[कविता' २०२०] - आई

आई

तो हलक्या हाते, जळात काही सोडे
निःशब्द नदीवर आले तरंग थोडे
हा कोण भाबडा जीव उदासून आला
ती हळू म्हणाली मनी घेउनी कोडे

त्या डोळ्यांमध्ये कल्लोळाच्या लाटा
शेकडो प्रश्न अन् उत्तर नाही आता
ती नदी बिचारी पुन्हा पुन्हा त्या पाही
डोळ्यांत आसवे थिजून होती आता

ती शांत नदी मग थोडी कातर झाली
हि कुठून आली, नयनामध्ये खोली
मग हळूच गेली एक नदीची धार
पायाशी त्याच्या जरा सरकती झाली

त्या स्पर्शाने तो जणू भानावर आला
अस्वस्थ हसून तो पुन्हा स्तब्धसा झाला
नदी काहीशी प्रश्न विचारून गेली
"लेकरा, असा तू उदासीन का झाला?"

लेकरा, शब्द ऐकून तरळले पाणी
मन थरथर झाले आणि कंपली वाणी
ती आई होती, आई....गेली आता
अन् फक्त राहिली आठवणी अन् गाणी

तू आज 'लेकरा' म्हटले अज्ञानात
मज आई दिसली, हाक तिची कानात
हि तीच ओढ अन् आपुलकी मायेची
हा ओलावा गे कसा तुझ्या पाण्यांत?

मजपाशी आता तिची सावली नाही
लेकरुच कसला जयां माउली नाही
मज आता नाही जगावयाची ओढ
मज कुशीत घेशील का गे माझे आई?

हे ऐकताच त्या नदीस पाझर फुटले
जणू हृदय मायेने पाणीपाणी झाले
ती क्षणांत गेली वहात त्याच्यापाशी
अन् आई गेली तिथे लेकरा नेले

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}