घरातला ओला कचरा हा कुजल्यावर झाडांसाठी उत्तम खत आहे. झाडं लावताना आपण कुजलेले खत बुंध्याशी देतो किंवा कुंडीत माती भरताना त्यात मिसळतो. बाल्कनीत झाडे ठेवताना कुंडीत झाडाभोवती कुजलेली तयार झालेली खत- माती टाकली की फुलझाडे, वेलभाज्या चांगल्या वाढतात. पण कचऱ्यातून ते कुजलेले खत होण्यासाठी कुठेतरी तयार करावे लागते आणि कमीतकमी तीन महिन्यांचा काळ. मोठा प्लाट अथवा गच्चीवरील जागा असेल तर हे करणे सहज शक्य आहे. एक खड्डा करायचा किंवा मोठ्या तोंडाचा फुटका ड्रम ठेवायचा आणि त्यात रोजचा घरातला ओला कचरा ( स्वयंपाक घरातले निवडून टाकलेल्या भाज्या, फळांच्या साली, आणि जेवणाच्या ताटातले उरलेले अन्न ) टाकत राहायचे. झाकण लावायचे नाही कारण वरून हवा मिळाली पाहिजे. किंवा बारीक जाळीदार झाकण हवे. त्यातून माश्या आत जाणार नाहीत असे. आतला कचरा पूर्ण कुजून काळी माती होण्यासाठी शेवटचा कचरा टाकल्यानंतर तीन महिने लागतात. मग वास येत नाही. दुसरा ड्रम/ खड्डा चालू करायचा. तोही भरल्यावर तिसरा. तोपर्यंत पहिल्या जागेतले खत तयार होईल. उगाच ढवळाढवळ करायची नाही. वास येईल. खरंच तपासायचे असेल तर एक सळी खुपसून बाहेर काढायची. त्यास चिकटलेल्या मातीस वास आला तर कचरा कुजला नाही.
शहरातल्या उंच इमारतीत राहणाऱ्यांच्याकडे ब्लॉकमध्ये एवढी जागा नसते. आता करोनाच्या बिकट परिस्थिती मध्ये जेवढा म्हणून ओला कचरा नष्ट करता येईल तेवढा गरजेचा आहे. खत करण्यापेक्षाही यास प्राधान्य निर्माण झाले आहे.
कचरा कुजायची वाट पाहण्यापेक्षा तो थेट कुंडीत झाडास अगोदरच देता आला तर? खटाटोप वाचेल.
यासाठी प्लास्टिक ट्रे घेतले. ९x ७ x२ इंच. ते किंवा जरा मोठे ११ x८x २ चे सहज मिळतात. खाली तळाला एक इंच माती थर देता येईल. जुन्या एक्सरे फिल्म वळवूनही ट्रे केले. प्लास्टिकच्या एक किलो सामान राहणाऱ्या वाणी सामानाच्या पिशव्या बऱ्याच जमा होतात. त्यांना तळाला बारीक भोके पाडली ( सायकलचा स्पोक/ छत्रीची काडी जाईल एवढी मोठी. ) पिशव्या ट्रेमध्ये ठेवल्या. यात रोजचा ओला कचरा जमा केला. दीड दोन किलो बसतो. भोकांमुळे पाणी राहात नाही. पिशवी भरली की वर थोडा मातीचा थर देऊन उलटी करून ठेवली व तोंड मातीने झाकले. ट्रेमध्ये अजून एक पिशवी राहाते यात मात्र माती भरून झाड लावले. या पिशवीला तळाला मोठी भोके ठेवली. एका ट्रेमध्ये एक झाड असलेली पिशवी आणि एक कचरा भरलेली उलटी पिशवी ठेवली. या पिशवीला पाणी द्यायचे नाही. झाडाच्या पिशवीत टाकलेले आणि वाहिलेले पाणी ट्रेमधल्या तळाच्या मातीतच राहाते. कचरा कुजत जाईल तशी झाडाची मुळे तिकडे वाढतात. कचरा न हलवल्याने वास येत नाही.
दुधाच्या पिशव्याही वापरू शकतो. सुबक मोठ्या कुंड्यांत झाड लावायचे असल्यास ते नेहमीप्रमाणे कुंडीतल्या मातीत मधोमध न लावता कडेला लावायचे. मधल्या मातीवर कचरा भरलेली पिशवी उलटी ठेवायची. प्लास्टिक पिशवीत वेल लावण्याअगोदर तळातून नायलोन दोऱ्या अगोदर बांधून त्या कडेने वर घ्यायच्या. दोरी कडेलाच घेवडा/ कारल्याचे एकेक बी टाकायचे. वेल उगवून दोरीवर चढू लागले की एक छोटी कचरा पिशवी मध्यभागी उलटी ठेवायची. वेलाचे बी उगवून दोन फुट वेल वाढल्यावरच कचरा द्यायचा आहे. बी टाकल्यावर लगेच नाही.
नर्सरीवाल्यांकडे काळ्या जाड प्लास्टिकच्या पिशव्या मिळतात. त्यांना भोके पाडलेली नसतात. ते बरेच आहे. त्यास बारीक भोके पाडून वापर केल्यास कचरा दिसणार नाही. कचऱ्याच्या पिशवीवर पाणी टाकून कचऱ्याला उगाचच भिजवायचे नाही. पंधरा दिवसांनी थोडेसे पाणी शिंपडायला हरकत नाही.
या प्रकारचा कचरा कुजवणे प्रयोग वेलवर्गीय भाज्या, गोकर्ण यासाठी उत्तम. पालेभाज्या आणि गुलाबासाठी नको.
फोटो पाहा.
फोटो १
भात आणि कचरा पिशवी.
फोटो २
कर्दळ रोपे आणि कचरा ट्रेमध्ये
फोटो ३
" width="80%"/>
फोटो ४
एक्सरे फिल्मचा ट्रे आणि वेलाची पिशवी.
फोटो ५
मनीप्लांटसाठी पाचफुटी आधार केरसुण्यांची प्लास्टिक हँडल्स जोडून केला आहे.