जादूच्या दिव्यातल्या राक्षसासारखी, आज्ञा करताच तत्क्षणी इच्छापूर्ती करणारी 'तू नळी' आज आपल्या सेवेस सादर आहे. नाटक, सिनेमा, भाषणं, गाणी.. अगदी कीर्तनदेखील आपण 'कधीही कुठेही' बघू शकतो, ऐकू शकतो. आज तंत्रज्ञानाचे असंख्य फायदे आहेत. पण सत्तरच्या दशकात हे शक्य नव्हतं.आजही जिथे 'लाइव्ह' शब्दाची जादू आहे, तिथे माझ्या लहानपणी साहजिकच आम्ही वाट पाहायचो ती मनोरंजनाची बहार असलेल्या गणेशोत्सवाची आणि नवरात्र शारदोत्सवाची.
त्या काळी गणेशोत्सव मंडळंही मोजकीच असत. त्यापैकी श्री गणेश मंदिर संस्थानचा गणेशोत्सव हा हलत्या चित्र देखाव्यासाठी, आगमन आणि विसर्जनाची लेझीमच्या तालावरची लयबद्ध मिरवणूक, तसंच दर्जेदार कार्यक्रमांसाठी ख्यात होता. विविध नामवंत वक्ते आपले विचार आणि नामवंत कलाकार आपली कला या कार्यक्रमातून सादर करत. मंदिर आणि आमचं घर यामध्ये केवळ रस्ता होता. अंगणातल्या कट्ट्यावर बसून कार्यक्रमाचा आनंद घेणं सहज शक्य होतं. पण कार्यक्रम सादर करणारे कलाकार जास्तीत जास्त जवळून बघता, ऐकता यावेत म्हणून वेळेआधीच अर्धा तास जाजमावर पहिली रांग पकडून बसायची कोण उतावीळ!
यापैकीच आठवणीतले दोन कार्यक्रम म्हणजे कथाकथन आणि मंतरलेल्या चैत्रबनात.
द मा. मिरासदारांची 'माझी पहिली चोरी', शंकर पाटलांची 'धिंड', व्यंकटेश माडगूळकरांची 'शिकार कथा' आणि शंकरराव खरातांची अशीच एक विनोदी कथा साभिनय ऐकणं मनात कायमचं कोरलं गेलं. या कार्यक्रमाच्या वेळी एक गंमत झाली. नामवंत कलाकारांच्या सह्या गोळा करणं ही त्यावेळी मोठी प्रतिष्ठेची गोष्ट. त्यामुळे कार्यक्रम संपल्यावर मीही माझी वही-पेन घेऊन गेले. गर्दीतून संधी साधून चौघांच्या सह्या मिळवल्या. मोठ्या खुशीत मी घरी येऊन बाबांना दाखवल्या.
बाबा सह्या बघत म्हणाले, "आणि भाव्यांची सही नाही ती घेतलीस?"
मी प्रश्नार्थक चेहरा करून विचारलं, "कोण भावे?"
बाबा म्हणाले, "अगं प्रसिद्ध लेखक पु.भा. भावे. आपल्या गावचे. तेही होते की तिथे."
मला हसू आलं. दिव्याखाली अंधार म्हणतात तो हा असा!
घर बदलताना ती मूल्यवान वही गहाळ झाली. हं....! असो.
गदिमा आपल्या ' मंतरलेले दिवस' या पुस्तकात म्हणतात,
लुटून नेसी काय काळा, सौख्य माझे मागले?
भोगले ते भोगले!
दुःखाप्रमाणे सुखही आपण भोगतोच (उपभोगतो) आणि ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. ह्याचा अनुभव म्हणजे याच गदिमांच्या अर्थपूर्ण, चपखल शब्दांनी गुंफलेल्या गीतांचा 'मंतरलेल्या चैत्रबनात' नावाचा अतिशय सुंदर कार्यक्रम गणेशोत्सवात सादर झाला होता. माझ्या आठवणीप्रमाणे तो प्रयोग त्यांच्या प्रारंभीच्या काळात सादर झालेला प्रयोगांपैकी एक होता. 'नखांनखांवर रंग भरा' या गीताने सुरुवात होत शेवटपर्यंत कार्यक्रमात रंग चढत्या क्रमाने भरत गेला होता. रसिकांसाठी हा श्रवणसुखाचा अनुभव होता आणि आमच्या पिढीच्या मनात उत्तम शब्दसंगीताचं बीजारोपण होत होतं. शोभा जोशी, रंजना पेठे, अनुराधा मराठे, शैला दातार इत्यादी गायक कलाकार होते आणि त्यांचे वादक साथीदार त्यांना समरसून साथ देत होते. 'वन्स मोअर'मुळे कार्यक्रम संपला, तेव्हा खूप रात्र झाली होती. या वाद्यवृंदात ढोलकी वाजवणार्या कलाकाराने (त्याचं नाव श्री. मुखडे होतं, असं मला स्मरतंय.) बहारच आणली होती. माझा दादा तर तर त्यांच्यावर एवढा फिदा झाला की कलाकारांनी सामानाची बांधाबांध करायला घेतली, तेव्हा तो थेट मंचावरच चढला आणि त्याने ढोलकी वादकाला घरी यायचा आग्रह केला. रात्र खूप झाली होती, त्यामुळे ते आधी नाहीच म्हणाले, पण त्यांना आग्रह मोडवेना. घर समोरच असल्याने ते तयार झाले. घरी येऊन काॅफी पिऊन गेले. दादाच्या चेहर्यावरचा तेव्हाचा आनंद मी आजही विसरू शकत नाही.