हंगामा है क्यों बरपा... बार टेंडिंगचे रंजक जग - श्वेता चक्रदेव

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

हंगामा है क्यों बरपा...बारटेंडींगचं रंजक जग

"म्हणजे दारू?" माझी आई जोरात चित्कारली. ती इतक्या जोरात ओरडली की, बहुधा फोनमधून दहा हजार मैलांवर ऐकू येऊन माझ्या बाजूला बसलेली बाई दचकली. आपली भारतातून जाताना सरळसोट असलेली, चांगली शिकलेली, नोकरी करणारी मुलगी आईला जेव्हा 'मी बार टेंडिंग म्हणजे मद्य असलेली वेगवेगळी पेये कशी बनवायची हे शिकून आले आहे' असे, एवढेच नव्हे तर बारमध्ये, पार्ट्यांमध्ये उभी राहून ते मद्य लोकांना वाटते असे सांगते, तेव्हा अर्थात हे उद्गार ऐकू आल्यास नवल ते काय? बरोबरच आहे म्हणा, महाराष्ट्रातल्या कोणत्याही पापभीरू, मध्यमवर्गीय घरात दारू हा विषय अगदी आताआतापर्यंत पूर्ण वर्ज्य किंवा निषिद्धच होता. दारू पिणे तर फार दूरची गोष्ट, दारूबद्दल बोलणेदेखील बहुतांशी फक्त पुरुषांच्यात आणि तेदेखील कुजबुजत व्हायचे. 'दारू पिणारी माणसे' ही माझ्या लहानपणी कोणत्या गुन्हेगारापेक्षा वेगळी नव्हती. 'संसारा उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू' हे दूरदर्शनवर ऐकायचो, तर "ऐकले का, परवा त्या जोश्यांचा पंकज त्या गुत्त्याबाहेर दिसला" ही मोठी खळबळजनक खबर असे. तो काळ, ती माणसे वेगळीच होती आणि दारू ही खूपच वाईट आणि निंदनीय गोष्ट होती. मी एक प्रशिक्षित बार-टेंडर आहे, अर्थात वेगवेगळी मद्ये, त्यांचे गुणधर्म आणि त्यापासून बनवता येणारी पेये यांचे शिक्षण मी घेतले आहे, एक छंद म्हणून. आज जरा या बार-टेंडिंग क्षेत्राचा आढावा घेऊ या, थोड्या इतिहासासकट.

दारू हे भारतीय संस्कृतीला नवे नाव नाही. वेदकाळात मद्य, मदिरा अनेक वेगवेगळ्या रितीरिवाजांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असे. मद्य पिणे हा अनेक संस्कृतींमध्ये समाज शिष्टाचाराचा एक भाग मानला जाई. जगातील सगळ्यात पहिले मद्य कुठे बनवले गेले हा तसा गुंतागुंतीचा विषय असला, तरी ख्रिस्तपूर्व ७००० वर्षांपूर्वी चीनमध्ये मद्यसदृश पेय बनवले गेल्याचा पुरावा आढळतो. ख्रिस्तपूर्व २७०० वर्षांपूर्वी, बॅबेलिओन संस्कृतीत 'वाइनच्या देवतेची' उपासना केली आहे. भारतीय संस्कृतीत सुमारे ख्रिस्तपूर्व ३०००-२००० वर्षांपूर्वीपासून भातापासून तयार केलेली 'सुरा' आणि तिचे प्राशन केले जाणे याचा दाखला आढळतो. दक्षिण अमेरिकेतील अन्ड्स (Andes) प्रांतात मका, द्राक्षे आणि सफरचंद यांपासून तयार केलेले 'चिचा' या मद्यसदृश पेयाचा उल्लेख आढळतो. अठराव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत मद्याचा उपयोग मजेसाठी, आनंदासाठी किंवा इंग्लिशमध्ये recreational वापर पाश्चिमात्य देशात राजरोसपणे केला जाऊ लागला. पौर्वात्य देशात या पेयाला काहीशी काळी किनारदेखील याच काळात आली. मदिरापान हे राजेरजवाड्यांच्या काळात सुखासीनतेचे, भोगवादाचे लक्षण मानले जाऊ लागले आणि पौर्वात्य संस्कृतीतील सामान्य माणूस यापासून पार लांब गेला.

काळाचे चक्र मोठे अजब असते. विज्ञानाची प्रगती आणि मागच्या काही वर्षातील तंत्रज्ञानाची अफाट प्रगती हे काळाचे चक्र जोरात फिरवत गेली आणि स्वप्नवत वाटावे इतक्या लक्षणीय वेगाने सगळे जग जवळ येऊ लागले. कोणे एके काळी सात समुद्र पार करणे हा धर्मद्रोह मानला जाई, त्याच संस्कृतीतील लोक आता सात समुद्र २४ तासांत पार करून जाऊ लागले. आणि या वेगवान बदलाबरोबर पाश्चात्त्य आणि पौर्वात्य समाजदेखील एकमेकांत मिसळू लागले. मद्याला आणि मद्यपानाला असलेली काळी, करडी किनार हलकेच विरळ होऊ लागली. गावोगावी फक्त 'अबक वाइन्स', किंवा 'अबक देशी दारूचा गुत्ता' इतकाच मद्याचा आवाका न राहता परदेशातले, जगभरातले वेगवेगळे मद्य आता भारतात उपलब्ध होऊ लागले होते. बघता बघता मध्यमवर्गीय घरात ३१ डिसेंबरपुरते का होईना, मद्य स्थान मिळवू शकले होते.

साधारण एक दशकापूर्वी भारतातून, महाराष्ट्रातल्या एका छोट्या निमशहरी भागातून थेट परदेशात आल्यावर, इथे मुबलक मिळणारे आणि आस्वाद घेतले जाणारे मद्य हा 'कल्चरल शॉक' किंवा सांस्कृतिक धक्क्याचा एक भाग ठरला. रोजच्या जीवनात सामान्य माणसांच्या आयुष्याचा मद्य हा एक अगदी नॉर्मल आणि दैनंदिन भाग असतो. अनेक घरांत रात्रीच्या जेवणात एक ग्लास वाइन पिणे हे दुर्मीळ नाही. अनेक मोठ्या बिझनेस मीटिंग्जमध्ये, कॉन्फरन्समध्ये मद्य दिले जाणे हा आयुष्याचा एक भाग आहे. इथे कोणी तुमच्यावर दारू पिण्यासाठी जबरदस्ती करत नाही की मुबलक उपलब्ध आहे म्हणून जिथे तिथे दारू पिऊन पडलेली माणसे दिसत नाहीत. भौगोलिक स्थान आणि हवामान या सगळ्याचादेखील मद्याला या सभ्य मानले जाण्यात तितकाच भाग आहे. प्रचंड थंडी पडणाऱ्या अनेक ठिकाणी मद्य शरीरात ऊब तयार करायला मदत करते.

कामाचा आठवडा शुक्रवारी संपला की, दोन-चार घटका मित्रमंडळींबरोबर बसून मद्याचा आस्वाद घेणे ही प्रचलित गोष्ट आहे. मी औषधशास्त्राची विद्यार्थिनी आहे. आणि अभ्यास करताना करताना हे माहीत झाले होते की, मद्य हे एक नशा असलेली स्थिती तात्पुरती निर्माण करणारे द्रव्य आहे. गमतीचा भाग म्हणजे, मद्य हे पेय व्यसन लावण्यास कारणीभूत असल्याचे पुरावे अनेक संस्कृतीत फार पुरातन काळापासून आढळतात. मग इतकी सामाजिक, वैज्ञानिक, भावनिक बंधने असूनही असे काय आहे या मद्यात की जगातले लाखो, करोडो लोक या पेयाकडे आकर्षिले जातात. मद्य माणसाला अनेकदा थोडे मोकळे व्हायला मदत करते. कधी कारणाने तर कधी अकारण आपण सगळेच मुखवटे घालून वावरत असतो. मद्य हे मुखवटे दूर करायला मदत करते.

कोरोनारीटा नावचे भन्नाट ड्रिंक
image1

माझ्यासारख्या मराठी घरातून आलेल्या मुलीसाठी, दारू हा शब्द खरे तर मोठे वादळ घेऊन आला. परदेशात आल्यावर आपली अनेक झापडे उघडतात. आपल्याला जे आणि जसे वाटत असते ते आणि तसेच बरोबर असते हा आपला एक खूप मोठा भ्रम दूर होतो. पहिल्यांदा मद्य प्यायले, तेव्हा हे असे काय लोक कडवट पितात असे वाटले. नंतर काही दिवसांनी वाइन प्यायली आणि हळूहळू कळायला लागले की फार मोठा अभ्यास आहे या सगळ्या पेयांचा. कोणते मद्य, कुठे तयार केले गेले आहे, कोणते घटक वापरून, कोणत्या वातावरणात तयार केले आहे., कशा प्रकारे साठवले आहे, किती काळ साठवले आहे या सगळ्यामुळे त्या मद्याची चव आणि किंमत ठरत असते. बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या मद्यांची आणि त्यांपासून तयार केलेल्या पेयांची ओळख होत होती, परंतु तरीही त्यातले हवे तेवढे ज्ञान होतेच असे नाही. एक दिवस असे लक्षात आले की, काही माहीत नसताना कुतूहल म्हणून हे पिण्यात फार अर्थ नाही. यातले शास्त्र काय आहे ते तर कळायला हवे. आणि या ठिकाणी सुरू झाला एक अभिनव प्रवास - बार टेंडिंग स्कूल अर्थात अशी शाळा जिथे वेगवेगळ्या मद्यांचा आणि त्यांपासून तयार केलेल्या पेयांचा अभ्यास केला जातो आणि ती तयार करायला शिकवली जातात. जसा जसा या शाळेच अभ्यास चालू झाला, तसे तसे वाईट आहे, वाईट आहे या बिल्ल्याखाली एक आख्खे विश्वच आपल्याला माहीत नव्हते, हे कळले.

इथे एक लक्षात घ्यायला हवे की, पाश्चात्त्य देशात या सगळ्याकडे बघण्याचा एक संपूर्ण वेगळा दृष्टीकोन आहे. मद्य आणि मद्यपान या दोन गोष्टींना सामाजिक किंवा धार्मिक बट्टा नाही. बार टेंडिंग शाळेत मद्य, मद्याचे प्रकार यांचे रीतसर शिक्षण दिले जाते. प्रत्येक मद्यापासून कोणकोणते पेय बनवता येऊ शकते याचा शास्त्रोक्त अभ्यास करून घेतला जातो. एवढेच नव्हे, तर याची परीक्षाही घेतली जाते. नुसते मद्य आणि सरबत एकत्र करून समोर ग्लासात ठेवणे याला बार टेंडिंग म्हणत नाहीत. तर कोणत्या मद्याबरोबर कोणते पेय जास्त चांगले चवीला लागू शकेल आणि किती प्रमाणात याची जाण ठेवून बार टेंडरला त्याचे पेय तयार करायचे असतात. इतकेच नव्हे, तर एकाद्या व्यक्तीने आणखी मद्यप्राशन करू नये असे दिसत असल्यास त्याला तसे जाणवून देणे ही प्रत्येक बार टेंडरची नैतिक जबाबदारी असते. मुळात एक लक्षात घयायला हवे की, कोणतेही व्यसन हे वाईटच. आणि अति केल्यास कोणत्याही गोष्टीचे व्यसन लागू शकते, जे धोकादायक असते. या दोन गोष्टी एकदा नीट लक्षात घेतल्या की अनेक कोडी आणि प्रश्न सुटत जातात. संशोधकांनी मद्याचे कमी प्रमाणात घेतल्यास फायदे आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास खूप तोटे फार पूर्वीच नोंदवून ठेवले आहेत. आता या क्षेत्राला 'मिक्सॉलॉजी' (mixology) असेही म्हटले जाऊ लागले आहे.

बार टेंडिंग हा एक हुद्दा आहे. परदेशात कॉलेजमध्ये जाणारी अनेक मुले-मुली बार टेंडिंगची नोकरी करून आपल्या शिक्षणाचा, चरितार्थाचा खर्च भागवतात. या कामाच्या वेळा ठरावीक नसतात आणि काम तसे कष्टाचे असते. अनेकदा लहान मुलांच्या आया, ज्यांच्या मुलांना सांभाळायला दिवसभर कोणी नसल्याने त्या नोकरी करू शकत नाहीत, परंतु संध्याकाळी घरची मंडळी परत आल्यावर ४-५ तास बार टेंडिंग करून पैसे मिळवत असतात. या सगळ्यात मद्यपानाला जी काळी, लांच्छनास्पद किनार नाही याचा फायदा होतो. एखादी ओली बाळंतीणसुद्धा बार टेंडरची नोकरी करून आपले पैसे कमवू शकते आणि याबद्दल कोणी तिच्याकडे बोटे दाखवत नाही, कारण हे तिचे काम असते.

अनेकदा इथली काही प्रचलित पेयांची नावे असतात, जी तुम्हाला शिकावी लागतात आणि माहीत नसतील तर तुमचे हसे होऊ शकते. वेगवेगळे रंग, फळे, फळांचे रस, मद्य, कुठे मेक्सिकोची मार्गारीटा तर कुठे जपानची साके, तर रशियाची वोडका ह्या पेयांमधून तिथला माणसे कळत जातात. मॅनहॅटन, लाँग आयलँड अशी जागेच्या नावावरून पडलेली पेय असोत की, फक्त जगातल्या काही ठिकाणी बनणारी बकार्डी असो, हे सगळे जण एक-एक गोष्ट सांगत असतात. आपले कान उघडे असायला हवेत फक्त. आपण आपल्या घरात मोदकाची उकड योग्य वाफवली आहे का हे सांगणाऱ्या आज्या पाहिलेल्या असतात किंवा कुणी ताटभर मोठ्या पातळ पुरणपोळ्या लागणारी मावशी, त्यांचे हे अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेले जाणतेपणी असते, अगदी तसेच केवळ एखाद्या मद्याची बाटली उघडून त्यातली हवा हुंगून वाइन किती जुनी किंवा किती मुरलेली आहे, त्यात कोणते अरोमा किंवा गंध येत आहेत, चव लागेल हे अगदी डोळे झाकून सांगू शकतात.

परदेशात जेव्हा केवळ हौस म्हणून बार टेंडिंग शिकायला सुरुवात केली, तेव्हा माझे मलाच माहीत नव्हते की कोणत्या प्रकारचे अनुभव मला येतील. कोर्स चालू असताना फारच मजा येते, कारण तुम्ही वर्गात असता इतर विद्यार्थ्यांबरोबर. तुमच्यातले कोणी डॉक्टर असते, तर कोणी बेरोजगार, पण त्या वर्गात तुम्ही सगळे सारखे असता. नंतर प्रात्यक्षिक करण्याच्या काळात फार मजेशीर अनुभव येतात. अनेकदा या बार टेंडिंग स्कूलमध्ये येणारी मुले त्यांच्या प्रत्येकाची संस्कृती, आयुष्य आपल्याबरोबर घेऊन येतात. शिकताना अनुभवांची देवाणघेवाण होते, तेव्हा अनेकदा हास्यास्पद आणि संस्मरणीय गोष्टी घडतात. एकदा वारंगतल्या एक रशियन मुलीने वर्गातल्या सगळ्यात टग्या दोन मुलांशी स्पर्धा लावली. हे दोघे गाडी तीन पेग पिऊन थंड झाले, तर ही बया संपूर्ण बाटली वोडका पिऊन, नंतर २ मैल पळून आली होती.

माझे बार टेंडिंग शिक्षण मला फक्त मद्याचेच नव्हे, तर जीवनातलेही काही महत्त्वाचे धडे शिकवून गेले.

फ्रेश फ्रूट्स आणि ज्यूस यांचा बेस असलेलं हे पंच

image2

मी अस्सल भारतीय असल्याने माझा पिंडच मद्याला नवे ठेवण्याचा होता. मुळात भारतीय माणूस मद्य या नावालाच घाबरतो, कारण या नावाबरोबर येणारी भीती, अज्ञान आणि अनेक गैरसमजदेखील. त्यातून नाहीच घाबरला तर पुरुषाची मक्तेदारी असलेले हे नाव. चार पुरुष एकत्र आले की, बायकांनी फक्त भजी किंवा दाणे त्यांना नेऊन द्यायचे आणि त्यांनी गच्चीत किंवा घरात बसून मद्य प्यायचे किंवा बाहेर गेलो तरी मद्य म्हणजे बरेचदा पुरुषच पिणार हे अध्याहृतच असते. मला वाइन किंवा आणखी कोणते मद्य प्यायला आवडते हे ठामपणे म्हणू शकणाऱ्या भारतीय स्त्रिया विरळ. अर्थात ही परिस्थिती बदलते आहे. आजमितीला भारतातदेखील अनेक मुली हे शिक्षण घेत आहेत. भारतात बारमध्ये काम करणे हे खरे तर तुमचे सामाजिक किंवा नैतिक अध:पतन झाल्याचे(च) लक्षण असल्याने, बार टेंडिंगकडे एक व्यायवसाय म्हणून बघणे फारच दुर्मीळ.

खरी मजा येते, जेव्हा भारतीय स्त्री बार टेंडिंग करताना इतर भारतीय लोकांनी बघितले की, आधी खरे तर त्यांना धक्काच बसतो. अनेकदा मग लोक चौकशी करायला येतात. जेव्हा त्यांना कळते की हा एक छंद म्हणून मी जोपासते आहे, आणि पोटापाण्यासाठी माझा वेगळे काम मी करते, मला मुलगादेखील आहे, तेव्हा त्यांना त्या पुढे काय बोलावे हे कळतच नाही. ऐसा क्यों? असे जेव्हा ते मला विचारतात, त्यावर 'क्यों नही?'चे उत्तर त्यांच्याकडेही नसते. भारतीय बायका अनेकदा बारमध्ये किंवा पार्टीमध्ये नजरेला नजर देऊन बोलायचेच टाळतात, जणू मला त्यांचे खूप मोठे गुपितच कळलेय. एकदा एक ज्येष्ठ काका अगदी काळजीने, "बेटाजी, आपको जॉब लगवा देता हूँ, पर असाच घरकी लडकी हो, ऐसा ना किजीये आप" असे म्हणाले, तेव्हा मात्र दूर देशी या ओळख ना पाळख असलेल्या माणसाला माझी काळजी वाटतेय हे पाहून खूप भरून आले होते.

बारमधले असंख्य किस्से असतात. तुमच्या कल्पनेच्या पलीकडचे लोक with their different walks of life बारमध्ये भेटतात. एक भारतीय स्त्री म्हणून माझा या गोष्टींकडे बघण्याचा आणि या जगभरातल्या लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कधी विनोदी प्रसंग तयार करतो, तर कधी फार रम्य नाती जोडतो.

बार हा तरुण मुली-मुले भेटायची जागा आहे. अमेरिकेत किंवा पाश्चात्त्य देशात आई-वडील मुला-मुलींसाठी स्थळं बघत नसल्याने आपली कुंडली जुळवण्यासाठी या तरुणांना बरीच ‘फाइट’ मारावी लागते. मला या सिस्टिमची कल्पना होती, पण ती मला बार टेंडिंगमुळे फर्स्ट हँड बघायला मिळाली.

एकदा एक डॉक्टर मुलगा बारमध्ये येऊन बसला आणि एक ड्रिंक घेऊन आजूबाजूला बघू लागला. एक मुलगी त्याच्या बाजूला येऊन बसली आणि त्याच्याशी बोलू लागली. हा गडी खुलला. तो तिच्यासाठी ड्रिंकवर ड्रिंक विकत घेऊ लागला. हे असे तीन-चार तास चालले होते. आता बहुधा यांची जोडी जमणार असे वाटत असतानाच, एक माणूस आला आणि या मुलीच्या कमरेत हात घालून निघून गेला. ही मुलगीसुद्धा "हाय हजबंड" म्हणून त्या माणसाच्या गळ्यात पडली आणि निघाली.

हा डॉक्टर मुलगा तिला म्हणाला की, "काय तू? का बोलत बसलीस माझ्याशी?" तर ती म्हणे, "मी काय जबरदस्ती केली होती का? तू देत गेलास दारू मी, पीत गेले. That’s not my problem." बिचारा डॉक्टर हताश होऊन बसून राहिला. एका पुरुषाला असे सपशेल येडा बनवलेले बघून मला खरे तर फारच भारी वाटले होते.

मॅड सॅम असाच एक बंदा. साठीचा सॅम सोमवार ते शुक्रवार बारमध्ये यायचा. कधीही लग्न न झालेला सॅम मागची ३५ वर्षे एकटा राहतो आहे. शेजारी जो बसेल त्याला फुकट दारू पाजायचा. आजपर्यंत किती जणांनी त्याच्या या सवयीचा फायदा करून घेतला असेल ते देवालाच माहीत. रात्री बार बंद होताना, नि:श्वास टाकून हळू पावले टाकत जाणारा सॅम अस्वस्थ करून जायचा.

मला सॅमने सांगून ठेवलेय, "कधी लागोपाठ दोन दिवस आलो नाही बारमध्ये, तर माझी चौकशी करायला या."

कधी हताश होऊन बारमध्ये येणारी माणसे, कधी आनंद साजरा करायला, तर कधी रिकामे घर खायला उठते आणि एकटेपणा घाबरवून टाकतो म्हणून स्वत: पैसा खर्च करून लोकांना दारू पाजणारी, केवळ गप्पा मारता याव्या म्हणून आनंदी, ‘पार्टी अ‍ॅनिमल’ आहोत अशी खोटा प्रतिमा तयार करणारी, तर कधी आजूबाजूला चाललेल्या या गदारोळात सगळीकडे कौतुकाने बघत, आनंद मानून घेणारी माणसे बारला नवी नाहीत.

बार टेंडिंग करताना आपल्या विचारांच्या कक्षेबाहेर असलेले लोक आणि त्यांचे अनुभव भेटतात, कळतात. आपल्याला अनेकदा माहीतच नसते की आपल्या डबक्याबाहेरचे जग कसे आहे, तिथले प्रॉब्लेम्स काय आहेत, तिथल्या लोकांच्या आकांक्षा, ध्येय काय आहेत. ही माणसे त्यांच्या त्यांच्या विश्वाचा छोटासा तुकडा आपल्यासमोर घेऊन येतात. अनेकदा हे काम करत असताना, तुमच्यासमोर असलेली माणसे अत्यंत नाजूक मन:स्थितीतदेखील असतात. अशा वेळी आपली डोके क्षणात ठेवून, त्यांना सावरणे गरजेचे असते. बार-टेंडिंग हे एक अनोखे जग आहे. चातुर्मास्यात कांदा-लसूण न खाणाऱ्या घरातल्या मी, केवळ एक छंद म्हणून बार टेंडिंग किंवा मद्याची पेये बनवणे हे शिक्षण ज्या दिवशी घ्यायचे ठरवले, त्याच क्षणी खरे तर नव्या अनुभवांचे एक नवे चक्र चालू झाले होते. माझ्या सपशेल दोन भिन्न संस्कृतींना, दोन विश्वांना जोडणाऱ्या, एकत्र घेऊन जाणाऱ्या, समृद्ध करणाऱ्या या छंदाने मला नवी माणसे दिली, नवे ज्ञान दिले, माझ्या मनाची कवाडे आणखी मोकळी केली. चूक-बरोबरच्या चक्रात अडकलेल्या माझ्या एकांगी मनाला आणि विचारांना 'हे असे पण असू शकतेच' अशी नवी दिशा दिली, आणि त्यासाठी मी या क्षेत्राची आणि छंदाची कायम ऋणी राहीन.

- श्वेता चक्रदेव

20191016-122815

अनुक्रमणिका