India Deserves Better - १०. मेळघाट - कुपोषण, बालमृत्यु आणि सरकारी कागदी यंत्रणा
पार्श्वभुमी
विधर्भामधील, सातपुडा पर्वतरांगातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यांचा मिळुन मेळघाट विभाग बनलेला आहे. मेळघाट कुपोषण आणि बालमृत्यु हे येथील जणू समिकरणच झालेले आहे. मेळघाट हा तसा ९०% आदीवासी भाग आहे, येथील बालमृत्यु आणि कुपोषण यात घट झाल्याचा सरकार कितीही दिंडोरा पिटत असला तरीही येथील १०,००० च्या वर बालकांचा मृत्यु झालेला आहे. त्यामुळे कागदावर असलेल्या यंत्रणा , आणि कुपोषणातील घट प्रत्यक्षात मात्र दिसत नाही. कुपोषणमुक्ती साठी कोठ्यावधी रुपयांचा खर्च केला जातो, पण तेथील बालके त्या परिस्थीतीतुन बाहेर आल्याचे दिसत नाही. धारणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात १६४१ तर आक्टोबर महिन्यात १५०२ बालके कुपोषणाच्या अतितीव्र छायेत आढळुन आलेली आहेत.
कुपोषण मुक्तीच्या शासनाच्या योजना कुचकामी ठरल्या असुन, ज्या योजना सुरु आहेत, त्यावर अधीकारी कर्मचार्यांचे नियंत्रण नाही , आरोग्य विभाग, बालविकास प्रकल्प विभागातील रिक्त जागाही कुपोषणाला जबाबदार आहेत असे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी पटेल यांचे म्हणणे आहे.
न्यायालयाचे ही ताशेरे
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकार वर मुंबई उच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मेळाघाटातील समस्या सोडवायला सरकारला डॉ. बाबा आमटे, डॉ. बंग, डॉ. रविंद्र कोल्हे , यांच्या सारखीच माणसे लागतात का ? सरकारला आपली जबाबदारी कळत नाही का ? या समाजसुधारकांच्या कामामुळे सरकारला आपली जबाबदारी संपली असे वाटते का? असे बोलत सरकारला जाब विचारला होता. इतकेच काय मुख्यमंत्री ( तत्कालीन) हे खुद्द विधर्भातील असुनही त्यांना मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न गेल्या पाच वर्षात सोडवता आला नाही अशी खंतही खंडपिठाने व्यक्त केली .
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यात यावेत यासाठी बंडू साने यांनी केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी देत होते, आदिवासी दुर्गम भागात कुपोषण निर्मुलणासाठी नेमलेले आधीकारी साधे फिरकत ही नाही हे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणुन दिले होते.
कुपोषणामुळे होणारे बालमृत्यु रोखण्यासाठी सरकारी योजनांसाठी जो निधी मंजुर झाला होता त्याचा वापर कशा प्रकारे करण्यात आला, असा सवाल करीत कोर्टाने याप्रकरणी केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
परिस्थीती
कुपोषणाचा कलंक मिटवण्यासाठी शासणाचे अधिकारी, कर्मचारी काम करत नसुन , फक्त अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातुन कुपोषणमुक्ती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्याचबरोबर हे सर्व बालमृत्यू कुपोषणाने झाले नसून विविध कारणांमुळे झालेले आहेत असे सरकारचे म्हणणे आहे. कमी वजन, कमी दिवसाचे बाळ जन्माला येणे, जंतूसंसर्ग, श्वसनदाह, कमी तापमान, जन्मजात व्यंग इत्यादी कारणे त्यामागे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मुळात कुपोषणाची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नसुन दूसर्या विभागाकडे बोट दाखवुन टोलवाटोलवी होत असल्याचे दिसते आहे. जे अहवाल सादर झाले, त्याची अमंलबजावणी कोणीही करत नसल्याचे दिसते आहे. प्रत्यक्ष गावांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी पोहोचत नाहीत. केवळ कार्यालयांमध्ये बसून उपाययोजना आखल्या जातात, असा मेळघाटात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा आक्षेप आहे.
मनातले आनखिन
कुपोषणामुळे मृत्यु असे असताना त्याबरोबर इतर कारणांकडे ही पाहिले पाहिजे, गरिबी, शिक्षणासंबधीची नसलेली जाण आणि त्याबरोबर रुढी परंपरा यांचा ही पगडा दिसतो, त्याच बरोबर दळणवळणाच्या साधणांचा अभाव, सिंचणाचे अत्यल्प प्रमाण, उत्पनाची साधणेच नसल्याने अधिक प्रमाणात असलेली गरीबी. रोजगारांच्या समस्यामुळे सकस अन्न न मिळणे, अस्वछता, अशुद्ध पाणी , अंधश्रद्धा, भ्रष्टाचार , अज्ञान अशी अनेक कारणे ही पुढे येतात, आणि सरकारकडुन याबाबत ही ठोस काही होताना दिसत नाहीच. फक्त पुणे-मुंबई-नागपुर-नाशिक अश्या शहरांचा विकास, मेट्रो, महामार्ग , बुलेट ट्रेन हे म्हणजेच विकास हेच चित्र जरी आपल्या डोळ्यासमोर असले तरी पायाभुत सुविधांचा येथील अभाव, जगण्या साठी लागणार्या मुलभुत गरजांचा अभाव असलेला हा भाग पाहिला की आपण नक्की भारतात राहतो की सोमालियाला हा प्रश्न पडतो .. आता तर फक्त मेळघाटच नाही तर ठाणे जिल्हा ही कुपोषणाचा बळी ठरु लागला आहे. आणि हे नक्कीच भयावह आहे. बालमृत्युच नाही तर इतर तरुण आणि स्त्रीया, माता यांच्या मृत्युचे ही अनेक आकडे समोर येत आहेत.
भ्रष्टाचाराच्या अनेक हवेतील वार्ता हवेतच विरल्या जातात , यावर कुठेही कुठली ही अॅक्शन झाल्याचे माझ्या ऐकीवात नाही. आदीवासींसाठी राबवल्या जाणार्या योजना मोठ्या असल्या तरी कीती योजनांचा लाभ कीती आदिवासींना झाला याचे मोजमाप, मुल्यमापण करण्याची गरज कधीच कोणाला वाटली नाही ही शोकांतिकाच आहे.
त्यामुळे मी पुन्हा म्हणु इच्छितो .. India Deserves Better
#India_Deserves_Better
- गणेश जगताप
छायाचित्रे नेट वरुन साभार