श्री गणेश लेखमाला २०१९ - झलक पाचवी!

म्हणता म्हणता गणपतीच्या आगमनाच्या प्रतीक्षेचा काळ संपत आलाय आणि भाद्रपद येता येता गणरायालाही सोबतच घेऊन येतो आहे. आजवर घडलेलं सारं भलं-बुरं काही काळासाठी बाजूला ठेवून आता गणपतीच्या स्वागतासाठी तयार राहायचं. येणाऱ्या ह्या पाहुण्याचं आपापल्या परीने मनापासून आगतस्वागत, पूजन करायचं आणि सर्वे भवन्तु सुखिनः असं आशीर्वचन मागायचं.

मिपाच्या गणेश लेखमालेवरसुद्धा आता शेवटचा हात फिरवून होत आलाच आहे. लेख, चित्रं, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स, सजावट, लिखाणामधले मुद्रणदोष.. एक ना दोन, कित्येक लहान लहान गोष्टी पुनरेकवार पडताळून पाहणं सुरू आहे.

IMG-20190808-WA0012

दोन सप्टेंबर २०१९पासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत जरी 'इदं न मम' ह्या भावनेने तुम्हा सर्वांपुढे ही लेखमाला आम्ही सादर करणार आहोत, तरीही, झालेलं काम तुमच्या पसंतीला उतरेल का, ही एक छोटीशी धाकधूकसुद्धा मनात आहे. लेखमाला प्रकाशित होण्याची वाट तर आपण सगळेच बघत आहोत.

तोवर, लेखमालेमधल्या एका लेखाची ही छोटीशी झलक -

लोकसाहित्य सामान्यतः लिखित स्वरूपात संग्रहित करून ठेवण्याची पूर्वापार परंपरा नव्हती, तरीही लोकांच्या मुखी सतत वसल्याने ते टिकून राहिले, असे म्हणायला हरकत नसावी. संतांनी अध्यात्माचा प्रसार, प्रचार करण्यासाठी आणि बहुजन समाजामध्ये त्याची गोडी उत्पन्न करण्यासाठी तत्कालीन लोकगीतांच्या प्रकारांचा उपयोग केला, उदाहरणार्थ, अभंगरचना, ओव्या, भारुडे इत्यादी. संतांच्या निष्ठा जरी विठोबाच्या पायांशी वाहिलेल्या असल्या, तरी गणेशस्तवन, पूजन हासुद्धा त्यांच्या अभंग साहित्याचा अविभाज्य भाग आहे. लोकसाहित्यामध्ये आणि लोककलांमध्ये गणेशस्तवन, गणेशपूजन, स्तुती ह्यांचे वेगवेगळे आविष्कार बघायला मिळतात. दुधामध्ये साखर विरघळावी, इतक्या सहजतेने संतसाहित्य, गण, भारुडे ह्यांमध्ये त्याचे अस्तित्व उमटलेले आहे. लोककलांचे सादरीकरण गणेश आगमनाने सुरू होते.

सातवाहन काळात प्रतिष्ठान - पैठण येथे रतिनाट्यासारखे कलाप्रकार सादर करण्याची प्रथा होती, त्यात तमाशातील गण प्रकाराचे मूळ आहे, अशी मान्यता आहे. ह्या नाट्याची सुरुवात मंगलचरणाने करत. हाच तो गण. मंगलचरणामध्ये गायली जाणारी स्तुतिगीते म्हणजेच गण होय. पहिला गण शंकर आणि पार्वतीचा, दुसरा गण लक्ष्मी आणि नारायणाचा व तिसरा गण गणपतीचा अशा प्रकारची स्तुतिगीते गायली जात.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९