ऑक्टोबर, २०१८.
नेहमीप्रमाणे आम्ही भल्या पहाटे - म्हणजे ५ वाजता पुण्यातून सासवडकडे कूच केले. बोपदेव घाटामार्गे सासवड पार करून यवतकडे निघालो. तिकडे थोडे अंतर गेल्यावर एक पूर्ण माळरान आहे. बऱ्याच वेळा आपल्याला माळरानाबद्दल काहीच माहिती नसते आणि बोडके डोंगर-दऱ्या दिसले की वृक्षारोपण करावे असे वाटते. पण माळरान हा एक वेगळाच अधिवास आहे, जिकडे छोट्या किड्यापासून ते गरुड, गिधाडे, तसेच वेगवेगळे प्राणी - हरणे, कोल्हे, लांडगे ह्यांची एक जीवनसाखळी आहे. आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा झुंजूमुंजू व्हायला लागले होते. गवतावर मस्त दवबिंदू पसरले होते. नेहमी दिसणारे पक्षी - लार्क, पिपीट, वेडा राघू असे पक्षी बघत आमची कार पुढे पुढे चालली होती. एका ठिकाणी आम्ही लांबून बघितले तर एक कार थांबलेली दिसली आणि बघितले तर जवळच्याच झाडावर एक मोठ्ठा शिकारी पक्षी बसला होता. आम्ही हळूहळू अॅप्रोच करत पुढे जात होतो. आम्ही त्या कारमधल्या मधल्या फोटोग्राफर्सना बराच वेळ दिला, कारण त्यांना तो पक्षी एकदम जवळून दिसत होता. आम्हीही इकडून काही फोटो उडवले आणि त्या कारमधल्यांनी काही आवाज केल्यामुळे पक्षी उडून गेला. तो पक्षी होता सापमार गरुड (Short toed snake eagle).
आम्ही ठरवले की पक्ष्यांच्या ह्या राजाचे नीट निरीक्षण करू, म्हणून आम्ही गाडी घेऊन गरुड जिकडे लांब उडून बसला होता तिकडे गेलो. पक्षिनिरीक्षण म्हणजे खूप अवघड आणि patience पाहणारे काम आहे. आम्ही त्याच ठिकाणी अर्धा तास बसून राहिलो निरीक्षण करत. थोड्या वेळाने अचानक तो उडाला. आम्हीसुद्धा त्याच्या मागे गाडी घेतली आणि दुर्बिणीतून पाहिले की तो एका शेतावर हॉवर करतोय.
आम्ही पटकन तिकडे बांधाच्या जवळ गाडी लावली आणि झोपत झोपत शेताच्या कडेला एका झाडाच्या आडोशाला जाऊन बसलो. आमच्या लक्षात आले की ह्याला काहीतरी दिसले असणार आणि आज आपले नशीब असल्यास किल बघता येईल... तो एकदम खाली उतरला आणि पायाने काहीतरी मारू लागला. त्याचे तोंड तिकडे असल्याने आम्हाला नीट दिसत नव्हते, पण नक्कीच लक्षात आले की एखादा साप असणार.
तसे करत करत त्याचे तोंड इकडे झाले आणि आम्हाला दिसले की त्याने एका सापाला आपल्या तोंडात पकडलेले आहे. पक्षिनिरीक्षण किंवा कुठल्याही वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये शिकार दिसणे म्हणजे खूप भाग्य, नशीब आणि थोडाफार अभ्यास लागतो. हळूहळू त्याचे तोंड आमच्याकडे होत होते.
कॅमेऱ्यातून पाहत असताना खूपच जबरदस्त वाटत होते. मनात म्हणालो की ह्याने आता एकदा थेट आपल्याकडे बघावे आणि तो क्षण आला! त्याने तोंडात साप असताना आमच्याकडे बघितले आणि मी ती फ्रेम कॅमेऱ्यात बंदिस्त केली.
हे बघत असताना अक्षरशः अंगावर काटा आला, कारण असा क्षण टिपणे किंवा बघायला मिळणे दुर्मीळ असते. पुढच्या ५-१० मिनिटात त्याने तो साप संपवला आणि हळूहळू पुढे चालत यायला लागला.
आता त्याने पंख उघडले.
आणि आम्ही पटापट तयार झालो उडतानाचे फोटो काढण्यासाठी. स्तब्ध बसलेला पक्षी आणि उडणारा पक्षी ह्याचे फोटो काढताना थोडे बदलावे लागतात. तुमचा अभ्यास चांगला असल्यास पक्षी कधी उडणार हे लक्षात यायला वेळ लागत नाही आणि तशा प्रकारे तुम्ही तयार राहू शकतात. आणि तो उडाला, पण बघतो तर काय, तो थेट आमच्याच दिशेने उडायला लागला आणि कॅमेऱ्यातून पाहिले, तेव्हा त्याचे भेदक डोळे एकदम जबरदस्त दिसायला लागले.
भानावर येत पटकन फोटो काढत राहिलो. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये तुम्हाला खूप कमी वेळ (० ते ३ सेकंद) असतात. आणखी एक फ्रेम मिळाली, त्यात तो आणखी जवळ आला होता.
आणि पुढच्याच क्षणी तो आमच्या डोक्यावरून उडत निघून गेला. पुढची ५ मिनिटे आम्ही अक्षरशः स्तब्ध बसलेलो, कारण असा दुर्मीळ क्षण आम्हाला बघायला मिळाला. त्या दिवशी येताना सासवडची सुप्रसिद्ध 'मोहिनी मिसळ'ची स्पेशल मिसळ मागवून हा क्षण आम्ही साजरा केला.