मध्यंतरी माझ्या मंगलोरी बन च्या पाककृतीमध्ये कंजूसकाकांनी बिस्कीट अंबाडेची पाककृती विचारली होती. त्याला त्या धाग्यावर प्रतिसाद देण्यापेक्षा इथेच पाककृती लिहीतेय. जेणेकरुन सर्वांना एक नवी पाककृती कळेल. बिस्कीट अंबाडे म्हणजेे आपल्या सोप्या भाषेत उडीद डाळीची भजी. याला बिस्कीट अंबाडे नाव का ? तर या भजीचे वरचे आवरण चावतावा अगदी बिस्कीटासारखा कुरकुर आवाज येतो व अंबाडे म्हणजे गोल आकार. म्हणून याचे नाव बिस्कीट अंबाडे असे पडले. याचा उच्चार मात्र ते बिस्कूट अम्बडै असा काहीसा करतात. बिस्कीट अंबाडे हा पदार्थ माझ्यासाठीही नवीन होता पण सोपा होता. त्यामुळे लगेच करुनही बघितला. याचे पीठ आपल्या मेदूवड्याचेच . पण चवीला अतीशय चविष्ट लागतात, शिवाय पटकन होतात.
साहित्य - दीड वाडी उडीद डाळ, 5-6 कडीपत्त्याची पाने, पाव चमचा हींग,1 चमचा किसलेले आले/बारीक कापलेले आले , दोन-तीन बारीक मिरची चिरुन,1 चमचा ओल्या नारळाचे बारीक तुकडे (वैकल्पिक), चवीनुसार मीठ
कृती - उडीद डाळ 2 तास भिजवावी. नंतर पाणी न घालता मिक्सवर बारीक वाटून घ्यावी. मिक्सर चालू बंद-चालू बंद करत डाळ वाटावी म्हणजे मिक्सरवर लोड येत नाही. अगदीच वाटले तर किंचीत पाणी घालावे. आता या वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेली कडीपत्त्याची पाने, मिरची,आले,हिंग,खोबरे व मीठ घालून एकसारखे करावे. कढईत तेल तापत ठेवावे व पाण्याचा हात लावून गोल आकाराच्या भजी हातात वळवून तळाव्यात किंवा पीठ थोडे पातळ असेल तर चमच्याने भजी सोड्याव्यात. थोड्याच वेळात टम्म फुगुन येतात.

मी हाताला पाणी लावून पीठ हातात घेतले व मेदूवड्याला जसे पहिला गोल आकार वळवतो तसा छोटा आकाराचा गोल तयार करुन तेलात सोडला. गॅसची ज्योत मध्यम ठेवावी नाहीतर भजी आतून कच्ची राहू शकते. भजी तळत आली की गॅसची ज्योत वाढवून तांबूस रंगावर तळून घ्यावेत. थक्यतो गरमगरम खावेत. हा पदार्थ चटणी,सांबार यांसोबत खाण्याची पद्धत आहे.पण नुसतेही चवीष्ट लागतात.

