श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक तिसरी!

सर्वप्रथम, सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अनेक शुभेच्छा!

एखाद्या रिकाम्या चित्रफलकावर चित्रकर्त्याने हलके हलके रंग भरावेत आणि बघता बघता चित्रफलकाचा नूरच बदलून जावा! आपल्या श्रीगणेश लेखमालेचंसुद्धा काहीसं तसंच झालंय बरं का, मंडळी. ह्या वर्षीच्या लेखमालेची घोषणा झाल्यापासून जसे मिपाकरांकडून वेगळ्या वेगळ्या विषयांवरचे लेख येऊ लागलेत, तशी आपली लेखमाला विविध विषयांवरील लिखाणाने सजू लागली आहे, बघता बघता आकार घेऊ लागली आहे.

तसंही बुद्धिदात्याच्या, विद्येचं वरदान देणाऱ्या देवाच्या पूजेत शब्दफुलं वाहण्यापेक्षा अधिक सयुक्तिक काय असणार?

ganapati-aani-indradhanu

तेव्हा, आज पुन्हा एकदा घेऊन आलोय श्रीगणेश लेखमालेतल्या लेखांची आणखी एक छोटीशी झलक. पाहा बरं, एखादी लेखनशैली ओळखीची वाटते का आणि सांगा, कोणाच्या लेखणीतून उतरले असतील हे शब्द...

१.

रायगडाबद्दल आपल्याला १६८९पर्यंत, म्हणजे झुल्फिकार खानाने रायगड घेतला तोपर्यंतची माहिती विश्वसनीय साधनांत मिळते. १७३३नंतरची, म्हणजे बाजीराव पेशवे आणि प्रतिनिधी यांनी रायगड घेतल्यानंतरची माहिती अस्सल कागदांसकट ‘रायगडावरील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाची आणि इतर व्यवस्था' या शं.ना. जोशी यांनी पेशवे दप्तर चाळून एकत्र केलेल्या पुस्तकात आपल्याला मिळते. 'रायगडची जीवनकथा' या आवळसकरांच्या पुस्तकात पोलादपूरच्या चित्रे शकावलीतली एक नोंद आणि सिद्दीच्या काळातली एक व्यवस्था याचे टिपण आहे. या व्यतिरिक्त रायगडावर १६८९ ते १७३३ या प्रदीर्घ काळात काय झाले हे आपल्याला काही माहीत नाही.

२.

जपे स्पर्शाचं पावित्र्य
असा सोवळा पाऊस
बांध आतुर थेंबांना
धुकं बनला पाऊस

मन इतकं आतुर
झाले विचार फितूर
धुकं धुकं नजरेला
पार क्षितिजापातूर

३.

'मराठी माणूस नाटकवेडा आहे' आणि 'संगीत नाटके हा मराठी रंगभूमीचा देदीप्यमान इतिहास आहे' वगैरे वाक्यं आता झिजून गुळगुळीत झाली. Cliches are there for a reason या न्यायाने त्यात तथ्य आहेच. पण संगीत नाटक हा धंदा होता, त्यावर बालगंधर्व या नटापासून ते जनार्दन नारो शिंगणापूरकर या (काल्पनिक) बोलटापर्यंत अनेकांची चूल पेटत होती, ही जाणीवही असणं गरजेचं आहे. मराठी संगीत नाटकाच्या ‘धंद्यावर’ नेमका झोत टाकणारं सुघड असं लेखन (माझ्या तरी) पाहण्यात नाही. कच्चा माल भरपूर आहे : अनेकांनी आपल्या आठवणी, आत्मचरित्रं लिहून ठेवली आहेत, त्या काळची वर्तमानपत्रं (बर्‍याच अंशी) सुस्थितीत आहेत, काही पत्रव्यवहार आहे, समीक्षाग्रंथ आहेत. योजकत्व घेणारा कोणी पाहिजे.

मिपा श्रीगणेश लेखमाला २०१९