[कविता' २०२०] - प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे

प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे

आकाशाच्या निळाईची पडे रानभूल
प्रकाशाशी जळालेले पाण्याचे अंकुर
थांबावं का थोडं इथे? दिसते का माया?
मरावं का कोणीं? तुझी क्षुधा शमवाया

तुझे ज्ञान वाचू कितीं? ऐकू कितीं देवां?
प्रत्ययाच्या दारापाशी मिळेना पुरावा
पाण्याच्या या प्रवाहाला म्हणू गंगामाई
म्हणून का बुडालेला माघारून येई?

सामसूम झाली, चढे रात्रीचा अंमल
दिसेल ते शिजवण्या पेटलेली चूल
कुठवर नेशी ओझं? साध वेळ आतां
नाकारून जाशी कुठं इच्छांची चाहूल?

किती पहा आहे उभा सवाल सुंदर
उत्तराच्या मोहापायी गेला दुर्लक्षून
पडले तर पडू द्यावे तुकड़े प्रश्नाचे
पहा किती उजेडाचे? किती अंधाराचे?

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}