चिकन मोमोज

*#सोअरे_भारतीय_पाककृती_चॅलेंज*

नावात जरी चॅलेंज असलं तरी हे दुसऱ्याला भरीस पाडणारं चॅलेंज नाही, तर तुमच्यातल्याच कलेला वाव देणारं, खुलवणारं चॅलेंज.

'सोप्या अवघड रेसिपीज' या आमच्या एका वाॅट्सप कंपूवर आमच्या याडमिन बै प्राची गरूड यांच्या सुपीक डोक्यातुन कल्पना आली की येत्या रैवारी भारतिय खाद्य संस्कृतीचा जागर करावा. एकसे एक सुगरणी अन बल्लवांचा भरणा असलेल्या या कंपुतल्या प्रत्येकाला वेगववेगळी राज्य, प्रदेश बहाल करण्यात आला. माझ्या वाटेला आलं ते इशान्येचं छोटंसं सिक्किम. सुरूवात झाली ती सिक्किमची खाद्य संस्कृती धुंडाळण्यापासुन. तिथले पदार्थ शोधण्यापासुन. जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं हे खरंच एक प्रकारचं चॅलेंजच वाटू लागलं. कारण एरवी काही सामान लागलं की लगेच बाहेर पडलं आणि आणलं. सद्य परिस्थितीत ही एेश परवडण्यातली नाही. चाैका चाैकावर मामा पोकळ बांबू घेऊन बॅटिंग करायला तयारच आहेत. मग घरात जे काही जिन्नस उपलब्ध आहेत त्यातच काही करणं आलं, आणि मी मोमोज् करायचं ठरवलं.
हा पदार्थ आजवर आयुष्यात केवळ एकदाच चाखलेला, करणं तर फार लांबची बात. नेटवर काही रेसिपीज पाहिल्या. मोमोजना वेगवेगळे आकार देण्याचे व्हिडियो अनेकदा पाहिले. हा प्रकार आपल्याला जमेल असं वाटलं, अन् मग त्या दृष्टीने हातपाय हलवायला सुरवात केली. जिन्नसांची जुळवाजुळव केली.

1

चटणीसाठी टाॅमेटो उकडून सालं काढुन घेतली. त्यात सोयासाॅस, लसूण, मीठ, व्हिनेगर, चिली फ्लेक्स लाल तिखट आदी पदार्थ टाकून मिक्सरमधून भरड वाटून घेतलं. कच्चटपणा घालवण्यासाठी किंचीत तेलावर ही चटणी परतून घेतली.

2

स्टफिंगसाठी 1/2 किलो बोनलेस चिकन मिक्सरमधे फिरवून घेतलं. त्यात 2 पाती कांदे बारीक चिरून टाकले. जोडीला लालतिखट, सोया साॅस, बारीक चिरलेला लसूण, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ टाकून सगळं एकत्र करून घेतलं.

3

कपभर मैद्यात चवीनुसार मीठ चमचाभर तेल आणि थंड पाणी टाकून तो बांधुन घेतला.

4

खरी कसोटी पुढेच होती. उकडीचे मोदक जमतात तर हे डंपलिंग क्या चीज है हा गर्वाचा फुगा पहिल्याच प्रयत्नात फुटला. हे प्रकरण व्हिडीयोत जितकं सोप्प वाटत होतं तितकं खिचितच नाही याची मनोमन खात्री पटली. पण अडथळा नाही ते चॅलेंज कसलं? जिद्दीने पेटून पुन्हा प्रयत्न केला. पारी लाटुन घेतल्या त्यात चमचा दोन चमचे स्टफिंग भरलं आणि मोदक करंजी असे आकर द्यायला सुरवात केली. थोडे वेडे वाकडेच झाले. पण हळू हळू जमायला लागलं. तरी मनासारखे अकार येत नव्हते. मग अर्धांगाला साकडं घातलं. ती ही लगेच हातातलं काम अर्धवट टाकून मदतीला आली. तिच्या मदतीने उरलेल्या मोमोजनी आकार घेतला.
दुसरीकडे एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं. त्यावर बांबूचं स्टिमर ठेऊन हे मोमो 12-15 मिनीटं वाफवून घेतले.

5

तर मंडळी हे आहे आजच्या प्रयत्नांचं फळ. जमलेत का ते जरूर कळवा