आता परवाच आमच्या इथल्या जवळच्या सुपरमार्केटमध्ये किरकोळ किराणा आलायला गेलो होतो. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंचे दुकान असल्यामुळे दुकान अर्थातच उघडे होते, सकाळी लवकर गेलो असल्याने गर्दीही नव्हती. गरजेच्या वस्तू घेता घेताच नजर मॅकरोनीवर पडली आणि इतर सामानासहित ती देखिल घेऊन आलो. आज अचानक पास्ता खायची लहर आली. अनायासे बहुतेक सर्व साहित्यही घरात होतेच मग काय केली सुरुवात मॅकरोनी चीजी रेड पास्ता बनवायला.
साहित्यः
मॅकरोनी पास्ता: २ मोठे कप
१ वाटी बारीक चिरलेला कांदा
१ वाटी बारीक चिरलेला टॉमेटो
१ वाटी मध्यम चिरलेली ढोबळी मिरची
अर्धा वाटी मटार
अर्धा वाटी किसलेले चीज
रेड पास्ता मसाला १० ग्राम पाकीट
काळी मिरी ग्राईण्डरसहित.
कृती:
प्रथम २ मोठे कप मॅकरोनी सुमारे दिड लिटर पाण्यात चमचाभर मीठ टाकून ते मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवले. पाणी उकळून त्यात पास्ता शिजायला सुमारे २० मिनिटे लागतात. मग चाळणीच्या साहाय्याने उर्वरित पाणी गाळून व शिजलेल्या पास्त्यावर चमचाभर तेल टाकून पास्ता बाजूला ठेवला.
कढईत २ चमचे तेल टाकून ते तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो, ढोबळी मिरची आणि मटार घालून ती भाजी पाच्/सात मिनिटे परतली आणि नंतर रेड पास्ता मसाला टाकून मिक्स केली.
मग ह्या कढईत आधी शिजलेला मॅकरोनी पास्ता टाकला, त्यात ताजी ग्राइण्ड केलेली काळी मिरी आणि पास्ता मसाला टाकून मिश्रण परतले.
परत ह्यात कपभर गरम पाणी टाकून पास्ता ५ मिनिटे परतला आणि त्यावर किसलेले चीज पसरले
हे परत मिक्स करुन २/३ मिनिटे परतले, प्लेटमध्ये पास्ता भरुन आणि त्यावर चिली फ्लेक्स आणि ताजी भरडलेली काळी मिरी टाकून गार्निशिंग केले. पास्ता तयार.
/>