India Deserves Better - ७. रस्ते अतिक्रमण, ढिम्म प्रशासन आणि आपण

सोबत attach केलेला video पाहिलाच असेल, तर त्या पासुनच आपण सुरुवात करुयात.

रस्ते अतिक्रमण

पदपथावरील अतिक्रमणे , सायकल ट्रॅक वरील अतिक्रमणे ( पहिल्या भागात याचा उल्लेख आहेच) , रस्त्याच्या दोन्ही बाजुला, टपर्‍यांचे , विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्याच बरोबर बेशिस्त पद्धतीने रस्त्यावरती लावलेली वाहणे हे दृष्य आता बर्यापैकी सर्व शहरांचे चित्रच झालेले आहे.

वरील video हा स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी फाटा ते रहाटणी फाटा येथील असले तरी ते प्रातिनिधिक चित्र आहे, या पेक्षा ही खराब अवस्था पिंपरी कॅम्प, भोसरी भागात पहावयास मिळेल.. मी आज माझ्या या जवळील भागाबद्दल बोलतो, पण मला तर वाटते हेच चित्र आपल्या देशात ठिकठिकाणी दिसते आहे.

एकवेळी भले मोठे रस्ते असण्याचे बिरुद मिरवणारे पिंपरी चिंचवड आता वाहतुकीच्या कोंडमार्‍या मध्ये बुजत चालले आहे. बेशिस्त वाहनचालक, वाहतुक पोलिस व महानगरपालिका प्रशसनाची निष्क्रीयता, आणि पेपर मध्ये वाचलेल्या हप्तेगिरी अश्या अनेक कारणामुळे शहराचे पार तीन तेरा वाजले आहेत. रस्ते मोठे असले तरी त्यावर अतिक्रमणे वाढली, कोणाचा त्यांना चाप नाही, कोट्यावधी रुपयांचे पदपथ आणि सायकल ट्रॅक गायब झालेत .. पायी चालणार्‍या माणसाचे तर हाल बघवत नाही. वृद्ध आणि शाळकरी मुलांना तर जीव मुठीत घेवुनच रस्त्यावर चालावे लागते.

मग मला प्रश्न पडतो, शेती आणि शेतकरी असा मुद्दा निघाला की, हेच शहरी नागरीक हमरी तुमरी वर येतात, शेतकर्‍यांच्या नावाने गळा काढतात, ते कर भरत नाही म्हणुन ओरडतात, पण कोणत्याही सुजान माणसाला आपल्या करापासुन आपल्यालाच लागणारे बेसिक इन्फ्रास्ट्रकचर पण सरकार , प्रशासन पुरवू शकत नाही तर त्यांना जाब विचारणे तर सोडा साधा प्रश्न ही ते विचारत नाहीत. आणि जेथे पायाभुत सुविधा आहेत तेथे पैसे खाऊ अतिक्रमण यावर आपण गप्प का आहोत ? अतिक्रमण विरोधी विभाग हा नावालाच राहिला आहे असेच आता वाटते..

मग या सगळ्याला जबाबदार कोण ? नक्कीच लोक ही तितकेच जबाबदार आहेत, परंतु प्रशासनाचा त्यांच्यावर वचक नसेल तर ते कसले प्रशासन चालवत आहे. शहरीकरणाच्या समस्या माझ्या तिसर्‍या भागात लिहिल्या आहेतच, पण स्मार्ट सिटी अंतर्गत निवडण्यात आलेल्या शहरांना शासन २,०१,९८१ कोटी रुपये खर्च करणार आहे, लोकांना योग्य सुविधा मिळवून देणे, पायाभुत सुविधांचा विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे.. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वांत श्रिमंत असलेल्या महानगरपालिकेपैकी एक आहे.
मग हा सगळा पैसा, हे सगळे प्रशासन जर साध्या साध्या असलेल्या पायाभुत सुविधा ही निट करु शकत नसले तर हे खरेच सुशासन म्हणावे का ? हा प्रश्न पडतोच

पिंपरी कॅम्पचा संपूर्ण परिसर, पिंपरी चौक, काळेवाडी फाटा ते डांगे चौक, थेरगाव तसेच हिंजवडीकडे जाणारे सर्व रस्ते, पिंपरी ,नेहरूनगर रस्ता, भोसरी उड्डाणपुलाखालील परिसर, आकुर्डी, वाकड, रहाटणी, काळेवाडी, सांगवी,दापोडी, कासारवाडी, अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे दररोज वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला दिसतो आणि अतिक्रमणा मुळे रस्त्यावर चालणे सुद्धा अवघड झालेले आहे. मग ह्याला जबाबदार कोण?

आयटी हब 'हिंजेवाडी कडे जाणार्‍या रस्त्यांचे तर मी काही बोलतच नाही, त्यांची दुर्दशा आपण जगात दाखवतो आहे.. हेच आपले व्हिजन.
पिंपरी कँप मध्ये पार रोडवर व्यापार्‍यांची दुकाने आहेत, चौकात रिक्षा वाले पोलिसांच्या नाकावर टीच्चुन उभे राहतात. नाशिकफाटा सोडला की कारच्या दुकानांनी पार सर्विस रोड (एन.एच.४) खाऊन टाकला आहे. व्यापार्‍यांची अरेरावी आहेच. पण पोलिसांना हे सारे दिसत नाही का? महानगर पालिकेने डोळ्यावर पट्टी बांधली आहे का?
राजकिय दबाव असल्या खेरिज सगळे गप्प आहेत का?

थोडेसे मनातले आनखिन

मागे एकदा चलन वाढीचा निर्णय झाल्यावर सगळीकडे गाड्या सिग्नल ला थांबलेला एक फोटो वायरल करण्यात आला आणि 'मोदी है तो मुमकीन है' ह्या मेसेज वर तो सर्वत्र फिरवण्यात आला. मग आता येथे का हे सगळे मुमकीन नाही हे कोणी सांगु शकते का?
महानगरपालिका, राज्य सरकार, भारतात सगळीकडे एकाच पक्षाची सत्ता आहे. मग नियम , नियमावली, योग्य प्रशासन प्रत्येक नागरीकाला देण्याची जबाबदारी कोणाची.. अतिक्रमणे झाल्यास त्यांना हटवुन सामान्य नागरीकाचा कोंडलेला श्वास मोकळा करण्याची जबाबदारी कोणाची.. ?

का प्रत्येक वेळी हे असले प्रॉब्लेम कोणी विचारायचेच नाही का? फक्त राष्ट्रीय सुरक्षा हा एकच विषय घेवुन हा चाललेला कारभार पहात बसायचे ?
मला तर आता लोकांचा ही राग येतो, सतत कोणाच्या तरी दावणीला जाऊन, त्यांच्या आयटी सेल च्या न्युज स्वत:चे डोके न वापरता सोशल मेडिया वर फिरवत रहायचे येव्हडेच काम ते आता करत असतात, असे प्रश्न विचारले की हे प्रश्न महत्वाचे नाहीत अशीच त्यांची धारणा झालेली असते किंवा तुम्ही विरोधक येव्हडेच त्यांचे म्हणणे असते.
'आरे', 'शेती' किंवा राजकिय स्पेस असणारा थोडा जरी मुद्दा दिसला की राजकिय रंगाने ही मंडळी इतकी भांडतात आणि अशे सोशल मुद्दे असले की त्यांना कश्याचे ही सोयर सुतक नसते.. पण अश्याच रस्त्यांवर आपल्यापैकी किंवा आपल्या घरच्यांपैकी कोणाचा जीव जाऊ शकतो ह्याचे ह्यांना भान ही नसते.. नव्हे असे अनेक प्राण लोकांनी गमावलेले आहेत.. पण आपल्याला काय त्याचे असे म्हणुन आपण पुन्हा त्या निर्ढावलेल्या गर्दीचा भाग होतो .
म्हणुन मला पुन्हा म्हणावेसे वाटते India Deserves Better

------------- गणेश जगताप

#India_Deserves_Better