श्रीगणेश लेखमाला २०२० - परतवाडा सुपर.. !

1

"फलाट क्रमांक तीनवर लागलेली गाडी सहा वाजताची परतवाडा सुपर बस असून बस मध्ये कुठेच थांबणार नाही. परतवाड्याला थेट जाणाऱ्या प्रवाशांनीच गाडीत बसून घ्यावे!" अशी घोषणा लाउडस्पीकरवरून अमरावती बस स्थानकाच्या बाहेरसुद्धा ऐकू यायची आणि प्रवाशांची पावले जलदगतीने बसकडे वळायची!

१९८०च्या सुमारास परतवाडा एसटी डेपोने अमरावती विनाथांबा बस सुरू केली आणि ही बस प्रचंड लोकप्रिय झाली. याआधी अमरावतीला जाणाऱ्या बसेस भुगाव, आसेगाव, पूर्णानगर, वलगाव अशा अनेक ठिकाणी थांबत, मजल-दरमजल करीत अमरावतीला पोहोचत किंवा परत येत! अमरावती हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे परतवाड्याहून अमरावतीला जाणारे खूप लोक असत. व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, कोर्टकचेरीवाले, हॉस्पिटलला जाणारे असे अनेक लोक असत! त्यांना लवकरात लवकर अमरावतीला पोहोचून, कामे आटपून पुन्हा रात्रीच्या आधी घरी परतायचे असे! त्यांच्यासाठी ही सुपर बस म्हणजे एक वरदानच ठरली! दर एक तासाने या बसेस परतवाडा आणि अमरावती या दोन्ही ठिकाणाहून निघत.

संध्याकाळी सहाच्या अमरावती परतवाडा सुपरमध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे एखादे अढळपद मिळाल्यासारखेच वाटे. ते प्रवासी मग खिडकीतून ज्या लोकांना जागा मिळाली नाही, त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत! पण बहुतेक मंडळी एकमेकांना चांगली ओळखत असल्यामुळे "अबे, माझ्यासाठी जागा ठेव जो" अशी विनंतीहि करण्यात येई. मी त्या वेळी अमरावतीला शिकत होतो आणि दर शनिवार-रविवारी घरी परतवाड्याला धाव घेत असे. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या बसमध्ये खिडकीजवळची जागा मिळणे म्हणजे मोठा पराक्रम गाजवण्यासारखे वाटे!

अमरावती परतवाडा जेमतेम पन्नास किलोमीटर आणि एक तासाचा प्रवास! पण अजूनही तो कायमचा मनावर कोरला गेलेला आहे. बाकी गाड्या अमरावती शहरातून गर्दीतून वाट काढून जात. पण ही सुपर बस मात्र त्याला अपवाद होती! ही बस गाडगेनगर, विदर्भ महाविद्यालय, इंजीनिरिंग कॉलेज या रमणीय मार्गाने भन्नाट वेगाने अमरावती शहरातून बाहेर पडे. संपूर्ण रस्त्यावर दुतर्फा वृक्षांच्या रांगा होत्या. त्यामुळे थंड, स्वच्छ वाऱ्याच्या झुळका बस मध्ये येत. त्यावेळी एसी बसची संकल्पना नसूनही एसी सारखाच अनुभव येई.

बघता-बघता बस वलगावच्या पुलाजवळ येऊन पोहोचे. बसमध्ये उजव्या बाजूला बसलो, तर स्व. गाडगेबाबांच्या स्मरणस्थळाचे आणि आश्रमाचे दर्शन होई. वलगावच्या पुलावरून जाताना नदीला पाणी असेल तर खूपच मजा येई. वलगाव पार होईपर्यंत बसमधील अर्धे प्रवासी थंड वाऱ्यामुळे गाढ झोपी जात. फार उत्साही असलेली मंडळीच जागी राहून बाहेर बघत. काही मिनिटातच सुपर बस पूर्णानगर, आसेगावला येऊन पोहोचे. आसेगाव म्हणजे अर्धे अंतर कापण्याची खूण!

आसेगाव आले की बरेच प्रवासी मधूनच झोपेतून उठून "आसेगाव आले का?" असे विचारत. त्यामुळे त्यांना अर्धे अंतर कापल्याचे समाधान मिळे. "मागे गेले" असे उत्तर मिळाले की ते परत डोळे मिटून झोपायला मोकळे! आणखी एक डुलकी घेईपर्यंत गाडी मग भूगावला पोहोचे.
एव्हाना संध्याकाळ गर्द झालेली असे आणि थोडा अंधार पडलेला असे. इवलेसे भुगाव मागे टाकून, बस भूगोलच्या पुलावरून वळण घेई. भुगावच्या नदीला कधी पाणी नसायचेच, पण पाऊस वगैरे चांगला असेल तर नदीला कधीकधी पाणी असायचे. मग पुलावरून बस जाताना "चांगले पाणी आहे या वर्षी नदीला" असे काही कौतुकास्पद उद्गारही निघायचे.

भुगाव मागे पडले की झोपलेली नेहमीची सराईत मंडळी अकस्मातपणे जागी व्हायची. काही जण डोळे चोळायचे, काही जण सामान व्यवस्थित आहे ना याची खातरी करून घ्यायचे, आया आपल्या मुलांना उठवून स्वेटर वगैरे घालू लागायच्या. कारण आता परतवाड्याची चाहूल लागायची, परतवाड्याचे लाईट दुरून दिसू लागत. त्यातही ज्या मंडळींना अचलपूर फाट्यावर उतरायचे असे, ती मंडळी सरसावून बसत. बस सुपरफास्ट असल्यामुळे काही वेळातच तोंडगाव फाटा, अचलपूर नाका पार करून अचलपूर फाट्याला थांबायची. अमरावती सोडल्यानंतरचा बसचा हा पहिलाच थांबा. काही लोक तेथे उतरायचे आणि बस मग पुढे मार्गस्थ व्हायची. एव्हाना बसमधले दिवे लागलेले असत. साधारणतः दिवेलागणीच्या सुमारास सुपर बस परतवाडा बस स्थानकावर येऊन थांबायची!

तीच बस जर अमरावतीला परत जात असेल, तर मग बसमधून लोक उतरायच्या आधीच, जाणारे लोक दाराजवळ चढण्यासाठी गर्दी करत. बसमधून उतरलेले प्रवासी वेगवेगळ्या मार्गाने घरचा रस्ता पकडत. बरेचसे लोक तर चालतच घराकडे निघत. त्या वेळी परतवाड्यात ऑटोरिक्षा नव्हत्या, त्यामुळे साध्या रिक्षा खूप होत्या! त्या सायकलरिक्षात बसून घराकडे प्रवास सुरू होई. गाव लहान असल्यामुळे रिक्षावाले सगळ्यांनाच ओळखत. त्यामुळे पत्ता सांगायचे काम पडत नसे. रिक्षावाले "काय भाऊ, खूप दिवसांनी आज गावाकडे?" किंवा "ताई, सध्या कोणत्या गावाला असता?" अशी आपुलकीने विचारपूसही करायचे. परतवाड्याची बाजारपेठ पार करून रिक्षा घराजवळ येऊन थांबायची आणि हा संस्मरणीय प्रवास संपायचा!!

कितीतरी वर्षे, कितीतरी वेळा मी हा प्रवास केला आहे. पण प्रत्येक वेळी कधी एकदा घरी पोहोचतो असे वाटे. घरात येताच आईची विचारपूस, आजीने केलेले लाड, बाबांची चौकशी सुरू व्हायची. प्रथम गरमागरम चहा आणि मग कांद्याचे थालीपीठ किंवा आवडीचा दुसरा एखादा पदार्थ, या सगळ्यामुळे त्या प्रवासाचा शिण काही क्षणातच दूर होई. घरात मिळालेला ऊबदार जिव्हाळा खूप सुखदायक वाटे!

त्या काळात सुपर बस म्हणजे परतवाड्याचे एक सांस्कृतिक केंद्रच झाले होते. जे लोक एरवी कधी भेटत नसत, तेही बसमध्ये अवश्य भेटायचे. शाळेतील शिक्षक, जुने मित्र, गावातील सन्माननीय व्यक्ती, लग्न होऊन परगावी गेली एखादी ताई असे अनेक लोक बसमध्येच भेटायचे. एखादा जुना मित्र भेटला तर मग गप्पांमध्येच एक तासाचा प्रवास संपून जायचा आणि पुन्हा सुपरमध्ये भेटायचा वायदा होऊनच प्रवास संपायचा. बसमध्ये शिक्षक, वयोवृद्ध व्यक्ती किंवा महिला असली तर तिला उठून जागा देण्याचे सौजन्य त्या काळी लोकांमध्ये होते. एखादे शिक्षक जर बसमध्ये भेटले तर, सध्या कुठे असतो, काय करतोस याची आस्थेने चौकशी करायचे! बसमधील बहुतेक लोक एकमेकांना ओळखत असल्यामुळे तो जणू एका मोठ्या कुटुंबातील लोकांनी एकत्र केलेला प्रवासच वाटे, एवढेच काय, तर बसचे चालक-वाहकही या मोठ्या कुटुंबाचाच एक भाग असत! त्यांनाही बहुतेक सगळे लोक ओळखत आणि "एवढ्यात या बसवर दिसला नाहीत?" अशी त्यांचीही चौकशी करत. असे ते दिवस होते!

नंतर काही वर्षांनी परतवाडा सुटले. शिक्षणासाठी, पोटासाठी नागपूर, मुंबई गाठावी लागली. आणि शेवटी दूरवरच्या बंगळुरूमध्ये बस्तान बसवले. माणसाच्या नशिबाच्या रेषा किती विचित्र असतात? कुठूनही माणसाला कुठेही घेऊन जातात! आईसुद्धा माझ्याबरोबरच बंगळुरूला येऊन राहिली. आम्ही परतवाड्याचे घरही विकले आणि परतवाड्याशी असलेला संपर्क कमी झाला. दोन वर्षांपूर्वी तर आईही हे जग सोडून आणि आम्हाला पोरके करून गेली!

गेल्या काही वर्षांमध्ये मी अमेरिका, इंग्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमध्ये प्रवास केला आहे. पण परतवाडा सुपरने केलेला हा प्रवास मात्र मनात कायमचा रुतून बसला आहे! ते गाव, तिथली माणसं, मित्रमंडळी, आमचे ते घर आणि तिथल्या आठवणी हृदयात नेहमीसाठी घर करून बसल्या आहेत!

- या वर्षीच्या सुरुवातीला, अनेक वर्षानंतर परतवाड्याला कुटुंबीयांसमवेत गेलो होतो. चांदूरबाजार मार्गाने कारने आम्ही परतवाड्यात प्रवेश केला. तोंडगाव मंदिर, अचलपूर नाका, अचलपूर फाटा, विदर्भ मिल्स, बसस्थानक, जयस्तंभ चौक इ. पार करीत आम्ही गावात शिरलो. गाव ओळखू येऊ नये इतके बदलले आहे. सगळीकडे दुकानेच दुकाने! बऱ्याच लोकांजवळ कार दिसत होत्या. काही चेहरे ओळखीचे वाटले, पण आता अनोळखी चेहरेच जास्त!

आमच्या जुन्या घरातही गेलो. तेच घर, तेच फाटक, स्वयंपाकघर, देवघर सगळे तसेच होते, पण जिवापाड प्रेम करणारी आपली माणसे मात्र आता कुठेच नव्हती. विशेषतः आईची उणीव प्रकर्षाने जाणवली आणि अचानक डोळ्यात पाणी दाटून आले! मी काही क्षणातच तिथून बाहेर पडलो.

दूर कुठेतरी रफीचे ते विद्ध करणारे गाणे मनात जागे झाले -

जिनके साथ लगाये तूने अरमानो के मेले,
भिगी आखो से ही उनकी, आज दुवाये ले ले !
किस को पता अब इस नगरीमे कब हो तेरा आना!
चल उड जा रे पंछी, के अब ये देस हुआ बेगाना!

*****************************
अविनाश चिंचवडकर
बंगळुरू

avinashsc@yahoo.com

2