[कविता' २०२०] - ... आणि बुद्ध

... आणि बुद्ध

तसे तयारीतच असतो आम्ही
तर्जनी आणि नजर रोखुन
स्वत्त्वावर 'मी'पणाचा साज असतो
आणि 'मी' करतो मिजास 'आम्ही'ची..

आमच्या शब्दांना तर्काचा वर्ख असतो नेहमी
नियमांना घासल्याबिगर शाई उतरत नाही कागदावर
आणि जवाबदारीचा दगडही पेललेलाच असतो
सदा कुणाच्यातरी टाळक्यात घालण्यासाठी..

आपली आपणच पाठ थोपटतो आम्ही
शाबासकीचा शब्द दुसऱ्याच्या नरड्यातून वदवून
आमच्या महानतेची ओझी वाहतात सारी
पाठीत वाकून अन् मानही लववून..

तसे तयारीतच असतो आम्ही
सदोदित अधिकारांच्या वेष्टणात लपलेले
दुनियादारी कोळून प्यायलेली असते
मतलबी संबंधही यथायोग्य जपलेले..

आणि अचानक कधीतरी टाचणी लागते
कुण्या वाचल्या-बोलल्या शब्दांची
जोडल्या हातांसवे थरथरणाऱ्या ओठांची
वेदनेतही हसऱ्या डोळ्यांची अन् खंगल्या पोटांची..

मोहाचे धागे मग उसवून पडतात
'मी'पणाचे कोसळतात इमले
लख्ख उजळतात धुरकटलेली तत्वे
गमते कि मृगजळापाठीच आयुष्य दमले..

तोच क्षण खरा
तुला बुद्ध कळण्याचा !

body {
background: url(https://i.postimg.cc/3JFS7g8f/IMG-20200503-162101.jpg);

background-size: 4500px;
}