[शशक' २०२०] - गृहिणी

गृहिणी

कशी असेल बबडी कुणास ठाऊक. दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन.
चांगलं स्थळ आणलं होतं वहिनींनी, पण हिच्या डोक्यात भलतंच. काय म्हणे, घर सांभाळत नाही बसणार. स्टार व्हायचं होतं ना तिला!
पाळण्यात पाय दिसत होतेच म्हणा.. नटणं, मुरडणं, नाच, नाटक.

वहिनी म्हणाल्या होत्या, "बाकी कसली अट नाही त्यांची. फक्त घर नीट सांभाळावं , इतकंच. घरात बाईमाणूस नाही ना दुसरं?”
कसलं काय? निघूनच गेली बया घरातून. मुंबईला टीव्हीवर नाहीतर सिनेमात काम करणार म्हणून.
कळवते अधूनमधून, सेल्सगर्ल आहे, नाटकात छोटं काम मिळालं म्हणून. पण पुढे काय?

"हॅलो..बोला वहिनी."
"अहो, टीव्ही लावा लवकर! तुमची बबडी नव्या सिरियलीत! कामसू सोज्वळ गृहिणीच्या भूमिकेत शोभतेय हो!"

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-lig…);

background-size: 1900px;
}