श्रीगणेश लेखमाला २०२० - कथा : बाप ( कथावाचन / ऑडियो)

1
जुलै महिन्यात श्रीगणेश लेखमाला २०२० या विशेषांकासाठी सहभागी होण्यासाठी आवाहन केलं गेलं, आणि वाटलं आपणही सहभागी व्हावं.
२०१४ साली दिवाळी अंकाच्या निमित्ताने तलकाडू : एक प्रवास हा भटकंती लेख लिहिला होता, त्यानंतर विशेषांकासाठी लिहिणं काही जमलं नव्हतं.

विशेषांकाच्या 'आठवणी' या थीमसाठी मला स्वतःला काही विशेष सुचत नव्हतं.
(हे आपलं नेहमीचंचय.. पाहिजे तेव्हा हवं ते सुचत नाही आणि नको तेव्हा नको ते सुचतं!)

लॉकडाउन १.०, २.०, ३.०, ४.०, असं मारुतीच्या शेपटीसारखं वाढतच चाललं होतं. सगळेच व्यवहार जवळजवळ बंद पडले होते. नाटक, एकांकिका वगैरे कसं बघायचं हा प्रश्नच होता, तेव्हा ऑनलाइन प्रकरण सुरू झालं आणि ही एक सोय झाली, बरं वाटलं.
या दिवसांमध्ये विविध फेसबुक लाइव्ह, झूम मीटिंग्ज यांनी निर्माण झालेली पोकळी भरून काढायला मदत केली.
बरीच कथाकथनं ऐकली, अभिवाचनं पहिली, एक सुंदर दोन अंकी नाटकाचं सुंदर अभिवाचन पाहिलं-ऐकलं.

मग वाटलं, आपण श्रीगणेश लेखमाला विशेषांकासाठी का कथावाचन करू नये? आणि ती कथादेखील मिपावरचीच घेतली, तर? विचाराने उत्साह वाटला. मिपाच्या साहित्य संपादकांना कथावाचन (ऑडिओ फाइल) चालेल का? हे विचारलं आणि त्यांच्याकडून हिरवा झेंडा मिळाल्यावर हुरूप वाढला.

कथावाचनाच्या दृष्टीने मिपावरच्या कथा वाचायला सुरुवात केली. २०-२५ सुंदर कथा वाचल्या.
मला भावलेली "बाप" ही मला कथावाचनाच्या दृष्टीने चांगली वाटली (म्हणजे आपण ही सादर करू शकू असं वाटलं.) ही कथा 'आठवणी' थीमला कुठेतरी जुळणारी होती.

Schoolgoingduo
(शालेय विद्यार्थ्यांचं प्रातिनिधिक चित्र, आंजावरून साभार)

एका मुलाच्या शालेय जीवनात घडलेली, बालमनाला हादरवणारी, आपला कोणीतरी वाली आहे हे मनावर बिंबवणारी नाट्यमय 'आठवण'.
माझ्या वकूबाला पेलण्यासाठी काही छोटे बदल केले.

त्यात स्त्रीपात्राचा आवाज देण्याचं थोडंफार काम माझ्या पत्नीने आनंदाने स्वीकारलं. थोडा सराव केला आणि आणि काहीसं चुकतमाकत 'बाप'चं कथावाचन केलं. बघा कसं वाटतंय. कथा हेडफोन्स लावून ऐकल्यास उत्तम!

मित्रांनो, मी सादर केलेला हा कथावाचनाचा (हौशी) प्रयोग कसा वाटला, याची प्रतिक्रिया नक्की द्या!
धन्यवाद!

"बाप - मूळ कथा येथे वाचता येईल"

2