आयुष्य

आयुष्य हे कधी आहे
विस्तीर्ण पानासारखे
आशा निराशेच्या
हिंदोळ्यांवर झुलणारे
वाचता येईना कोणा
यावरील भाग्यरेषा
आयुष्य हे कधी आहे
अथांग सागरासारखे
सुख दु:खाच्या लाटांनी
चिंब भिजवणारे
सांगता येईना कोणा
अथांगतेच्या परिभाषा
आयुष्य हे कधी आहे
निबीड अरण्यासारखे
शंकाकुशंकाच्या विषवल्लींनी
दाट वेढलेले
झाकता येईना कोणा
डाग ओरखड्यांचे
आयुष्य हे कधी आहे
ओसाड वाळवंटांसारखे
मानपमानाच्या कल्पनांनी
रूक्ष विस्तारलेले
झुगारता येईना कोणा
कल्पनांची बंधने
आयुष्य हे कधी आहे
अनंत आकाशासारखे
यशापशयाच्या मेघांनी
जीवन ओथंबलेले
मांडता येईना कोणा
श्रेयांची गणिते
आयुष्य हे कधी आहे
सर्व दूर क्षितीजासारखे
नितीअनितीच्या संकल्पनांनी
नित्य विभागलेले
नोंदता येई ना कोणा
संकल्पनांची स्पंदने
जरी या सर्वांनी
आयुष्य आपले व्यापले
झटकूनी मळभ निराशेचे
होऊनी कोजागिरीचा चंद्र
शिंपावे आनंदाचे चांदणे

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);
background-size: 4500px;
}