पनीर लबाबदार!
तो पनिरायण मे अगली रेशिपी है.. पनीर लबाबदार!
तर ही पनीर लबाबदार व्हायला आमची होम मिनिष्ट्री च जबाबदार आहे! (लबाबदार..जबाबदार! जमलं की नै यमक,ते आगोबी गमक!.. परत जमलं! काय हे?
आगोबानी मारला फेसबुकवर दगड,मन म्हणलं त्याला इथेच रगड!!! आयायाया! परत पडली जिलबी!आणि झालो मी एलबी!.. थांबचत नाही.
बुळुक बुळुक बुळुक!
)
तर त्याच काय झालं 3साल मागे आमचे विवाह-वाढदिवशी म्हणजे प्रथम वर्षी आम्ही आमचे वर्षेसह दिल्ली किचन नामक अट्टल ... आपलं ते हे अस्सल पंजाबी हाटीलात साजरे करणेस गेलो होतो. तेव्हा आमच्या सौ स सदर व्यंजन अट्यंट आवडले होते.. मग पुढे तेच व्यंजण रामदेव बाबा ढाबा, मग नन्तर सासवडच्या एका अश्याच खास हाटीलात आणि सरते शेवटी आमचे कात्रज बायपास वरील एका खऱ्या पंजाबी म्हणजे सरदारजी च्या हाटीलात हीच डिश ढिशशशशश करणेस बैंनी मागवली. मग म्हटलं आता हिचाच नंबर लाऊ. मग ग्येलो यु ट्युबावर.. केली थोडी फिरस्ती,आणि जमवलीच पूर्ण मस्ती! आणि मग शिस्तीत झाली कुस्ती! (मायला, आज लैच जिलब्या पडायल्यात!
)
चला तर मग, जमवू या सगळं साहित्य..
4 लवंगा, 7/8वेलदोडे,2/3तमालपत्र,2तुकडे दालचिनी,कसुरी मेथी चिमूटभर, अर्ध बोटभर आलं, 8/10कळ्या लसूण,चमचा दीड चमचा जिरं, 7/8बदाम व तेव्हढेच काजू(गरम पाण्यात किमान अर्धा तास भिजवून घेतलेले), मध्यम कांदे 4, मध्यम टोमॅटो 3, 4/5मिरच्या, अर्धा किलो पनीर, अर्धे वाटी क्रीम किंवा ताजी घट्ट साय.

दारुगोळा तयार ! आता चला रणक्षेत्रावर! हुरररररर... स्वारी स्वारी!
हर हर महादेव!
आता ह्यावेळी मी एक डाकू डाव क्येला.. ह्या भाजीची ग्रेव्ही हे जरा संयमानि व काळजीपूर्वक करायची असलेनी मी हा अर्धा खेळ आदले दिवशी रात्रीच केला.. कारण सकाळी आमचे दिव्य बालक आमचा खरोखर हिरवा पालक करते हो! दुत्त दुत्त!!!
ग्रेव्ही ह्या रेशीपीची जान आहे. तेंव्हा ती आधी नीट करायला घेतली. इंडक्शनला 600 tm वर पॅन तापायला लावला 2मोठ्ठे चमचे तेल सोडलं आणि जिरं,तमालपत्र इत्यादी सगळा खडा मसाला थोडा लसूण जरा नाकाची हजेरी घेईपर्यंत परतला.

मग हिट एकदम कमी करून आललसूण पेस्ट टाकली, तिला चराचरी आल्यावर मग हिरव्या मिरच्या 
आणि सावकाश नीट परतवले. 
मग उभा चिरलेला कांदा काजू बदाम टाकून तो बर्यापैकी लालवला. 
त्याचा मसाल्याबरोबर मंद वास यायला लागल्यावर उभा चिरलेला टोमॅटो सोडला.. या सगळ्याला त्याच मंद आचेवर सावकाश परतत बसलो.

10 मिनीटं परतवल्यावर 5मिनिटांसाठी झाकण मारले. मग झाकण काढल्यावर टोमॅटो चांगला निपचित पडलाय की नाही याची बोटांनी दाबून खात्री करून घेतली..
पुढे परत 10 मिनिट फास्ट परतत राहिलो.
आणि इंडक्शन बंद करून पॅन पूर्ण गार होऊ दिला..
मग पॅनमधला सगळा मसाला,तमालपत्र इत्यादी सगळा खडा मसाला त्यातून न काढता मिक्सरवर बारीक फिरवून घेतला.. अगदी टूथपेस्ट सारखी घट्ट मुलायम पेस्ट काढून घेतली. 
मिक्सर चिकटायला लागला तर थोडं पाणी टाकलं,नाहीतर ते ही नाहीच. मिक्सवलेली ग्रेव्ही फ्रिजला टाकली.. आणि मग गै गै गै गै गै...
![]()
ढुररररररर... फुससससस!!!
मग सकाळी लवकर उठुन आवरून बाकीचा सोपा खेळ झटकन करून टाकला.. अर्ध्या तासात.
मोठ्ठ्या कढईत दोन चमचे बटर टाकलं.. 
ते वितळून गरम झाल्यावर (धूर काढायच्या आत!) बारीकस जिरं व अगदी शास्त्रापुरती एक कळी लसूण व 7/8 आल्याच्या काड्या टाकून 
त्याला चरचरी आल्यावर ही आदले रात्री केलेली ग्रेव्हीपेस्ट सगळी त्यात टाकली

थोडी गॅस ची आच मोठी करून वास सुटेपर्यंत परतवली.

मग हवं तेव्हढं पाणी टाकलं,उकळी आल्यावर थोडी कसुरी मेथी सोडून वर दोन तुकडे पनीर किसून टाकलं.

यांनातर काश्मिरी लाल तिखट किंवा रंग वापरतात.. तो मी मुद्दाम टाळला. नको वाटला मला. आणि मग पनीरचे तुकडे टाकून सावकाश ते ग्रेव्हीत मिसळवले.

एक झाकण मारून गॅस बंद केला..
आणि सहचारिणी सह डिश सजवून चरता जाहलो.

======================================================
ही रेशिपी बादशाही चवीची आहे. खमंगपणा व तेजचव(तिखट नव्हे!) हे हिचे वैशिष्ट्य आहे. काजू बदाम असल्याने व त्याची सावकाश परतवून मग ग्रेव्ही वाटल्याने याला एक जबरदस्त मंद धुंद तेज चव येते.
![]()
तेंव्हा नक्की करून पहा.. व खुश व्हा. "लक्ष्मीरमणा गो...विंदा!!!" च्या चालीवर बोला , "कोरोना कोविडा...नाईSsssssन टिना!!!"
भेटू पुन्हा मग .. बाय बाय..
![]()
जय कोरोना, जय लॉक-डाऊन, जय ओपनअप !