधिपती. त्यांची सून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (१७२५ - १७९५) यांची स्मृती आजही माळवावासीयांनी जपलेली आहे.
इ.स. १७८०मधील माळवा प्रांताचा नकाशा.
मराठी विश्वकोशातील माळव्याबद्दल माहिती खालील दुव्यावर वाचता येईल -
https://vishwakosh.marathi.gov.in/29045/
त्या काळी इंदूरच्या भोवतालचा परिसर अतिशय रम्य होता. सर्वत्र झाडे, लहान-मोठी खेडी, त्यातली मातीची कौलारू घरे आणि त्यांचे मोठमोठे चित्रविचित्र आकाराचे प्रशस्त ओटे (माळवी भाषेत ‘ओटलो’), बैलगाड्यांच्या खोल चाकोऱ्या पडलेले कच्चे रस्ते, खळखळणारे ओढे, त्यावरले लाकडी वा दगडी पूल, चिंचेची, वडा-पिंपळाची मोठमोठी झाडे... असा. मी तिथे खूप रमायचो. कुठेही बसून निसर्गचित्रे काढावीत. मला अगदी लहानपणापासून परिचित आणि प्रिय असलेले राळामंडळ आणि देवगुराडिया हे डोंगरही जवळच होते. थोडेसे दूर गेले की सिमरोल, पाताळपाणी, गिदिया खो (खो म्हणजे खोल दरी), हत्यारा खो असे गर्द झाडीने वेढलेले धबधबे, नर्मदाकाठी महेश्वर, ओंकारेश्वराचे घाट, तिथली मंदिरे, गढ्या, किल्ले..... अशा त्या माळव्यात व्यतीत झालेले बालपण आणि तारुण्य यांच्या असंख्य रम्य स्मृती मनात घर करून आहेत.
मशारनिल्हे ‘हत्यारा खो’मध्ये होळकरांच्याही आधीपासून या प्रांताचे अधिपती असलेल्या संपूर्ण ‘मंडलोई’ परिवाराला विषप्रयोगाने मारून या दरीत टाकून दिले होते. त्यापैकी एक गर्भारशी सून जिवंत असलेली तिथल्या आदिवासींना सापडली. तिला नीट बंदोबस्तात तिच्या माहेरी राजस्थानात नेऊन पोहोचवण्यात आले. जन्माला आलेल्या मुलाने कालांतराने इंदूरला येऊन गादीवर बसलेल्या शत्रूचा नि:पात करून परत आपले घराणे स्थापित केले. त्यांचे वंशज आजही ‘जमीनदार’ या नावाने जुन्या इंदुरातील त्यांच्या जुन्या गढीत राहत आहेत. त्यांच्याच मालकीच्या असलेल्या एका चाळीत माझे बालपण गेले. मात्र ही चाळ चांगल्या मोठ्या हमरस्त्यावर असून खाली दुकान आणि वर दोन मजली घरे असलेली प्रशस्त अशी होती. तिथे आमचे औषधाचे दुकान होते. (मात्र आम्ही कुणीही त्यातले एकही औषध कधी घेतले नाही. वडिलांचा भर साधी, नैसर्गिक रहाणी आणि घरगुती इलाज यांवर असायचा.)
नववीत असताना वडिलांबरोबर एकदा सायकलने दूरवर फिरताना एक जुनाट पूल दिसला. पूल तुटलेला असल्याने ओढ्याच्या वेगवान पाण्यातून कशातरी सायकली ओढत तो पार केला. भोवताली सर्वत्र हिरवळ, झाडी. पावसाळ्याचे दिवस. अगदी भारून टाकणारे वातावरण होते. बरोबर कागद, रंग नेले होते. मग तिथल्ल्या (खास इंदौरी उच्चार) चिखलात त्यातल्या त्यात जरा कोरडी जागा बघून त्या जुन्या पुलाचे चित्र काढायला बसलो. पुलाच्या तुटक्या विटा वगैरे अगदी तपशिलात जाऊन रंगवल्या होत्या. हे माझे प्रत्यक्ष जागेवर बसून काढलेले पहिले-वहिले निसर्गचित्र. तेव्हा अगदी धन्य धन्य वाटले होते. (हे चित्र घरी अजून माझ्याकडे आहे, पण आत्ता त्याचा फोटो उपलब्ध नाही.)
या निसर्गचित्रातला तो पूल आज पन्नासहून अधिक वर्षे झाली, तरी माझ्या मनात घट्ट रुतून आहे. काल्पनिक चित्रे रंगवताना अनेकदा चित्रात कळत नकळत तो अवतरतो. उदाहरणार्थ, माझी अलीकडील ही चित्रे -
चित्र क्र. १ व २
पुढे दहावीनंतर चित्रकला शिकायला सुरुवात केल्यावर रेखाटनासाठी दूरदूरपर्यंत सायकलने भटकू लागलो, तेव्हा या प्रदेशाची खरी ओळख होऊ लागली. माळव्यातली खेडी आणि खेडवळ लोक, त्यांची वेषभूषा, बोलीभाषा, पारंपरिक लोकसंगीत.. सगळेच मोहक.
ऐका : ‘मालवा की लोकधुने’ : कुमार गंधर्व
https://www.youtube.com/watch?v=oMxsjX0gZf0
या खेडेगावांची असंख्य चित्रे त्या काळात मी रेखाटली. बरीचशी रंगचित्रे प्रत्यक्ष तिथे बसून रंगवली. (सर्वप्रथम १९७६मध्ये आणि नंतरही मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरीत त्या खास माळवी चित्रांची प्रदर्शनेही भरवली.)
माळवी खेडेगावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष समोर बसून केलेल्या सुरुवातीच्या रेखाटनांपैकी काही चित्रे -
चित्र क्र. ३-६
चित्र क्र. ७
पंथापिपलाई गाव
१९७५च्या सुमारास एकदा इंदौरहून उज्जैनला जाताना लांबवर ‘पंथापिपलाई‘ नावाचे एक गाव दिसले. तिथूनच पटकन त्याचे एक रेखाटन केले. अनेक वर्षांनंतर त्यावरून वरील तैलचित्र रंगवले.
जुन्या रेखाटनांवरून नंतरच्या काळात केलेली आणखी काही चित्रे
चित्र क्र. ८ व ९
पुढे १९७७ सालापासून दिल्लीत वास्तव्यासाठी आल्यावर माळव्याच्या आठवणींनी झुरत राहायचो. मग कल्पनेने माळव्याच्या गावांची चित्रे काढणे सुरू झाले, तीही खूप काढली. त्यानंतर मध्यंतरी बराच काळ व्यतीत झाला, त्यात ‘हुबेहूब’पासून अमूर्त चित्रांपर्यंतचे अनेक निरनिराळे प्रयोग करत राहिलो, परंतु माळव्याचा विसर कधीच पडला नाही.
नंतरच्या काळातील विविध प्रकारे केलेली काही चित्रे :
चित्र क्र. १०
चित्र क्र. ११ व १२
चित्र क्र. १३
चित्र क्र. १४ व १५
चित्र क्र. १६ व १७
चित्र क्र. १८
अहिल्याबाईंची स्मृती जपणारा नर्मदेकाठचा परिसर, तिथली मंदिरे, किल्ले, खडक, तसेच तिकडल्या घाटांवर विविध उद्योगात रमलेले लोक वगैरेंचा प्रभावही माझ्या कलेवर दीर्घ काळापासून आहे, त्यापैकी काही कल्पनाचित्रे :
चित्र क्र. १९
चित्र क्र. २० व २१
चित्र क्र. २२
चित्र क्र. २३
चित्र क्र. २४
चित्र क्र. २५
तर अशी ही आठवणींची आणि चित्रकलेची यात्रा.
अवांतर - मल्हारराव होळकरांवरील एक जुने पुस्तक :