साहित्य :
सोपी पण चविष्ठ अशी होते ही भाजी. मी आजच केलीये. म्हणून शेअर करते आहे. पटकन आणि छान होणारी.
मक्याचे काढलेले दाणे, नेहमीचे फोडणीचे साहित्य, चणाडाळीचे पीठ, एक मध्यम चिरलेला कांदा, वाटलेले ओले खोबरे, मीठ.
काढलेले मक्याचे दाणे मिक्सरला जर्रा फिरवून घ्यायचे. जास्त फिरवले तर लगदा होतो. नुसतं एकदोनदा फुर्र फुर्र केलं तरी पुरे. एका दाण्याचे चार तुकडे होतील इतपत भरड करायचे. जर जास्त पीठ झाले तर भाजीचा बेत कॅन्सल करून उपमा करावा. फिरवताना पाणी घालायचं नाही. थोडं पाणी वाटताना सुटतं. तेवढं पुरे.
फिरवून घेतलेले दाणे कुकरला लावायचे. मी वरण भातावरोबरच लावते तिसर्या पुडात. वाफवून झाले की मोहरी, हिंग, किंचित हळद घालून फोडणी करायची. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा त्यावर दाण्यांची भरड घालून परतायचे. ओले खोबरे , लाल तिखट. मीठ घालायचे. मग त्यावर चणाडाळीचे पीठ हळूहळू भुरभुरवत परतत रहायचे. भाजी सुकी झाली आणि पीठ शिजले की उतरायची. वरून कोथिंबीर आवडत असेल तर घालावी. भाजी तयार. फार वेळ लागत नाही. लागतेही छान.
गौरीबाई गोवेकर